रतनगडावर आता फक्त ३०० पर्यटकांना प्रवेश !

वन्यजीव वनविभागाचे आणि पुरातत्त्व विभागाचे नियम पाळले जात नाहीत

 

गेल्या काही दिवसांपासून रतनगडावर व्यावसायिक पर्यटनवादी मंडळी मोठ-मोठे ग्रुप घेऊन जात आहेत. यामुळे रतनगडावर गर्दी होत आहे. गडावर कुठल्याही प्रकारे वन्यजीव, वन नियम पाळले जात नाहीत. तसेच पुरातत्त्व विभागाचे देखील नियम पाळले जात नाहीत.

त्याचप्रमाणे सध्या रतनगडावर सात वर्षानंतर कारवी फुलली आहे. या कारवीमध्ये फुलांसोबत फोटो काढण्यासाठी, सेल्फी काढण्यासाठी पर्यटक घुसतात अति उत्साहात कारवीचे आणि फुलांचे नुकसान केले जाते. तसेच या ठिकाणी असणारे व्हॉलेंटियर सुद्धा व्यवस्थित सूचना देत नसून त्यांची भाषा मुजोरिची असल्याची चर्चा सोशल मीडियावर झाली होती. या सर्वांचा परिपाक म्हणून रतनगडावर जाण्यासाठी पर्यटकांची संख्या घटविण्यात आली आहे.

प्रतिनिधी —

दिवाळीच्या सणाच्या सुट्ट्या आणि शनिवार रविवारच्या सुट्ट्यांचा मुहूर्त साधत नगर जिल्ह्यातील रतनगडावर मोठ्या प्रमाणात गिर्यारोहक आणि जंगल भटकंती करणाऱ्यांची गर्दी होत आहे. मात्र गडावर येणारी ही मंडळी कुठल्याही वन्य नियमांचे पालन करीत नसल्याने वन्यजीव विभागाने आता रतनगडावर गिर्यारोहण करून जाण्यासाठी फक्त ३०० लोकांनाच प्रवेश देण्याचा आदेश लागू केला आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) भंडारदरा या विभागाने हा आदेश दिला आहे. शनिवार-रविवार आठवड्याची सुट्टी असल्याने रतनगडावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच सदर ठिकाण स्थानिक वनकर्मचारी संरक्षण मजूर यांच्याकडून पर्यटक यांना वारंवार सूचना देऊन ही गडावरील आलेल्या पर्यटकांकडून नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे.

शनिवार-रविवार विकेंड सुट्टीला फक्त ३०० पर्यटकांना रतनगडावर जाता येईल याबाबत शेंडी व भंडारदरा पर्यटक चेक पोस्ट वर संबंधीत पर्यटक यांच्या पर्यटन शुल्क पावतीवर रतनगड परवाना संदर्भात शेरा देऊन त्यांना रतनगडावर पर्यटनासाठी जाण्याबाबत परवानगी देण्यात यावी.

तसेच रतनगडावर पावती तपासणी संदर्भात स्थानिक वनकर्मचारी व संरक्षण मजूर यांना सुचना देण्यात यावे. तसेच जे पर्यटक विना परवाना अथवा सुचना देवूनही रतनगडावर नियमांचे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा नोंद करावा.

सदर बाबतीत स्थानिक लोकांनमध्येही संरक्षणाच्या दृष्टीकोणातून पर्यटन जनजागृती करावी व रतनगडावर संरक्षण मजूरांची संख्या मध्ये वाढ करावी. असे आदेश गणेश रणदिवे सहाय्यक वनसंरक्षक (वन्यजीव), कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य यानी दिले आहेत.

(बातमीतील छायाचित्रे संग्रहित आणि प्रत्येकात्मक)

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!