पुणे – नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पा संदर्भात पुन्हा रेल्वे मंत्र्यांची भेट घेणार – देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी —

पुणे – नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पा संदर्भात आवश्यक त्या पूर्तता करून पुन्हा रेल्वेमंत्र्यांसमोर प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात येईल. तसेच प्रकल्प मंजुरीसाठी पाठपुरावा करण्यात येईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

पुणे – नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प बारगळणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. रेल्वे मंत्रालयाने काही बाबींना आक्षेप घेत हा प्रकल्प मंजूर केलेला नव्हता. सदर प्रकल्प रद्द होणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरू होती. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत रेल्वे प्रकल्पासंदर्भात आक्षेपांच्या संदर्भाने पूर्तता करून पुन्हा सादरीकरण करण्याचे स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशनने पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे संदर्भात रेल्वे मंत्र्यांनी केलेल्या सूचनांचा विचार करावा. तसेच त्याच्या पूर्ततासाठी आवश्यक ती कारवाई करावी. आणि महारेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत रेल्वेमंत्र्यांसमोर या प्रकल्पाचे पुन्हा सादरीकरण करण्यात यावे अशा सूचना देखील उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या आहेत.

मंत्रालयात या संदर्भात आणि विविध प्रकल्पांच्या संदर्भात उपमुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीसाठी वित्त विभागाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता, अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस. डी. सोळंके, महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल, मुख्य सल्लागार अशोक गरुड, पि.के. श्रीवास्तव, कार्यकारी संचालक सुभाष कवडे, वार रूमचे महासंचालक राधेश्याम मोपलवार आदी उपस्थित होते.

पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या प्रकल्पाची उपयुक्तता रेल्वे मंत्र्यांना पटवून देण्यासाठी देवेंद्र फडणवीस काही दिवसात रेल्वेमंत्र्यांची पुन्हा भेट घेणार आहेत. त्यांना या प्रकल्पाची व्यवहार्यता व महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करणार येणार आहे. या रेल्वे प्रकल्पाच्या मार्गावर सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व प्रकारची काळजी घेण्यात आलेली आहे. मात्र या संदर्भात रेल्वे मंत्रालयाचे काही आक्षेप असतील तर त्याची दुरुस्ती करून, निराकरण करून हा प्रकल्प मंजूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

खासदार कोल्हे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता

गेली अनेक वर्षे विविध टप्पे पार करून रेल्वे मंत्रालयाकडून अंतिम मंजुरीसाठी असलेल्या पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत आता तांत्रिक बाबी निर्माण केल्या जात आहेत. मुंबई-पुणे-नाशिक हा विकासाचा सोनेरी त्रिकोण साधण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून, त्याला खीळ घालण्याचे काम सध्या करण्यात येत आहे. त्यामुळे हा प्रकल्प होण्यासाठी प्रसंगी आंदोलनही करू, असा इशारा खासदार अमोल कोल्हे यांनी दिला होता.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!