“त्या” मोठ्या हॉस्पिटल जवळच्या जागेचे कचरा डम्पिंग ग्राउंड झाले !
थातूरमातूर साफसफाईचा दिखावा !!
प्रतिनिधी —
संगमनेर शहराला अगदी खेटूनच असलेल्या गुंजाळवाडी रोडच्या सुरुवातीला एका मोठ्या हॉस्पिटलच्या जवळच रस्त्यावर मोठी कचराकुंडी निर्माण करण्यात आली आहे. कचराकुंडी कसली एक छोटेसे डम्पिंग ग्राउंड तयार झाले आहे. अतिशय दुर्गंधीयुक्त कचरा त्या ठिकाणी टाकण्यात येत होता “संगमनेर टाइम्स न्यूज वेबसाईटने” या समस्येची छायाचित्रासह बातमी करताच खळबळून जागे झालेल्या कुठल्या तरी विभागाच्या प्रशासनाने काल त्या कचरा मैदानावर जेसीबी फिरवून “थातूर मातूर” साफ सफाई करण्याचा प्रयत्न केलेला दिसून आला आहे.

ग्रामपंचायतीच्या वतीने हि सफाई करण्यात आली की नगरपालिकेच्या वतीने हि सफाई करण्यात आली, किंवा खाजगी व्यक्तीने ही साफसफाई करून घेतली हे मात्र समजण्यास मार्ग नाही. मात्र काल जेसीबीच्या द्वारे थातूर मातूर साफसफाई करून कचरा वरचा खाली आणि खालचा वर केल्याने थोडेफार स्वच्छ दिसत असले तरी आज त्या ठिकाणची परिस्थिती पुन्हा बिघडण्यास सुरुवात झाली असून लगेचच कचरा येऊन पडला आहे.

आजूबाजूला तर घाणीचे साम्राज्य आहेच तर कचऱ्याचा ढिगार वर खाली केल्याने दुर्गंधी मात्र सुटली आहे. डुकरे मनसोक्त चरत आहेत. कचरा उचलण्याचा शो मात्र करण्यात आलेला आहे.

हे कचऱ्याचे छोटेसे डम्पिंग ग्राउंड नेमके कोणाच्या मालकीचे आहे ? ग्रामपंचायत हद्दीत आहे की नगरपालिकेच्या हद्दीत आहे ? की खाजगी आहे ? हे मात्र समजू शकले नाही.

नाहीतर हा चांगला मोक्यवरचा जागेचा तुकडा कोणीतरी उपटसुंभ ताब्यात घेऊ शकतो अशी चिन्हे आहेत. कारण मानुटी नदी (ओढा) अशीच गिळंकृत करण्यात आलेली आहे. शासनाच्या आजूबाजूच्या दुर्लक्षित पडेलेल्या जागा अर्धा गुंठा, एक गुंठा, दीड गुंठे, दोन गुंठे असे तुकडे, ज्याकडे लक्ष नाही, ज्याची नोंदी सापडत नाही अशा जागा काही भामट्यांनी हळूहळू हे कायदेशीर रित्या स्वतःच्या ताब्यात घेतल्या आहेत. असा प्रकार या डम्पिंग ग्राउंडचा होऊ शकतो.

संगमनेर शहरात स्वच्छ संगमनेर व सुंदर संगमनेर असा नारा देत नगरपालिकेचे काम चालू असले तरी ग्रामीण भागात हा नियम लागू नाही की काय असा प्रश्न पडला आहे. शहरात देखील ज्या मोजक्या आणि दिखाव्याच्या जागा आहेत त्या ठिकाणी स्वच्छता दिसते बाकी अनेक ठिकाणी स्वच्छता नसल्याचे दिसून येते.

गुंजाळवाडी ग्रामपंचायतचे दुर्लक्ष !
गुंजाळवाडी ग्रामपंचायत हद्दीत पावसामुळे खराब झालेले रस्ते, सार्वजनिक पाणीपुरवठा, स्वच्छता, कचराकुंड्या याबाबत ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी आहेत. मूलभूत समस्यांकडे गुंजाळवाडी ग्रामपंचायतचे दुर्लक्ष झाल्याचे आरोप ग्रामस्थ करतात.

नगरपालिकेला राष्ट्रीय पातळीवर तिसऱ्या नंबरचा पुरस्कार मिळाला असला तरी वस्तुस्थिती नेमकी पहायला हवी. प्रशासकीय अधिकाऱ्यांना वस्तुस्थिती माहित नाही असे नाही परंतु लपवाछपवी करण्यात संगमनेर मधील प्रशासकीय अधिकारी पटाईत आहेत.

गेल्या एक-दीड वर्षापासून नगरपालिकेवर प्रशासन काम करते. नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना आणि सध्या तरी अडगळीत पडलेल्या नगरसेवकांना शहराविषयी काहीही आस्था राहिल्याचे दिसत नाही. खुर्ची असेल तर शहरात काम करायचे अन्यथा शहर गेले वाऱ्यावर अशाप्रकारे तथाकथित नगरसेवकांचा विचार दिसतो.

