संगमनेर मधल्या सर्व अवैधंद्यांना पोलिसांचे आशीर्वाद !
वसुली करणाऱ्या दोन पोलिसांची चर्चा !
विशेष प्रतिनिधी —
नगर जिल्ह्यासह राज्यात वारंवार होणाऱ्या अवैध धंद्यांवरील कारवायांमध्ये संगमनेर शहरातील गुन्हेगारांची संख्या जास्त असून बऱ्याच टोळ्यांमध्ये संगमनेरच्या गुन्हेगारांचा सहभाग किंवा टोळीचे प्रमुख सूत्रधार असल्याचे उघड झाले आहे. असे होत असून देखील संगमनेर शहर आणि तालुक्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे बंद नसल्याचे उघड झाले आहे. या अवैध धंद्यांना पोलिसांचा आशीर्वाद असल्याने ते सुरू आहेत हे आता स्पष्ट झाले आहे.

अवैध कत्तलखाने : गोवंश हत्या !
संगमनेर शहरातील कुप्रसिद्ध अवैध कत्तलखाने गोवंश हत्या करण्यात संपूर्ण महाराष्ट्रात आघाडीवर आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून संगमनेरातल्या या अवैध कत्तलखान्यांमध्ये गोवंश जनावरांची, गाईंची मोठ्या प्रमाणावर हत्या केली जाते. शेकडो किलो मांस हे संगमनेर मधून संपूर्ण राज्यात पुरवले जाते. गोवंश मांसाची तस्करी करणाऱ्या अनेक टोळ्या संगमनेर मध्ये कार्यरत आहेत. अनेक गोवंश मांस वाहतूक करणारी वाहने पुणे, नगर, नाशिक, अगदी मुंबईकडे सुद्धा त्या त्या विभागातल्या पोलिसांनी पकडली. ती वाहतूक करणारे वाहने, त्यातील आरोपी हे संगमनेरचे असल्याचे वेळोवेळी आढळून आलेले आहे. असे असताना देखील हे अवैध कत्तलखाने अव्यहातपणे सुरू आहेत हे पोलिसांच्या आशीर्वादानेच होत आहे.

गांजा तस्करीचे केंद्र !
गांजा तस्करीवर देखील नगर जिल्ह्यात वेळोवेळी अनेक कारवाया झाल्या आहेत. अगदी मोठ्या प्रमाणात कारवाया झाल्या आहेत. यामध्ये देखील संगमनेरचेच गांजा तस्कर मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. काही वर्षांपूर्वी लाखो रुपयांची सौदेबाजी करताना पोलीसच गांजा तस्करीचे रखवालदार असल्याचे आढळून आले होते. त्यावेळी देखील संगमनेरचे आरोपी गांजा तस्करीत सूत्रधार होते. नगर जिल्हा असो मुंबई, ठाणे असो किंवा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर देखील या गांजा तस्करांची साखळी असून महाराष्ट्र बाहेरून मोठ्या प्रमाणात येणाऱ्या गांजा नुकताच तेलंगणा पोलिसांनी पकडला होता. या गांजाची किंमत सुमारे दोन कोटी रुपये होती. आणि या टोळीचा प्रमुख सूत्रधार संगमनेरचाच होता. मग संगमनेर मधील गांजा तस्करी कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे हे सर्व सामान्यांना समजणे अवघड नाही.

मटका किंग संगमनेर !
नगर जिल्ह्यात अवैध धंद्यांचे प्रमाण मोठे असतानाच संगमनेर शहर आणि तालुका हा संपूर्ण नगर जिल्ह्यात मटका स्पेशालिस्ट शहर व तालुका म्हणून ओळखला जातो. सर्वात मोठे मटक्याचे अड्डे संगमनेर शहरात नेहमी सुरू असतात. नाशिक परीक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने एकाच वेळी संगमनेर यात आठ दहा ठिकाणी छापे टाकून मटका किंग आणि मटका अड्डे चालविणारे गुन्हेगार पकडले होते. तरीही संगमनेरातला मटका हा सुरळीतपणे सुरू असतो. आजही तिच परिस्थिती आहे. त्यामुळे या धंद्याला पोलिसांचे आशीर्वाद असल्याचे स्पष्ट होत आहे.

गुटखा आणि जुगारांचे अड्डे नेहमीचेच !
अवैध गुटखा विक्री, जुगाराचे अड्डे, पत्त्यांचे क्लब यात देखील संगमनेर पूर्ण नगर जिल्ह्यात आघाडीवर आहे. वेळोवेळी लाखो रुपयांचा गुटखा संगमनेरात पकडला असून गुन्हेगारांवर कारवाया झाल्या असल्या तरी संगमनेर शहर आणि तालुक्यात सर्वच टपऱ्यांवर आणि काही किराणा दुकानांमध्ये गुटख्याच्या पुड्या बाजारात सहज विकत मिळतात. तसेच जुगार अड्डे देखील शहरासह उपनगरात आणि तालुक्यातील महत्त्वाच्या गावांमध्ये सुरू आहेत. या अड्ड्यांवर छापे टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्याच्या घटना घडल्या आहेत. दोनच दिवसापूर्वी संगमनेर शहर पोलिसांना आणि संगमनेरच्या पोलीस उपाधीक्षकांना समजून देता, कोणतीही भनक न लागून देता नगर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार घारगावच्या पोलीस निरीक्षकांनी संगमनेर मध्ये छापा टाकून सुमारे साडेपाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल व ११ जुगाऱ्यांवर कारवाई केली आहे. त्यामुळे हे जुगार अड्डे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत हे देखील उघड झाले.

वसुली करणाऱ्या दोन पोलिसांची चर्चा !
संगमनेर शहर आणि संगमनेर – अकोले तालुका उपविभाग या भागात अधिकाऱ्यांसाठी वसुली करण्यासाठी दोन पोलिसांची नियुक्ती करण्यात आल्याची चर्चा संगमनेरात जोरदारपणे रंगली आहे. स्थानिक न्यूज चॅनल आणि वृत्तपत्रातून देखील तशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात वसुली करण्यासाठी नेमण्यात आलेले पोलीस कर्मचारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयातील वसुली करणारे पोलीस यांच्या वसुल्यांच्या किश्श्यां बाबत अनेक चर्चा चव्हाट्यावर येऊ लागल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने शहरात चालणारे गांजा तस्करी, कत्तलखाने, जुगार अड्डे, मटका अड्डे, गुटखा अशा महत्त्वाच्या अवैध धंद्यांची वसुली या पोलिसांमार्फत केली जात असल्याचे बोलले जाते. अशा वसुल्या जर पोलीस कर्मचारी आपल्या अधिकाऱ्यांसाठी करतात तर हा गंभीर विषय असून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी यावर कडक पावले उचलायला हवीत.

एकंदरीत पाहता सर्व अवैध धंद्यांचे आगर संगमनेर शहर आणि तालुका असल्याचे निदर्शनास आले आहे. कारवाया होतात. गुन्हेगार पकडले जातात. पण तो दिखावा असल्याचे जाणवते. त्यांना आशीर्वाद देणारे आणि त्यांच्याशी संगणमत करणारे मात्र मोकळेच राहतात. त्यांच्यावर कारवाई कधी होणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

