‘त्या’ मूकबधिर विद्यालयात नेमकं काय झालं ?

सत्य बाहेर आणण्याची जबाबदारी आता पोलिसांची !

विशेष प्रतिनिधी —

संगमनेर मधील मूकबधिर विद्यालयातील एका बालिकेच्या शरीरावर विशेषतः गुप्तांगाजवळ जखमा आढळून आल्या. बालिकेच्या मामाने यासंदर्भात फिर्याद दिल्याने या विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक आणि एका अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

गून्ह्यामध्ये भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (posco) यातील काही कलमे वापरल्याने गुन्ह्याची गंभीरता अधिक वाढली. मात्र या कलमांचा अर्थ नीट माहित नसल्याने अनेकांनी या प्रकरणाची उलट सुलट चर्चा सुरू केली. त्यातून बालकाच्या नातेवाईकांसह संस्था चालकांना देखील मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे.

तर अशी आहे घटना…

समजलेल्या माहितीनुसार…. सदर बालिका ही दिव्यांग असल्याने तिच्या आई-वडिलांनी तिला संगमनेर येथील निवासी मूकबधिर संस्थेत दाखल केले. मधल्या काळात कोविड असताना सदर मुलीला पालक घरी घेऊन गेले होते. त्यानंतर शाळा सुरू झाल्यानंतर सदर मुलीला पुन्हा शाळेत आणून सोडले होते. या संस्थेचे दोन विभाग आहेत एक मूकबधिर विद्यालय आणि दुसरा मतिमंद मुलांचा विभाग सदर मुलगी मूकबधिर शाळेत होती.

साधारण एक ऑक्टोबर च्या दरम्यान सदर बालिकेच्या गुप्तांगाजवळ काही जखमा झाल्याचे शाळेतील शिक्षिकांना आढळून आले. परंतु या जखमा वाढत गेल्याने संबंधित शिक्षिकांनी मुलीच्या आई-वडिलांना या संदर्भात कळविले. मुलीचे आई-वडील घाबरले. ते मुलीच्या मामाला घेऊन संगमनेर येथे आले.

सुरुवातीला खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर मुलीला प्रवरानगर लोणी येथील रुग्णालयात दाखल केले. लोणी येथे उपचार केल्यानंतर सदर मुलीला नगर सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल करावे असे लोणी येथील डॉक्टरांनी सांगितले असल्याचे मुलीचे आई वडील, मामा सांगतात. मुलीच्या आई-वडिलांनी आजाराविषयी आणि जखमा विषयी माहिती विचारली असता डॉक्टरांनी आम्ही सदर अहवाल नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलला पाठवतो असे सांगितले असल्याचे म्हणणे आहे. त्यामुळे मुलीचे आई-वडील अधिकच घाबरून गेले आणि त्यांचा संशय बळावला.

मुलीला नगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर आई-वडिलांनी आणि मामांनी संबंधित शाळेत चौकशी केली. त्यावेळी येथील प्रभारी मुख्याध्यापकांनी प्रकरण किरकोळ आहे. कशाला वाढवता. वाद घालू नका. आपापसात मिटवून टाकू असे म्हटल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला. त्यामुळे त्यांचा संशय अधिक वाढल्याने त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली. मुख्याध्यापकांनी मुलीच्या आई-वडिलांना व नातेवाईकांना विश्वासात घेऊन व्यवस्थित आणि सत्य माहिती द्यायला हवी होती. तशी त्यांची जबाबदारी आहे.

संगमनेर शहर पोलिसांनी एका महिला अधिकाऱ्यामार्फत या संदर्भात चौकशी करून भारतीय दंड संहिता कलम ३५४, ३२४ तसेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा कलम ८, १० व २१ नुसार गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिसांकडून समजली.

भाजपची एन्ट्री..

बालिकेच्या संदर्भात गुन्हा असल्याने संगमनेर शहरातील भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले, सरचिटणीस जावेद जहागीरदार, सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ यांनी या प्रकरणी गांभीर्याने दखल घेऊन नगर पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. त्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यादेखील त्यांच्या सोबत असल्याची माहिती मिळाली. पोलीस अधीक्षकांना या प्रकरणी कसून चौकशी करावी अशी त्यांनी मागणी केली

चित्रा वाघ यांची भूमिका…

भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सदर संस्थेच्या मुख्यालयात संगमनेर येथे भेट दिली. त्या ठिकाणी उपस्थित असलेले एक मुख्याध्यापक, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, शिक्षिका व काही शिक्षक, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांची कार्यालयात एक बैठक होऊन या बैठकीत चित्रा वाघ यांनी संस्थेच्या शिक्षकांना चांगलेच धारेवर धरले. याचे सर्वच व्हिडिओ समाज माध्यमातून आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातून प्रसारित झाले आहेत.

लहान दिव्यांग बालकाच्या झालेल्या जखमा बद्दल शिक्षकांनी व संस्थाचालकांनी जो हलगर्जीपणा केला आहे तो अतिशय निंदनीय असल्याचे त्यांनी स्पष्ट म्हटले. संस्थाचालक रात्री अपरात्री फिर्यादींच्या घरी जातात. याप्रकरणी पोलिसांची जबाबदारी जास्त असून पोलिसांनी संपूर्ण गोष्टीचा कसून तपास करावा व दोषींवर कठोर कारवाई करावी अशी स्पष्ट मागणी त्यांनी पोलिसांकडे केली.

जबाबदारी असताना पोलिसांना माहिती कळवली नाही म्हणून गुन्हा दाखल झालेले प्रभारी मुख्याध्यापक यांनी त्यांची जबाबदारी व कर्तव्य व्यवस्थित पार पाडले नाही. दुसऱ्या अज्ञात इसमा बाबत अद्याप कुठलाच खुलासा होत नाही. पोलीसही त्यावर मौन बाळगून आहेत. पोलिसांनी तो दुसरा अज्ञात इसम शोधला पाहिजे.

आणि अफवांचे पेव फुटले..

 

सदर बालिकेवर अत्याचार झाल्याच्या अफवांचे पेव मात्र सर्वत्र फुटले. सोशल मीडियातून बालिकेचे गुप्तांग जाळले, तिला चटके, ज्वलनशील पदार्थ वापर, भाजल्याच्या जखमा, मुख्याध्यापकाने केला विनयभंग अशा आशयाच्या चर्चा प्रसारित होऊ लागल्या. फिर्यादीत मुलीच्या गुप्तांगाला चटके दिले असावेत असा उल्लेख आहे की नाही हे फक्त पोलिसांनाच माहित आहे. अर्थात वैद्यकीय अहवालानंतर व तपासाअंती ते समोर येईलच.

संस्थाचालक हे राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने या प्रकरणाने सोशल मीडियावर नेहमीप्रमाणे धुमाकूळ घातला. मात्र चित्रा वाघ यांनी सदर संस्था ही नामांकित संस्था आहे या संस्थेचे प्रमुख डॉक्टर आणि लोकप्रतिनिधी आहेत त्यामुळे अशा संस्थेत अशी घटना व्हायला नको होती अशी खंत व्यक्त केली. त्यांनी कुठल्याही प्रकारे वादग्रस्त विधान न करता कायदेशीर चौकशीची मागणी केली.

अफवांना पोलिसांची भूमिकाही कारणीभूत

परंतु राजकारण करणाऱ्या काही व्यक्तींनी व पढार्‍यांनी सोशल मीडियातून वादग्रस्त अशी वक्तव्ये वापरून प्रकरण बिघडवले असल्याचे बोलले जात आहे. सोशल मीडियातून लगेचच या घटनेबद्दल अफवा पसरल्या. विशेषतः बडी संस्था, लैंगिक शोषण अशा उलट सुलट चर्चा होऊ लागल्या. या संदर्भात पोलिसांनी देखील माध्यमांना व्यवस्थित माहिती दिली नाही. कायद्यानुसार पीडित बालिकेची ओळख ही जाहीर करायची नसते हे सर्वांना माहीत आहे. मात्र घटना काय घडली. फिर्यादित काय लिहिले आहे. गुन्हा कोणत्या स्वरूपाचा दाखल आहे. याची सुद्धा माहिती पोलिसांनी लपविण्याचा प्रयत्न केला.

इतर वेळी अगदी छोट्या गुन्ह्याची देखील पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली जाते. मात्र बालकांच्या अशा गंभीर गुन्ह्यांबाबत व्यवस्थित माहिती दिली जात नाही. बालकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि समाजासमोर व्यवस्थित आणि सत्य माहिती येण्यासाठी पोलिसांन पुढाकार घ्यायला हवा व जी माहिती गुप्त ठेवायची नसेल ती माहिती द्यायला हवी. प्रसार माध्यमांमधून देखील उलट सुलट बातम्या येऊ नये म्हणून पोलिसांनी जर माहिती दिली तर ती तेवढीच शाश्वत आणि सूत्रबद्ध पद्धतीने येते. पण संगमनेरचे पोलीस तसे करत नाहीत. त्यांना अडचणीच्या असलेल्या बातम्या दाबण्याचा त्यांचा प्रयत्न असतो असे अनुभव आहेत. या लपवाछपवीमुळे सर्वत्र संशयाचे वातावरण अधिकच वाढले.

त्यामुळे आता संगमनेर पोलिसांची जबाबदारी आहे की त्यांनी तपासातून सत्य बाहेर आणावे आणि नेमके काय घडले आहे याचा शोध घ्यावा व संबंधित दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. पूर्ण सत्य समोर आलेले नाही. वैद्यकीय अहवाल समोर आलेले नसताना विविध प्रकारच्या वावड्या सोशल मीडियातून उडविणाऱ्या व प्रसिद्धी साठी हपापल्यांनी केवळ राजकारण न करता बालिकेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!