संगमनेर शहराच्या विद्रूपीकरणात भर घालणारी अतिक्रमणे काढणार तरी कधी ?

नव्याने निर्माण झालेले भाजीपाला आणि फळ विक्रेते अड्डे, हातगाड्यांचे लाड किती दिवस ?

प्रतिनिधी —

संपूर्ण शहराला डोकेदुखी असलेली व शहराच्या वाहतुकीत अडथळा ठरलेली विविध प्रकारची अतिक्रमणे नगरपालिका काढणार तरी कधी असा सवाल उपस्थित झाला आहे.

 

एकेकाळी बस स्थानक ते बी एड कॉलेज सर्कल पर्यंतचा रोड रुंद रस्ता म्हणून ओळखला जात होता. आज हा रस्ता दोन्ही बाजूने अतिक्रमण झाल्यामुळे पूर्णपणे अरुंद झाला असून वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. विशेष म्हणजे बेकायदेशीर रिक्षा थांबे रस्त्याच्या दोन्ही बाजूने अतिक्रमण करीत असल्याने सुरुवातच तिथून होते. नगरपालिकेवर प्रशासन असल्याने सध्या रिकामटेकडे असलेले संगमनेर शहराचे सेवक शहराच्या मूलभूत समस्या सोडवण्यापासून पळ काढताना दिसत आहेत.

संगमनेर शहरात चौका चौकात अतिक्रमणांनी हैदोस घातला आहे. विविध प्रकारची अतिक्रमणे शहरांमध्ये करण्यात आली आहेत. नगरपालिकेचे प्रशासन ही अतिक्रमणे हटवण्यात साठी जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. अतिक्रमण हटाव पथक हे कागदावरच असून सध्या ते गायब आहे.

पारंपारिक भाजी बाजार वगळता शहरात नव्याने झालेले भाजीपाल्याचे, फळ विक्रीचे अड्डे नगरपालिका बंद कधी करणार असा सवाल नागरिकांनी केला आहे. ज्या कारणासाठी संगमनेर बस स्थानकाचे नूतनीकरण केले. आजूबाजूच्या सर्व टपऱ्या हटवल्या. त्या ठिकाणी पुन्हा हातगाड्या, अतिक्रमणे, फळांच्या दुकानांचे लाड किती दिवस करणार ? मालदार रोड, बी एड कॉलेज सर्कल, नवीन नगर रोड, सय्यद बाबा, चौक दिल्ली नाका परिसर, मेन रोड अशा विविध भागांमध्ये हातगाड्यांचे अतिक्रमण पुन्हा वाढलेले आहे. भाजीपाला विक्रेत्यांनी तर जागा आपल्याच मालकीची आहे अशा अविर्भावात जागा बळकावली आहे.

शहरातील मध्यवस्तीत असलेल्या माळीवाडा चौकातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून ते थेट शारदा संस्थेच्या मालपाणी विद्यालय आणि एलआयसी कार्यालयापर्यंत दोन्ही बाजूने थेट म्हाळुंगी नदीपर्यंत जे अतिक्रमण झालेले आहे ते कोणाच्या आशीर्वादामुळे टिकून आहे ? ते काढण्यासाठी नगरपालिकेची हिम्मत का होत नाही ?

नगरपालिकेने बाजाराच्या वसुलीसाठी केलेल्या लिलावाचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराला श्रीमंत करण्यासाठी, त्यांच्या तुंबड्या भरण्यासाठी कोणीही शहरात या कुठेही हातगाड्या लावा आणि दुकाने थाटा व ठेकेदारांना वसुलीसाठी पैसे द्या असा उद्योग नगरपालिकेच्या प्रशासनाकडून चालू असल्याचे आरोप होत आहेत.

हे अतिक्रमण काढणे नगरपालिकेच्या प्रशासनाची जबाबदारी असली तरी प्रशासनाकडून कोणतीही हालचाल होत नाही. मग सगळा नियमांचा, करांचा दंड व बोजा सर्वसामान्य नागरिकांनीच उचलायचा का असा सवाल देखील उपस्थित होत आहेत. नगरपालिकेवर प्रशासन येऊन एक वर्ष झाले आहे. जनहिताचे कुठलेही काम आणि मूलभूत समस्या सोडवण्याचे कुठलेही काम या प्रशासकांनी केलेले नाही. बिनकामाचे हे प्रशासक संगमनेरच्या नागरिकांच्या काय कामाचे ?

सत्ताधाऱ्यांनी मताच्या राजकारणासाठी संगमनेर शहरात अतिक्रमणे वाढून देऊन शहराचे वाटोळे करण्याचा विडा उचललेला दिसतो. विरोधकांना देखील अतिक्रमणे हटविणे जड जात आहे. साधी मागणी देखील त्यांच्याकडून केली जात नाही. त्यांची सुद्धा राजकीय दुकानदारी मतदानावरच अवलंबून असल्याने फक्त सोयीचे राजकारण करून आपल्या राजकीय पोळ्या भाजायच्या असे उद्योग सत्ताधारी आणि संगमनेरचे विरोधक करतात. अर्थात विरोधकांची संख्या किती ? हा देखील संगमनेरात संशोधनाचा विषय असल्याने संगमनेरचे मूलभूत प्रश्न सुटतील की नाही हा प्रश्न तरी सध्या रामभरोसे राहिलेला आहे.

शहरात अचानक वाढलेले भाजीपाला विक्रीचे अड्डे वाहतुकीसाठी अडथळा ठरत आहेत. पारंपारिक भाजीपाला विकण्याची ठिकाणे संगमनेरात मुबलक प्रमाणात आहेत. तरीही नव्याने झालेली ही अतिक्रमणे का काढली जात नाहीत. संगमनेर बस स्थानक समोर अगदी रस्त्यावर असलेली विविध फळ विक्रीची दुकाने, हातगाड्या कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत. हे एकदा नगरपालिकेच्या प्रशासकांनी जाहीर करायला हवे. त्यामागे कोणत्या आजी-माजी नगरसेवकांचा हात आहे किंवा दस्तूर खुद्द माजी नगराध्यक्ष यांचा त्यांना पाठिंबा आहे. या प्रश्नांची उत्तरे त्यांनी जनतेला द्यायला हवीत.

‘स्वच्छ संगमनेर, सुंदर संगमनेर, हरित संगमनेर बरोबरच अतिक्रमण आणि हातगाड्या, अतिक्रमणे बेकायदेशीर दुकाने यांनी नटलेले संगमनेर’ अशी नवीन घोषणा संगमनेरच्या सत्ताधाऱ्यांनी आणि आत्ता पालिकेवर हुकूम चालवणाऱ्या प्रशासनाने करायला हरकत नाही. संगमनेर नगरपालिकेच्या प्रशासनाने कधीतरी स्वतःहून कोणते तरी चांगले काम करायला हवे एवढीच एक अपेक्षा.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!