पुलाखाली जेसीबीच्या साह्याने मोठमोठे खड्डे केल्याने म्हाळुंगी नदीवरील पूल खचला ?
माजी नगरसेवकाने केला होता उद्योग…
प्रतिनिधी —
शहरातील साई मंदिराकडे जाण्यासाठी असणाऱ्या महाळुंगी नदीवरचा पूल नेमका कशामुळे खचला याची चर्चा सुरू असून साधारण दोन – तीन वर्षांपूर्वी एका माजी नगरसेवकाने पुलाच्या पायाच्या खाली जेसीबीच्या साह्याने मोठमोठे खड्डे घेतले, त्या ठिकाणची वाळू उपसली गेली. त्यामुळे पुलाचा बेस त्याचवेळी कमकुवत झाला होता. म्हणून हा पूल खचला असल्याची माहिती समोर आली आहे.

संगमनेर शहरातील माळुंगी नदीवरील साईबाबा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचा पूल खचला. पुलाचा काही भाग मोडकळीस आल्याच्या अवस्थेत आहे. त्यावरील पाणी पुरवठ्याची पाईपलाईन तुटल्याने शहरातील काही भागाचा पाणीपुरवठाही बंद झाला.अनेक नागरिकांचे आणि विद्यार्थ्यांचे हाल सुरू झाले आहेत.

हा पूल कशामुळे खचला याबाबत आता उलट सुलट चर्चा समोर येऊ लागली असून नागरिकांमधून बरीच माहिती मिळत आहे. हा पुल खचण्यात एका तत्कालीन नगरसेवकाने केलेला उद्योग कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.

साधारण दोन – तीन वर्षांपूर्वी एका नगरसेवकाने या परिसरातील कुठल्यातरी एका कामाच्या निमित्ताने महाळुंगी नदीमध्ये थेट जेसीबी घालून पुलाच्या खाली खड्डे केले. तसेच वाळूही उपसल्या गेली. या पुलाच्या पायाला नुकसान झाले असल्याचे बोलले जात असून त्यामुळे माळुंगी नदीला पाणी आल्यानंतर त्याचा परिणाम झाला आणि हा फुल खचला असल्याची शंका नागरिक व्यक्त करीत आहेत.

साधारण सन २००० ते २००२ च्या दरम्यान या पुलाचे काम झाले असल्याची माहिती समजली असून पुलाला २० ते २२ वर्षे झाले आहेत. पुलाचे काम मजबूत होते असे नगरपालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. हा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधला होता.

परंतु पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर देखभाल व दुरुस्ती नगरपालिकेने करायची की सार्वजनिक बांधकाम विभागाने करायची याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. तरीही हा पूल दुरुस्त करण्यासाठी नगरपालिका पुढाकार घेणार असल्याची माहिती समजली असून तशा पद्धतीचा पत्रव्यवहार पालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेला आहे.

नागरिकांची कामे किंवा सामाजिक कामे बेजबाबदारपणे आणि आपल्याला कोण अडवत ? या गर्वामुळे केल्याने शहराचे नुकसान होते हे आता संबंधित उद्योगी नगरसेवकाला समजले असेल, अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करतात.

तसेच नगरपालिकेच्या काही माजी नगरसेवकांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून, पुलाच्या संबंधित असलेल्या माजी कर्मचाऱ्यांकडून देखील या चर्चेला पुष्टी मिळत आहे. त्यामुळे पालिकेने अशा बेफाम वागणाऱ्या पदाधिकाऱ्यांना लगाम लावणे आवश्यक आहे.

जनतेच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची जबाबदारी नगरपालिकेची आहे. ती नगरपालिकेने कठोरपणे पाळणे आवश्यक आहे. या पुलाबरोबरच भूमी अंतर्गत गटारीच्या बांधकामाचे काही काम देखील तुटले. तेही नुकसान झाले आहे. पुलावरून पाणीपुरवठा करणारी जी लोखंडी पाईपलाईन जाते तीही तुटली. त्यामुळे शहराच्या काही भागातील पाणीपुरवठा बंद करावा लागला. अशा अनेक संकटांना पालिकेला सामोरे जावे लागले आहे.

पालिका प्रशासनाची धावपळ उडाली आहे. पुलाच्या पलीकडे राहणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. तिकडे असणाऱ्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची देखील अडचण होत आहे. लवकरात लवकर पुल दुरुस्त व्हावा अशी अपेक्षा नागरिक करत आहेत.

