स्वच्छ संगमनेरात प्रवेश करताच स्वागताला आहे कचराकुंडी !

प्रतिनिधी —

स्वच्छ संगमनेर…सुंदर संगमनेर…हरित संगमनेर या घोषणेची आता टिंगल टवाळी होऊ लागली आहे. शहरातील काही भागात आणि उपनगरात तसेच ग्रामीण भागात स्वच्छ, सुंदर आणि हरित संगमनेर ही संकल्पना लागू नसल्याचे उघड होत आहे. गुंजाळवाडी रोडला कचरा डेपो सापडल्यानंतर आता पुणे – नाशिक महामार्गावर संगमनेर शहरात प्रवेश करताना रस्त्याच्या कडेला कचराकुंडी स्वागत करीत असल्याचे चित्र आहे.

संगमनेर नगरपालिका प्रशासनाच्या ताब्यात गेल्यानंतर निदान आता सत्ताधाऱ्यांचा, राजकीय पुढाऱ्यांचा दबाव नसेल म्हणून प्रशासन चांगले काम करेल अशी अपेक्षा नागरिकांची असली तरी ती पूर्ण होताना दिसत नाही.

 

सध्या सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील उंच सखल भागात पाणी साचले आहे. चिखल झाला आहे. रस्ते खराब झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ही परिस्थिती आहे. मात्र नगरपालिकेकडून या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये ना मुरूम टाकला जात आहे. ना खडी टाकली जात आहे. किंवा रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी कुठलाही प्रयत्न केला जात नाही. प्रशासन नेमके काय करते हा सवाल निर्माण झाला आहे.

पाऊस झाल्यानंतर शहरातल्या काही भागात अक्षरशः पाण्याचे छोटे मोठे तळे निर्माण झालेले असतात. काही भागात तर पाण्याचे डबके अनेक दिवस तसेच असतात. उपनगरात रस्त्याच्या कोपऱ्यांना, झाडाखाली छोट्या-मोठ्या कचराकुंड्या तयार झालेल्या आहेत. एकंदरीत संगमनेर शहराचे वातावरण सध्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर असे दिसून येत आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!