संगमनेरात मोकाट जनावरांचा धुमाकूळ !
संगमनेर खुर्द मध्ये शेतकऱ्यांची उभी पिके फस्त करण्याचा सपाटा !!
प्रतिनिधी —
सध्या संगमनेर शहरासह उपनगर आणि संगमनेर खुर्द मध्ये मोकाट जनावरांनी धुमाकुळ घातला असून शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचा फडशा पाडण्याचा सपाटा लावला आहे.

मोकाट जनावरांचा त्रास संगमनेर शहरात नेहमीच होत असतो. शहरातील विविध मार्गांवर मोकाट जनावरांचे कळप निवांतपणे बसलेले असतात. याने वाहतुकीला अडथळा होतो. दिवाळीचा सण असल्याने रस्त्यावर गर्दी आहे त्यात मोकाट जनावरांचा त्रास सुरू झाला आहे.

तसेच उपनगरात देखील ही मोकाट जनावरे फिरत असतात. नागरिकांनी घराच्या समोर, व्हरांड्यात लावलेल्या फुल झाडांच्या विविध कुंड्यामधील झाडी खाऊन फस्त करण्याचा प्रकार किंवा धक्का लागून कुंड्या फुटण्याचा प्रकार होत आहे.

त्यामुळे नागरिकांचे नुकसान होते. जपलेली फुलझाडे तुटल्याने, वाया गेल्याने नाराजी होते. या जनावरांना पकडण्यासाठी नगरपालिका कुठलीच कारवाई करताना दिसत नाही.

तर दुसरीकडे संगमनेर शहराला लागूनच असलेल्या संगमनेर खुर्द मध्ये मोकाट जनावरांनी धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांची शेतातली उभे पिके फस्त करण्याचा प्रकार सुरू केला आहे. हा प्रकार सातत्याने होत असल्याचा तेथील शेतकरी सांगतात.

ही मोकाट जनावरे कोणाची आहेत हे समजू शकलेले नाही. मात्र ही जनावरे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांमध्ये घुसून ऊस, घास, मका व इतर पिके खाऊन फस्त करित आहेत. तसेच जनावरे उभ्या पिकांमधून फिरल्यामुळे पिकांची नासधूस होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

एक तर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. दुसरीकडे या मोकाट जनावरांचा त्रास. या सर्व प्रकाराने संगमनेर खुर्द मधील काही भागातील शेतकरी हवालदील झाले आहेत.

संगमनेर शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त केला जावा अशी नागरिकांची मागणी आहे तर संगमनेर खुर्द मध्ये ग्रामपंचायतीने या मोकाट जनावरांना आळा घालावा अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

