आता मात्र कहर झाला… प्रशासकीय अधिकारी तथा प्रांताधिकारी यांच्या बंगल्या शेजारीच कचराकुंडी !
स्वच्छ संगमनेर… हरित संगमनेर… नगरपालिकेचे नुसतेच बोलबच्चन !
प्रतिनिधी —
स्वच्छ संगमनेर… सुंदर संगमनेर… हरित संगमनेरच्या बाता मारणाऱ्या संगमनेर नगर परिषदेचे पितळ दिवसेंदिवस उघडे पडत चालले आहे. शहरात विविध ठिकाणी रस्त्यावरच कचराकुंड्या झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत असताना आता मात्र कहर झाला असून नगरपालिकेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी यांच्या शासकीय बंगल्या शेजारीच प्लास्टिकची कचराकुंडी तयार झाली आहे.

संगमनेर नगरपालिकेवर प्रशासकांची नियुक्ती झाल्यापासून सार्वजनिक स्वच्छता, सुविधा, आरोग्याची मोठी हेळसांड होत असल्याचे दिसून येत आहे. शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. बऱ्याच ठिकाणी कचराकुंड्या तयार झाल्या आहेत. स्वच्छतेचा अभाव आहे. नागरिक रस्त्यावरच कचरा फेकत आहेत. घंटागाड्या ‘घंटा’ वाजवत फिरत आहेत. तरीही काही भागात थेट कचराकुंड्या निर्माण झाल्याने नगरपालिकेचा स्वच्छतेचा दावा पुन्हा एकदा फोल ठरला आहे.

संगमनेर शहरालगतच असणाऱ्या एका बड्या हॉस्पिटल शेजारी गुंजाळवाडी रोड कडे जाणाऱ्या रस्त्यावर कचऱ्याचे छोटेसे डम्पिंग ग्राउंड तयार झाल्याचे उघड झाले होते. हे डम्पिंग ग्राउंड नव्याने तयार झालेल्या ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीत येत असल्याची माहिती समजली आहे.

ग्रामपंचायत मोठ्या थाटामाटा निर्माण केली. त्याची प्रसिद्धीही केली. मीडिया मधून श्रेय लाटण्याचे प्रकार झाले. मात्र ग्रामपंचायत आपले कर्तव्य किती प्रमाणात पार पाडते हे आता दिसून आले आहे.

त्यानंतर संगमनेर शहरात प्रवेश करताना जुन्या पुणे नाशिक महामार्ग जवळून येणाऱ्या रस्त्यावर कचराकुंडी झाल्याचे उघडकीस आले होते. येथे देखील विविध प्रकारचा कचरा टाकण्यात येत होता. यात प्लास्टिकचे प्रमाण जास्त होते. नगरपालिकेचे दुर्लक्ष यातून दिसून आले होते.

पावसामुळे शहरात असणाऱ्या उंच सखल भागात आणि रस्त्यांना पडलेल्या विविध खड्ड्यांमध्ये पाणी साचून गढूळ पाण्यामुळे दुर्गंधी येत आहे. शहरातील काही कोपऱ्यांमध्ये विविध प्रकारचे कचऱ्याचे छोटे-छोटे ढीग टाकण्यात आलेले आहेत.

“ओला कचरा, सुका कचरा” हा फक्त ‘बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी, असा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.
संगमनेर नगरपालिकेला स्वच्छतेबाबतचा राज्य, राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळालेला आहे. या पुरस्काराचे वाटोळे करण्याचे काम प्रशासन अगदी जोरदारपणे करत आहे. जाता जाता संगमनेरकरांना झटका देण्याचा प्रकार प्रशासनाकडून चालला आहे की काय अशी शंका नागरिक व्यक्त करतात. यावर उलट सुलट चर्चा सुरू आहे.

हे सगळे होत असताना… सगळ्यात मोठा कहर म्हणजे… संगमनेर शहरात इंदिरानगर परिसरात संगमनेरच्या प्रांताधिकार्यांचा शासकीय बंगला आहे. या बंगल्या शेजारी चक्क आता प्लास्टिकच्या कचऱ्याची कुंडी करण्यात आली असून उघड्यावर कचरा टाकण्यात आला आहे. प्रांत अधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरूळे हे सध्या संगमनेर नगर परिषदेचे प्रशासक आहेत.

प्रांत अधिकाऱ्यांच्या बंगल्या शेजारी हा कचरा कोणी आणून टाकला, कशासाठी टाकला, याकडे कोणाचे लक्ष नाही. नगरपालिकेची घंटागाडी येथे येते की नाही, कचरा उचलण्यासाठी किंवा सफाई करण्यासाठी कोणी कामगार येतात की नाही अशा विविध शंका उपस्थित होत आहेत.

