प्रांत अधिकारी यांच्या बंगल्या जवळील कचऱ्याची साफसफाई !
‘संगमनेर टाइम्स’ च्या वृत्ताने नगरपालिका ऍक्टिव्ह मोड मध्ये
प्रतिनिधी —
नगरपालिकेचे प्रशासक तथा प्रांत अधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे यांच्या बंगल्या शेजारी कचराकुंडी तयार झाल्याचे वृत्त ‘संगमनेर टाइम्स न्यूज पोर्टल’ मधून प्रसिद्ध होताच संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी त्वरित अधिकाऱ्यांना आदेश देत बंगल्याजवळचा कचरा उचलून घेत साफसफाई केली आहे.

संगमनेर शहरात आणि उपनगरात घंटागाड्या फिरत असून देखील बऱ्याच ठिकाणी नागरिकांनी फेकलेल्या कचऱ्याच्या कुंड्या तयार झाल्या आहेत. याची साफसफाई मात्र होताना दिसत नाही. घंटागाड्या कचरा गोळा करतात पण साफसफाई करणाऱ्या आणि घंटागाडी बरोबर फिरणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून बऱ्याच ठिकाणी या कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नसल्याचे उघड झाले होते.

स्वच्छ संगमनेर, सुंदर संगमनेर, हरित संगमनेर नगरपालिकेचे नुसतेच बोलबच्चन… ‘आता मात्र कहर झाला, प्रांत अधिकाऱ्यांच्या बंगल्या शेजारीच कचराकुंडी’ अशा मथळ्याचे वृत्त संगमनेर टाइम्स न्यूज पोर्टलवर आज प्रसिद्ध झाले.


त्यानंतर लगेचच दोन तासात मुख्याधिकाऱ्यांनी या वृत्ताची गंभीर दखल घेत प्रांत अधिकाऱ्यांच्या बंगल्या शेजारील कचरा उचलून घेत साफसफाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आणि घंटागाडी वरील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन कचरा उचलून घेत साफसफाई केली.

संपूर्ण शहरांमध्ये आणि उपनगरात कचरा गोळा करण्यासाठी घंटागाड्या फिरत आहेत. दिवाळीच्या दरम्यान कचरा पडण्याचे प्रमाण जास्त असते. नागरिकांनी देखील घंटागाड्यांमध्येच कचरा टाकावा. शहरातील उघड्या आणि मोकळ्या जागी गैरफायदा न घेता, त्या ठिकाणी कचरा न टाकता नगरपालिकेला संपर्क केला तरी नगरपालिका तो कचरा गोळा करून नेईल. आणि परिसर स्वच्छ करेल. शहर स्वच्छ करण्यासाठी नागरिकांनी देखील पुढाकार घ्यावा असे आवाहन मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी केले आहे.

