गुंजाळवाडी रोडला मोठ्या हॉस्पिटल शेजारी कचऱ्याचे ढीग !

स्वच्छ, सुंदर व हरित संगमनेर ची ऐशी तैशी

प्रतिनिधी —

स्वच्छ व सुंदर संगमनेर, हरित संगमनेर ही महत्त्वाकांक्षी योजना संगमनेर शहरात राबवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा आटापिटा चाललेला असतानाच संगमनेर शहरालगतच मेडिकव्हर हॉस्पिटलच्या (तांबे हॉस्पिटल) अगदी शेजारी गुंजाळवाडी रोडवर कचऱ्याचे मोठमोठे ढिगार पडलेले असून त्या ठिकाणी दुर्गंधी सुटलेली आहे. हा कचरा गेल्या अनेक दिवसांपासून उचलला गेला नाही.

संगमनेर नगरपालिकेच्या वतीने स्वच्छ व सुंदर संगमनेर हरित संगमनेर ही योजना तसेच पर्यावरण पूरक वृक्ष लागवड अशा अनेक योजना राबवल्या जात आहेत आणि पुढेही राबवल्या जातील. मात्र हे सर्व होत असताना जवळजवळ संगमनेर शहरात हॉस्पिटलच्या शेजारीच कचऱ्याचे ढीग पडलेले दिसून येत असल्याने ही स्वच्छता नेमकी कोण करणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आता हा कचरा रस्त्यावर येण्यास सुरुवात झाली आहे.

गुंजाळवाडी कडे जाणाऱ्या रस्त्यावर मेडिकव्हर हॉस्पिटलच्या पुढे सावित्रीबाई फुले नगर कॉलनी जवळ गंगासृष्टी रोडला हा कचऱ्याचा ढीग पडलेला असून यात कचऱ्याची दिवसेंदिवस भर पडत आहे. ग्रामीण भागात कचऱ्याचे असे ढीग जर उघड्यावर होत राहिले तर नागरिकांच्या आरोग्यास त्याचा धोका निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.

शिवाय एका मोठ्या हॉस्पिटल शेजारीच कचरा पडत असल्याने याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे ज्या जागेवर हा दुर्गंधीयुक्त कचरा टाकला जात आहे तिथे एक फलक लिहिण्यात आलेला असून या ठिकाणी कचरा, दुर्गंधीयुक्त कचरा, खाद्यपदार्थ, हॉटेलचे उरलेले अन्न टाकू नये असे स्पष्टपणे लिहिलेले असतानाही या ठिकाणी कचरा टाकण्यात येत आहे.

दरम्यान ग्रामीण भागात कचरा संकलन करून तो डम्पिंग करण्यासाठी आणि कचरा साठवण्यासाठी संगमनेर तालुक्यात चार ठिकाणी जागा पाहिल्या असून लवकरच त्यातील एखादी जागा निवडून कचरा डंपिंग करण्यात येणार आहे. व कचऱ्यापासून खत निर्मिती सुद्धा करण्यात येणार असल्याचे पंचायत समितीचे माजी उपसभापती नवनाथ अरगडे यांनी सांगितले.

ग्रामीण भागात कचरा साठवण्याच्या अडचणी होतात. अनेक नागरिकांचा कचरा डम्पिंग साठी विरोध असतो या सर्वातून लवकरच मार्ग काढून हा प्रश्न मार्गी लावावा लागणार आहे असेही त्यांनी सांगितले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!