“भय इथले संपत नाही ! केंद्रीय राज्य मंत्र्यांना भयमुक्तीचा आनंद !!

नगर जिल्ह्यात कोणाला कोणाची राजकीय भीती ?

विशेष प्रतिनिधी —

शिर्डी लोकसभा मतदारसंघ राजकीय भयमुक्त झाला असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी संगमनेर येथे नुकतेच केले आहे. नेमकी कोणाची कोणापासून भयमुक्ती हे मात्र गुलदस्त्यातच आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघ कोणत्या आणि कोणाच्या भयापासून मुक्त झाला हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही.

 

संगमनेर येथे आयोजित विविध कामांच्या उद्घाटनाच्या वेळी ते आले होते. प्रांत कार्यालयातील सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी त्यांनी पत्रकार परिषदेचे निवेदन करताना सुरुवातीलाच शिर्डी लोकसभा मतदारसंघ राजकीय भयमुक्त झाला असल्याचे मत व्यक्त केले.

राधाकृष्ण विखे पाटील हे महसूल मंत्री झाल्यामुळे आणि त्यांनी लोकाभिमुख आणि सामाजिक कामाचा धडाका लावल्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघ राजकीय भयमुक्त झाला असावा असे केंद्रीय राज्यमंत्र्यांना वाटले तर नाही ना ? कारण शिर्डीमध्ये कोणते राजकीय भय आहे हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

नगर जिल्ह्यात कोणाचे राजकीय भय कोणाला आहे हे सर्वश्रुत आहे. नगर जिल्ह्याचे राजकारण हे सहकारावर अवलंबून आहे. जिल्ह्याच्या सहकार सम्राटांनी आपली मजबूत पकड जिल्ह्याच्या राजकारणावर ठेवली आहे. विखे पाटील घराणे हे सहकाराचे जनक आहेत. सहकार त्यांच्या घरातून सुरू झालेला आहे. जिल्ह्यावर पकड ठेवण्याचा विखे पाटील परिवाराचा नेहमीच प्रयत्न असतो. स्वर्गीय पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्यापासून प्रेरणा घेऊन विखे घराण्याचे राजकारण सुरू आहे.

 

नगर जिल्ह्यातल्या दोन्ही लोकसभा मतदार संघात कोणाची कोणाला भीती वाटते हे ज्याचे त्यालाच माहित आहे. सहकार सम्राट यांच्या सहकारी संस्था साखर कारखाने, तथाकथित शिक्षण महर्षी यांच्या भल्या मोठ्या शिक्षण संस्थांमध्ये असलेले शिक्षक, कर्मचारी, सहकारी संस्थांमध्ये असलेले कामगार, मजूर आणि जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी भयमुक्त आहेत की नाही हे त्यांचे त्यांनाच ठाऊक.

 

त्यामुळे नेमके कोण भयमुक्त झाले हा एक संशोधनाचा विषय ठरत आहे. सर्वसामान्य नागरिकांना तशी कोणाचीच भीती नाही. मात्र राजकीय नेत्यांना एकमेकांची भीती आहेच. आणि केंद्रीय राज्यमंत्र्यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा राजकीय भयमुक्त झाल्या असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे भाजपाने विखे पाटलांना आपल्या पक्षात घेऊन शिर्डी लोकसभा मतदारसंघ भयमुक्त केला आहे की इतर राजकीय पक्षांपासून भयमुक्त केला आहे हा आता चर्चेचा विषय होऊ लागला आहे.

नगर जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सर्वच प्रकारच्या निवडणुकांच्या वेळी उभे असलेल्या विविध राजकीय पक्षांच्या आणि भाजपच्या सुद्धा उमेदवारांना कोणाचे राजकीय भय असते हे सांगण्याची गरज नाही. विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या राजकीय उमेदवारांना सर्वात जास्त भय कोणाचे वाटते हे त्यांनी केंद्रीय राज्यमंत्र्यांना एकत्रित येऊन सांगायला हवे किंवा त्यांची केंद्रीय राज्यमंत्र्यांनी भयमुक्ती केली असावी असेच असे आता विनोदाने म्हटले जात आहे.

राधाकृष्ण विखे पाटील आणि विखे पाटील घराण्याचे राजकारण नगर जिल्ह्यासह राज्याला सर्वश्रुत आहे. जनमानसावर असलेला प्रचंड सामाजिक व राजकीय प्रभाव. सर्वसामान्यांमध्ये असलेला थेट संपर्क, घराण्यातील प्रत्येक व्यक्तीला मिळालेल्या संधीनुसार त्यांनी केलेले राजकीय संधीचे सोने, या सर्व जमेच्या बाजू विखे पाटील परिवाराच्या पाठीशी आहेत. विखे पाटलांनी वेळोवेळी सत्तेच्या राजकारणासाठी राजकीय पक्ष बदलले आहेत ते कोणाच्या भीतीमुळे बदलले की त्यांच्या पक्षांतर्गत राजकीय संघर्षामुळे बदलले हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे भीती हा प्रकार विखे पाटील परिवाराला कधीच आडवा येऊ शकत नाही.

भीतीवर मात करून विखे पाटील राजकारण करत असतात अशी त्यांची ख्याती आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यात भीतीचे राजकारण आणि राजकारणाची भीती नेमकी कोणाला वाटते याची संपूर्ण माहिती केंद्रीय राज्यमंत्र्यांनी घ्यायला हवी. शिवाय कोणाला कशाची भीती आहे, हे संपूर्ण देश पाहत आहे. आणि कोण कशा आणि कोणत्या भीतीमुळे पूर्ण देशात राजकीय ‘कोलांट उड्या’ मारत आहे. हे ज्याचे त्यालाच माहित आहे. ‘भय इथले संपत नाही’ असे म्हणावे लागेल.

 

 

ज्या संगमनेरच्या भूमीवर केंद्रीय राज्यमंत्र्यांनी भयमुक्तीचे विधान केले त्या संगमनेरच्या भारतीय जनता पक्षाच्या संघटनेत देखील भयमुक्ती नेहमीच पाहायला मिळते. पक्षाच्या कुठल्याही राजकीय नेत्याचा, मोठ्या मंत्र्याचा कार्यक्रम असो वेगवेगळे गट भय न घेता कार्यक्रमाला गैरहजर असतात. कधी हा गट उपस्थित राहतो तर कधी तो गट उपस्थित नसतो. कधी हे हजर असतात तर कधी ते गैरहजर असतात. असे अत्यंत स्वातंत्र्य युक्त आणि भयमुक्त वातावरण संगमनेरच्या भाजप मध्ये तर नक्कीच असल्याचे बोलले जाते.

 

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!