श्रेय घेण्याची होतीये चढाओढ….
डॉ. जयश्री थोरात यांनी दिले बँकेचे पासबुक…..तर केंद्रीय राज्यमंत्री पटेल व महसूल मंत्री विखेंनी दिले प्रमाणपत्र…आणि वनविभागाने वर्ग केले खात्यात पैसे….
मेंगाळवाडी बिबट्या हल्ला मृत्यू प्रकरण
प्रतिनिधी —
मेंगाळवाडी येथील बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या मिराबाई रामभाऊ मेंगाळ या आदिवासी महिलेच्या कुटुंबाला शासनाकडून १० लाख रूपयांची मदत मिळाली आहे. सदर रक्कम वनविभागाने त्यांच्या खात्यात जमा केली. त्यानंतर त्या खात्याचे बँक पासबुक माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ. जयश्री थोरात यांनी मेंगाळ यांच्या कुटुंबियांना दिले. तर आज महसूल मंत्री विखे पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री पटेल यांनी वनविभागाचे प्रमाणपत्र मेंगाळ कुटुंबीयांना दिले.

मेंगाळवाडी येथे डाॅ. जयश्री थोरात यांच्या हस्ते मेंगाळ कुटुंबीयांना त्यांच्या बँक खात्यावर जमा झालेल्या दहा लाख रुपयांचे पासबुक देण्यात आले. यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद कानवडे, राजहंस दुध संघाचे संचालक विलास कवडे, नांदुरी गावचे माजी उपसरपंच मीनानाथ शेळके, निमगाव खुर्द सरपंच संदिप गोपाळे, मधुकर कानवडे, नाथु कातोरे, बाळकृष्ण गांडाळ आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.

मेंगाळवाडी येथील बिबट्याच्या हल्ल्यात मिराबाई रामभाऊ मेंगाळ ह्या मृत पावल्या. यानंतर तातडीने आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयाच्या माध्यमातून मेंगाळ कुटुंबीयांना मदत करण्यात आली. तसेच आमदार बाळासाहेब थोरात यांनी स्वतः जाऊन मेंगाळ कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी शासनाकडून सर्व योजनांमधून तातडीने या कुटुंबाला मदत मिळावी याकरता प्रशासनाला सूचना केल्या. यानुसार प्रशासनाच्या वतीने मेंगाळ कुटुंबीयांना दहा लाख रुपयांच्या धनादेश त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आला. अशी माहिती थोरात यांच्या यशोधन कार्यालयातून देण्यात आली आहे.
तर दुसरीकडे महाराष्ट्राचे कार्यसम्राट महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अथक प्रयत्नातून मेंगाळ कुटुंबीयांना दहा लाख रुपये मदत मिळाली असल्याची माहिती प्रमाणपत्र देण्याच्या फोटोसह सोशल मीडियातून व्हायरल केली जात आहे.
तर आज केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पाटील संगमनेर येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमासाठी आले असता प्रांत कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर वेळात वेळ काढून त्यांनी व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सदर मेंगाळ कुटुंबीयांना वनविभागाचे प्रमाणपत्र दिले आहे.

एकंदरीत मेंगाळ कुटुंबीयांना मदत करण्यासाठी महसूल मंत्री, केंद्रीय मंत्री, माजी महसूल मंत्री आणि वनविभाग व प्रशासन धावून आले. ही नगर जिल्ह्यातील राजकारणाची संस्कृती आहे. अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमधून मधून व्यक्त होत आहे.



