जे पार्टी जोडू शकत नाहीत ते देश काय जोडणार –  केंद्रीय राज्यमंत्री पटेल

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर टीका

प्रतिनिधी-

ज्यांच्याकडे नेतृत्व क्षमता, समज नाही ते आज देशभरात काँग्रेसची यात्रा घेवून निघाले आहेत. मात्र जे पार्टी जोडू शकत नाहीत ते देश काय जोडणार? असा सवाल अन्नप्रक्रीया उद्योग आणि जलशक्ती विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद पटेल यांनी केला. सत्तेपासून दूर झाल्यावर काँग्रेसला देशाची नाही, तर स्वता:च्या अस्तित्वाची चिंता निर्माण झाली असल्याची घणाघाती टीकाही त्यांनी केली.

लोकसभा प्रवास योजनेच्या पार्श्वभूमीवर प्रल्हाद पटेल यांनी शिर्डी लोकसभा मतदार संघात मागील दोन दिवसांपासून दौरा सुरु केला आहे. संगमनेर येथे त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना केंद्र सरकराच्या माध्यमातून सुरु असलेल्या योजनांची अंमलबजावणी तसेच देशात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सुरु असलेल्या कामांची माहिती दिली. याप्रसंगी महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयाचे प्रभारी रवी अनासपुरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, सरचिटणीस सुनिल वाणी, जालिंदर वाकचौरे आदी याप्रसंगी उपस्थित होते.

काँग्रेसच्या सुरु असलेल्या भारत जोडो यात्रेवर टीका करताना, प्रल्हाद पटेल म्हणाले की या पक्षाकडे आता नेतृत्व राहिलेले नाही. सत्तेपासून दूर गेल्यामुळे हा पक्ष बेचैन झाला आहे. ८० चे दशक असो की, आत्ताचे ज्या-ज्या वेळेस काँग्रेस सत्तेपासून दूर गेले त्यावेळेस या पक्षाने राष्ट्रविरोधी शक्तीशी हातमिळवणी करण्यासही मागेपुढे पाहिले नाही. पीएफआय संघटनेवर बंदी घातल्यानंतर कोणतीही प्रतिक्रीया या पक्षाकडून पुढे आल्याचे दिसत नाही. त्यामुळेच या पक्षाला देशापेक्षा स्वता:च्या अस्तित्वाची अधिक चिंता असल्याचा खोचक टोला त्यांनी लगावला.

मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करत आहेच, परंतू महागाई कमी करण्याची जबाबदारी सुद्धा सरकारने स्विकारली असून यासाठी देशातील जनतेचे जीवन अधिक सुकर होण्यासाठी योजनांचा आधार देण्याचे महत्वपूर्ण काम केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरु असल्याचे सांगतानाच अमेरिकेप्रमाणे भारतातही आता महिला आर्थिक क्षेत्रात करीत असलेल्या वेगवेगळ्या यशस्वी प्रयोगांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला निश्चितच बळ मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली ८ वर्षात देशामध्ये अमृतकाळ निर्माण झाला. २०२४ पर्यंत देशातील प्रत्येक माणसाला पाईपलाईन द्वारे ५५ लिटर शुद्ध पाणी देण्याचे उद्दीष्ट केंद्रसरकारने ठेवले असून, पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे म्हणून जागेची उपलब्धता सरकार करुन देत आहे. अन्नप्रक्रीया उद्योगाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेत मोठे योगदान दिले जात असून, यामुळेच देशाची अर्थव्यवस्था इंग्लंडलाही मागे टाकणारी ठरली आहे. २०३० पर्यंत भारताला जगाच्या पाठीवर दुसऱ्या क्रमाकांची अर्थव्यवस्था असणारा देश म्हणून ओळख होईल असा दावा त्यांनी केला. यापूर्वी देशात अनेक पक्षांची सरकारं सत्तेवर होती. परंतू मोदीजींच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच योजनांची वेळेत पुर्तता, सुरु असलेल्या योजनांचे कामं वेळेत पूर्ण करणे. याचा संकल्प झाल्यामुळेच देशामध्ये प्रथमच गरीबाला न्याय मिळत असून, यापूर्वीचे सरकार आणि मोदींचे सरकार यामध्ये निश्चितच फरक दिसत असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!