हिंदवी युवा मंडळाचा नवरात्र उत्सवानिमित्त भरगच्च कार्यक्रम !
आज सायंकाळी “गीत दरबार आईचा” भक्ती गीते व भजन कार्यक्रम
प्रतिनिधी —
गेल्या १९ वर्षांपासून सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि धार्मिक कार्यक्रम घेण्यात आघाडीवर असलेल्या संगमनेर शहरातील हिंदवी युवा कला व क्रीडा सांस्कृतिक मंडळ, संगमनेर शहर पोलीस स्टेशन समोर, स्वातंत्र चौक यांच्या वतीने आज नवरात्र निमित्त देवीच्या गीतांचा दरबार भरविण्यात येणार आहे. अशी माहिती हिंदवी मंडळाचे अध्यक्ष ओंकार सुनील गोडसे यांनी दिली आहे.

आज दिनांक २९ सप्टेंबर २०२२ (गुरुवार) रोजी सायंकाळी साडेसात (सा.७.३० वा.) वाजता कोविड योद्धा सन्मानार्थ प्रकाश पारखे निर्मित भजन संध्या “गीत दरबार आईचा” हा कार्यक्रम होणार आहे. तरी या कार्यक्रमाला शहरातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे अशी विनंती मंडळाच्या वतीने करण्यात आलेली आहे.

संगमनेर शहरातील कोविड योद्धे पोलीस अधिकारी, कर्मचारी, वैद्यकीय सेवेतील अधिकारी, डॉक्टर्स, नर्स, कर्मचारी, नगरपालिकेचे कर्मचारी, तहसीलदार, प्रांत कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी, अंगणवाडी सेविका, होमगार्ड कर्मचारी इत्यादी सर्व सरकारी कर्मचारी या सर्वांनी कोविड काळात स्वतःची व कुटुंबाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावले. त्यांचे अनमोल सहकार्य सर्व संगमनेर शहरातील नागरिकांना लाभले. त्यासाठीच हा कार्यक्रम आयोजित केला असल्याची माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन मंडळाच्या सर्व सदस्यांनी केले आहे.

“गीत दरबार आईचा” या कार्यक्रमात सुर नवा ध्यास नवा फेम गायक अविनाश कदम, मी होणार सुपरस्टार फेम वर्षा एखंडे व संगीत विशारद प्राध्यापक विनोद राऊत हे सहभागी होणार आहेत. कार्यक्रम संपल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

तसेच दिनांक ३० सप्टेंबर व १ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी महिलांसाठी संगत खुर्ची स्पर्धा (प्रवेश विनामूल्य) आयोजित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे २ ऑक्टोबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान विघ्नहर्ता बिट्स संगमनेर प्रेझेंट्स “लाईव्ह दांडिया आर्केस्ट्रा” चे आयोजन करण्यात आलेले आहे.

