सध्याच्या खोके सरकारने अंगणवाडी सेविकांच्या मानधनाला स्थगिती दिली — माजी मंत्री आमदार यशोमती ठाकूर

काँग्रेसमुळेच महिलांना आरक्षण व सन्मान 

जयंती महोत्सवानिमित्त भव्य महिला मेळावा 

प्रतिनिधी —

 

महाविकास आघाडी सरकारने राज्यातील जनतेसाठी अत्यंत चांगले काम केले. आपण अंगणवाडी सेविकांसाठी १५ हजार रुपये व मदतनीस यांच्याकरता १२ हजार रुपये मानधन मंजूर केले. मात्र सध्याच्या खोके सरकारने या मानधनाला स्थगिती दिली आहे. असा आरोप माजी मंत्री आमदार यशोमती ठाकूर यांनी केला आहे. सध्या आलेले हे अचानक सरकार हे स्थगिती सरकार आहे. असेही त्या म्हणाल्या

काँग्रेसचा विचार हा सर्वांना सोबत घेऊन जाणारा आहे. महिलांना बाबत समानता बाळगणे ही काँग्रेसची परंपरा आहे. राजकारणात सुद्धा महिलांना योग्य तो मान काँग्रेस पक्षाने दिला. पुरुषांच्या बरोबरने महिला काम करतात. त्यामुळे महिलांना आरक्षण देत त्यांचा सन्मान काँग्रेस पक्षाने केला असा दावा त्यांनी केला.

 

यशोधन कार्यालयाच्या प्रांगणात सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ.अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवात आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी आमदार बाळासाहेब थोरात हे होते. तर व्यासपीठावर माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, कांचन थोरात, सत्यजित तांबे, डॉ. जयश्री थोरात, शरयु देशमुख, सुवर्णा मालपाणी, लता डांगे, उत्कर्षा रुपवते, केशरबाई सानप, आंबाबाई मुंगसे, मीराताई शेटे, अर्चना बालोडे, सुनंदा जोर्वेकर, निर्मला गुंजाळ, पद्मा थोरात, प्रमिला अभंग, बेबी थोरात आदी उपस्थित होत्या.

आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात पुन्हा काँग्रेस पक्ष मजबूत होणार असून त्यांच्या नेतृत्वाखालील संगमनेर तालुक्याने राज्याला सर्वांगीण विकासाचा संस्कार दिला असल्याचे मत देखील माजी महिला व बालकल्याण विकास मंत्री आमदार ठाकूर यांनी व्यक्त केले आहे .

 

यावेळी बोलताना आमदार यशोमती ठाकूर म्हणाल्या की, थोरात परिवार हा संस्कारशील परिवार आहे. सर्वांचे आदर, गोरगरिबांचा सन्मान ही थोरात परिवाराची ख्याती आहे. या परिवारावर संगमनेर तालुक्याने भरभरून प्रेम केले असून आमदार बाळासाहेब थोरात यांनी तालुक्याचे नेतृत्व करताना संगमनेरच्या रचनात्मक विकासाचा संस्कार राज्याला दिला आहे. महाविकास आघाडी सरकारने राज्यातील जनतेसाठी अत्यंत चांगले काम केले. आपण अंगणवाडी सेविकांसाठी १५ हजार रुपये व मदतनीस यांच्याकरता १२ हजार रुपये मानधन मंजूर केले.

मात्र सध्याच्या खोके सरकारने या मानधनाला स्थगिती दिली आहे. सध्या आलेले हे अचानक सरकार हे स्थगिती सरकार आहे. संगमनेर तालुक्यातही काही उपद्रवी शक्ती त्रास देऊ शकतात. मात्र आमदार थोरात यांचे नेतृत्व खंबीर असून जनता त्यांच्या पाठीशी उभी आहे. काँग्रेसचा विचार हा शाश्वत असून खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला भाजपा घाबरले आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात काँग्रेस पुन्हा एकदा भरारी घेणार असून २०२४ मध्ये राज्यात काँग्रेसची सत्ता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याच वेळी संगमनेर तालुक्यात महिलांचा होणारा सन्मान हा राज्यासाठी दिशादर्शक असल्याचेही त्या म्हणाल्या.

तर आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकारातून तालुक्यात समृद्धी आली. तर डॉ. अण्णासाहेब शिंदे यांनी हरितक्रांतीतून देशात समृद्धी आणली. या महान विभूतीं बरोबर यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील या सर्वांचे विचार पुढील पिढ्यांपर्यंत घेऊन जाण्याकरता जयंती महोत्सवाचा कार्यक्रम होतो आहे. काँग्रेस पक्षाने महिलांना ५० टक्के आरक्षण दिले महिलांनी या आरक्षणातून आपली क्षमता सिद्ध केली असून आज विविध पदांवर महिला अत्यंत कार्यक्षमपणे काम करत आहेत .

संगमनेर तालुका हा राज्यातील सर्वाधिक सुसंस्कृत, शांत आणि चांगले वातावरण असणारा तालुका आहे. चांगल्या कामामुळे या तालुक्याचा लौकिक होतो आहे. आपण सातत्याने गोरगरीब जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले आहे. मात्र या तालुक्यातील शांतता काही शक्तींना पावत नाही म्हणून ते त्रास देण्याचा प्रयत्न करतील. मात्र संकट काळातही आपण सर्वांनी भक्कम राहून राज्याला आपण ताकद दाखवू असेही ते म्हणाले.

दुर्गा तांबे म्हणाल्या की, संगमनेर तालुक्यात महिला बचत गटाचे मोठे जाळे आहे. जुन्या पिढीने संस्कृती टिकवली आहे. तो वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. मोठ्या कष्टातून उभे राहिलेले तालुक्याचे कुटुंब असून हे सर्वांना जपायचे आहे. डॉ. जयश्री थोरात यांनी मथुरागिनी या उपक्रमाची माहिती दिली. यावेळी संगमनेर तालुक्यातील विविध महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जयश्री थोरात यांनी केले तर वृषाली साबळे यांनी आभार मानले.

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!