पुणे ते मंत्रालय शिक्षकांची पायी दिंडी !
आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांचा सहभाग

प्रतिनिधी —
राज्यातील शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी, मागण्यांसाठी आणि त्याच्या व्यथा मांडण्यासाठी पुणे ते मंत्रालय अशी पायी दिंडी सुरू करण्यात आलेली आहे. या पायी दिंडीमध्ये पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी सहभाग घेऊन शिक्षकांचे मनोबल वाढवले आहे. व त्यांना समर्थन व्यक्त केले आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटली तरी स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवी वर्षातही हजारो शिक्षक बिनपगारी काम करत आहेत. या शिक्षकांच्या व्यथा शासन दरबारी मांडण्यासाठी राज्यातील विविध विभागांच्या शिक्षक आमदारांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील भिडे वाडा ते मुंबईतील मंत्रालयापर्यंत पायी दिंडी काढण्यात आली आहे.

या दिंडीला पाठिंबा देण्यासाठी सहभागी डॉक्टर तांबे सहभागी झाले होते. या दिंडी सहभागी होऊन त्यांना सक्रिय सहकार्य व शुभेच्छा देऊन शिक्षक बंधू-भगिनींचा उत्साह वाढविला. पुणे कामशेत परिसरात आमदार तांबे दिडींत पायी चालले. दिंडीतील या ‘वारकऱ्यांशी’ संवाद साधून त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले.

अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील प्रस्तावित/वाढीव शिक्षकांच्या पदांना तात्काळ वेतनासह मान्यता देणे, शासन स्तरावर ३९६१ अघोषित शाळा व नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांची यादी तात्काळ घोषित करणे, त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांचा शासन निर्णय तात्काळ निर्गमित करणे, १५ नोव्हेंबर २०१८ चा शासन निर्णय लागू करून प्रचलित धोरण सर्व विनाअनुदानित / अंशतः अनुदानित सेवकांना सुरू करणे, विना अनुदानित / अंशतः अनुदानित सेवकांना सेवा संरक्षणाचा शासन निर्णय निर्गमित करणे, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे या प्रमुख मागण्यांसह ही पायी दिंडी निघाली आहे.

