येणारा काळ भारताच्या उज्ज्वल भविष्याचा — केंद्रीय राज्यमंत्री पटेल

प्रतिनिधी —

 

देशातील ग्रामीण भागाचा विकास करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जात, धर्म, पंथ याचा कुठेही अडसर येवू दिला नाही. शौचालयापासून ते पिण्याच्या पाण्यापर्यंत योजनारुपी सहकार्य करताना, त्यांनी सामान्य माणूसच केंद्रीभूत मानला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या विचारातून देशाच्या विकासाचे सत्य जगासमोर आणले. येणारा काळही ग्रामीण भारताच्या उज्ज्वल भविष्याचा अमृतकाळ असेल असे प्रतिपादन केंद्रीय अन्नप्रक्रीया आणि जलशक्ती विभागाचे राज्यमंत्री प्रल्हाद पटेल यांनी केले.

भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा प्रवास योजने अंतर्गत उत्तर नगर जिल्ह्यातील सरपंच, जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती सदस्यांचा लोकप्रतिनिधी मेळावा संगमनेर येथे संपन्न् झाला. या मेळाव्यात मंत्री प्रल्हाद पटेल यांनी ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींची जबाबदारी आणि मोदी सरकारने मागील आठ वर्षात ग्रामीण भागाकरीता निर्माण केलेल्या पायाभूत सुविधांची माहिती आपल्या भाषणातून दिली. भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या लोकप्रतिनिधी मेळाव्यास राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, लोकसभा मतदार संघाचे प्रभारी आमदार डॉ.राहुल आहेर, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, सरचिटणीस जालिंदर वाकचौरे, भाऊसाहेब फुलारी, ॲड.बापूसाहेब गुळवे, वसंतराव देशमुख, डॉ.सोमनाथ कानवडे, तालुकाध्यक्ष डॉ.अशोक इथापे, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीष कानवडे, शहराध्यक्ष ॲड.श्रीराम गणपुले, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष श्रीराज डेरे, जि.प.सदस्या रोहिणी निघुते, रविंद्र थोरात, अमोल खताळ आदी याप्रसंगी उपस्थित होते.

आपल्या भाषणात मंत्री पटेल म्हणाले की, ग्रामीण विकासाचा मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिला. गावाचा विकास करताना, प्रत्येक घटक हा केंद्र सरकारच्या योजनेचा लाभार्थी बनला आहे. प्रत्येक माणसाला योजनेचा लाभ देताना, मोदींनी विकासाचा विचार डोळ्यासमोर ठेवला. योजनांची अंमलबजावणी करताना कुठेही जात धर्म पंथ याचा अडसर त्यांनी येवू दिला नाही. सत्तेसाठी नव्हे तर विकासासाठी भारतीय जनता पक्षाने या देशात प्रदीर्घ केलेली वाटचाल ही विचारांच्या आधारावर केली. त्यामुळेच यापक्षाचा जनाधार वाढत गेला. लोकांची विश्वासार्हता देखील मोदी सरकारच्या बाजूने दिसत असल्याचे त्यांनी आवर्जुन नमूद केले.

देशामध्ये आज मोदीजींच्या संकल्पनेतून जलजीवन मिशन कार्यान्वित झाले आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक कुटूंबाला शुद्ध पाणी देण्याचे उद्दीष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. यासाठी साठ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, कुठल्या राज्यात कोणत्या पक्षाचे सरकार आहे. हा विचार न करता या योजनेचा लाभ सर्वांना देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचा आहे. या योजनेतील साठ टक्के रक्कम ही केंद्र सरकारची आहे. याची जाणीव मात्र महाराष्ट्रातील मागच्या सरकारने ठेवली नव्हती. याकडे लक्ष वेधत मंत्री पटेल म्हणाले की, मोदींच्या दूरदृष्टीमुळे भारत देश अन्नधान्य उत्पादनात आघाडीवर आला आहे. ठिकठिकणी वेअरहाऊस निर्माण केल्यामुळेच शेतकऱ्यांना धान्य साठवता आले. हे साठविलेले धान्य कोव्हीड संकटात देशातील ८० कोटी लोकांना गरीब कल्याण योजनेतून मोफत देता आले. ही केंद्र सरकारची सामाजिक दायित्वाची भूमिका जगाच्या पाठीवर कौतुक करणारी ठरली असल्याचे त्यांनी सांगितले.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, यापूर्वी केंद्र सरकारच्या सगळ्या योजनांचे श्रेय घेण्यात मागील आघाडी सरकार माहिर होते. वेळप्रसंगी योजनांच्या अंमलबजावणीत अडथळेही निर्माण केले जात होते. परंतू आता राज्य सरकार केंद्राच्या सर्व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करेल, अशी ग्वाही देवून त्यांनी सांगितले की, ग्रामीण विकासाचा अजेंडा मागील आठ वर्षात भारतीय जनता पक्षाच्या सरकारनेच देशभरात यशस्वी करुन दाखविला. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांपासून ते लोकसभेच्या निवडणूकीतही शिर्डी लोकसभा मतदार संघ शत प्रतिशत भाजपा करण्यासाठीचे आवाहन त्यांनी केले.

मतदार संघाचे प्रभारी आमदार डॉ.राहुल आहेर यांनी आजचा हा लोकप्रतिनिधींचा मेळावा म्हणजे लोकसभा निवडणूकीची नांदी असून, याची सुरुवात संगमनेर विधानसभा मतदार संघातून आजपासून झाली आहे. येणाऱ्या १८ महिन्यांत गावपातळीवर आणि बूथस्तरावर योजनांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी रोहिणी निघुते, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, यांची भाषणं झाली. कार्यक्रमाचे प्रास्तविक सतिष कानवडे यांनी केले. या कार्यक्रमास शिर्डी लोकसभा मतदार संघातील सर्व तालुक्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!