राज्यातील सर्व जनता सुखी समाधानी होऊ दे — आमदार थोरात
प्रतिनिधी —
दोन वर्षाच्या कोरोना संकटानंतर यावर्षी राज्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. हा गणेशोत्सव सर्वांसाठी मोठ्या भक्तीभावाचा व आनंददायी आहे. यावर्षी राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडून राज्यातील सर्व जनता सुखी समाधानी व आनंदी होऊ दे. अशी प्रार्थना माजीमंत्री व काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

यशोधन जनसंपर्क कार्यालय येथे श्री गणेशाची आरती आमदार थोरात यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष नितीन अभंग, उपसभापती नवनाथ अरगडे, कार्याध्यक्ष सुभाष सांगळे, एनएसयुआयचे तालुकाध्यक्ष गौरव डोंगरे, संदीप नागरे आदींसह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी शुभेच्छा देताना आमदार थोरात म्हणाले की, गणेश उत्सव ही महाराष्ट्राची मोठी परंपरा आहे. दोन वर्षाच्या कोरोना संकटामुळे हा उत्सव आपल्याला साजरा करता आला नाही. कोरोना संकट नसल्यामुळे सर्वत्र अत्यंत आनंदाचे वातावरण आहे. राज्यभरात मोठा उत्साह आहे .

पाऊसही चांगला झालेला आहे. धरणे ही भरली आहेत.या निमित्ताने सर्व नागरिकांच्या जीवनामध्ये सुख, समाधान मिळवून सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे. अशी प्रार्थना यावेळी आमदार थोरात यांनी केली .
त्याचबरोबर गणेशोत्सव हा सर्वांनी एकत्र येऊन करण्याचा उत्सव आहे. संकटावर मात करणाऱ्या विघ्नहर्त्याचा हा उत्सव असल्याने सर्वधर्मसमभावाची परंपरा जपत संगमनेर शहरात व तालुक्यातही अत्यंत मोठ्या आनंदाने हा उत्सव साजरा होत असल्याचेही ते म्हणाले.

अमृत उद्योग समूहाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून अमृत सांस्कृतिक मंडळाच्या वतीने कारखाना कार्यस्थळावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे कार्यक्रम संगमनेर मधील नागरिकांसाठी मोठी पर्वणी ठरत आहेत.

