मुळा नदीतील वाळू उपसा थांबवा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन !
गणेश धात्रक यांचा इशारा
प्रतिनिधी —
अनधिकृत वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रोत्साहन देऊन कर्तव्यात कसूर केल्याबद्दल मंडलाधिकारी, तलाठी, पोलीस पाटील व कोतवाल यांना निलंबित करून विभागीय चौकशी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे आत्मदहन करणार असल्याचा इशारा संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश उर्फ देवराम सिताराम धात्रक यांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, मौजे नांदुरखंदरमाळ, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर या तलाठी सजा मधील खैरदरा तसेच मुळा धरण संपादित क्षेत्रातील मोरेवाडी तसेच येठेवाडी व लहूचा मळा परिसरातून गेली अनेक वर्ष मुळा नदीपात्रातून तसेच खाजगी क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाळू उपसा केला जात आहे.

याबाबत अनेकवेळा आपणाकडे तसेच आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा कुठलीही दखल घेतली गेली नाही. तीन-चार महिन्यांपूर्वी राज्यस्तरीय भरारी पथक तसेच जिल्हास्तरीय भरारी पथकाने स्वतंत्र कारवाई करून मोठ्या प्रमाणात वाळू साठा जप्त केला होता. त्यांनी जप्त केलेला वाळू साठा सुद्धा चोरीस गेला. याबाबत अद्याप पर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही.

नदीपात्रात पाणी असताना तस्करांनी नदीपात्रात उत्तर-दक्षिण असा भरावा टाकून सेतू तयार केला वर्तमानपत्रात बातम्या झाल्यानंतर थातूर मातुर कारवाई करून सदर तस्कर निर्मितीचे सेतु नष्ट केल्याचा गवगवा केला गेला. एक दोघांवर गुन्हाही दाखल झाला होता मात्र त्याच सेतूवरून आजही चोरटी वाळू वाहतूक चालू आहे. याबाबत तलाठी व मंडळाधिकारी यांनी अद्याप पर्यंत एकाही वाहनावर कारवाई केल्याचे ऐकिवात नाही. तसेच वाळू तस्करी रोखण्यासाठी कुठलेही पाऊल उचलले नाही.

त्यामुळे या बाबतीत आपण व्यक्तिशः लक्ष घालून सदर मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल यांना यांना तात्काळ निलंबित करून यांची विभागीय चौकशी करावी अन्यथा सोमवार, दिनांक २७ जून २०२२ रोजी सकाळी ११ वाजता आपल्या कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे. याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील याची कृपया नोंद घ्यावी. असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनाच्या प्रती विभागीय महसूल आयुक्त व अहमदनगर पोलिस अधीक्षक यांना देण्यात आल्या आहेत.
