संगमनेरचे वादग्रस्त पोलीस निरीक्षक देशमुख यांची तडकाफडकी बदली !

विभागीय चौकशीनंतर हे आदेश काढण्यात आले असल्याची माहिती

प्रतिनिधी –

संगमनेर आणि श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे चौकशी आणि कसुरी गोपनीय अहवाल आणि पोलीस अधीक्षक अहमदनगर यांच्या चौकशी आदेशांच्या अनुषंगाने अखेर संगमनेरचे वादग्रस्त पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांची आज तडकाफडकी अहमदनगर नियंत्रण कक्षात बदली करण्यात आलेली आहे.

देशमुख यांनी तात्काळ बदलीच्या ठिकाणी हजर होऊन अहवाल सादर करावा असे आदेश बजावण्यात आले असून संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजीत ठाकरे यांच्याकडे संगमनेर शहराचा प्रभारी चार्ज देण्यात आला आहे. अहमदनगर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी हे आदेश बजावले आहेत.

साधारण २०२२ दरम्यान संगमनेर शहर पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या कारभाराविषयी अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या.

संगमनेर शहरातले अवैध व्यवसाय जुगार, मटका अड्डे तसेच सातत्याने होणाऱ्या बेकायदा गोवंश कत्तली, राजकीय दबावाखाली येऊन विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांवर कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे, पत्रकारांविषयी असलेला आकस या सर्वच बाबींच्या तक्रारी पोलीस अधीक्षकांपासून थेट गृहमंत्र्यांपर्यंत आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत करण्यात आल्या होत्या.

राजाश्रयामुळे देशमुख यांची बदली करण्यात येत नव्हती. मात्र राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर काही दिवसातच देशमुख यांची तातडीने बदली करण्यात आलेली आहे. संगमनेर येथे कार्यरत असताना देशमुख हे स्थानिक सत्ताधाऱ्यांचे हातचे बाहुले बनले असल्याचे आरोप देखील करण्यात आले होते. एकंदरीत देशमुख यांचा कार्यकाल हा या ना त्या कारणाने वादग्रस्त ठरला होता.

विविध प्रकारचे तक्रार अर्ज, तसेच चौकशीची मागणी, आंदोलनाचे इशारे यामुळे देशमुख यांची विभागीय चौकशी सुद्धा सुरू होती. नगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आदेश काढला असून देशमुख यांची बदली नगर येथे नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख हे आदेशाप्रमाणे कार्यवाही करत पोलीस नियंत्रण  कक्षात कामावर रुजू झाले आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!