वादग्रस्त पोलीस निरीक्षक देशमुख यांची बदली –
भाजप पदाधिकाऱ्यांनी फोडले फटाके आणि वाटले पेढे !
प्रतिनिधी –
संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे वादग्रस्त पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांची अखेर तडकाफडकी बदली झाल्यानंतर देशमुख यांच्या विरोधात सातत्याने आवाज उठवणारे भाजपचे पदाधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देशमुख यांच्या बदलीचा संगमनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

संगमनेर शहर भाजपा, बजरंग दल आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या कार्य पद्धतीबाबत अनेक वेळा आवाज उठविला होता. देशमुख हे चुकीच्या पद्धतीने काम करत असून तत्कालीन सत्ताधिकार्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप त्यांच्यावर वेळोवेळी झाला. यात भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आघाडीवर होते.

संपूर्ण महाराष्ट्रात कुप्रसिद्ध असलेल्या संगमनेर शहरातील कत्तलखान्यांबाबत पोलीस कुठलीच कारवाई करत नाहीत यावरून मोठा गदारोळ झाला होता. संगमनेर शहरातल्या बेकायदा कत्तलखान्यांमध्ये रोज गोवंश हत्या मोठ्या प्रमाणावर होत असते. या गोवंश हत्येच्या कारवाया आणि त्याबाबत होणारी छुपाछूपी आणि चिरीमिरीची गडबड कार्यकर्त्यांनी उघडकीस आणली होती.

पोलीस निरीक्षकांच्या अधिपत्याखाली या कत्तलखानांवर कुठलीच कारवाई होत नव्हती. पोलीस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक, विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या विशेष पथकांनी येऊन संगमनेरात कारवाई केल्यानंतर संगमनेर शहराचे पोलीस प्रशासन जागे होत होते. त्यामुळे संगमनेर शहर पोलीस स्टेशनचा कारभार चव्हाट्यावर आला होता.

याबाबत संगमनेर शहर भाजप आणि बजरंग दलाने आक्रमक पवित्रा घेत पोलीस निरीक्षक देशमुख यांच्याविरुद्ध आंदोलन करीत त्यांची बदली करावी व चौकशी करावी अशी मागणी केली होती.
संगमनेर शहरात सर्रासपणे सुरू असलेले जुगार अड्डे, मटक्याचे अड्डे, गांजा तस्करी, वाळू तस्करी यासंदर्भात देखील संगमनेर शहर पोलिसांकडून कुठलीही कारवाई होत नव्हती. अनेक वेळा या अवैध व्यवसायांच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. हे वादग्रस्त व्यवसाय नेहमीच संगमनेरच्या शांतता व सुव्यवस्थेसाठी घातक होते. तरीही कारवाई होत नव्हती.

वादग्रस्त पोलीस निरीक्षक देशमुख तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि सत्ताधाऱ्यांचे नातेवाईक असल्याने ते काँग्रेस कार्यकर्त्यांविषयी झुकते माप ठेवून विरोधकांना त्रास देतात. तसेच कारवाई करण्याच्या धमक्या देतात. असे आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ यांनी देखील केले होते. देशमुख यांच्या वादग्रस्त कार्यपद्धतीच्या चित्रफिती, फोटोग्राफ्स त्यांनी पोलीस आयुक्तांसह, गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना दिल्या होत्या. पुराव्यासह आरोप होऊन देखील त्यांची बदली किंवा चौकशी होत नव्हती. मात्र राज्यात सत्ता बदल होताच त्यांची तात्काळ बदली करण्यात आलेली आहे.

निलंबना साठी प्रयत्न !
संगमनेर शहर पोलिस निरीक्षक देशमुख यांची मनमानी खूपच वाढली होती. त्यांच्या आशीर्वादाने गोवंश अवैध कत्तलखाने सर्रास सुरू होते. तसेच इतर अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू होते. पोलिसांची जनमानसातील प्रतिमा देशमुख यांच्यामुळे धुळीस मिळाली होती. पंचवटी हॉटेल येथील वास्तव्य, राजकीय नेत्यांच्या पाया पडणे, परस्पर सहकारी संस्थांचे वाहन वापर असे अनेक गंभीर तक्रारी त्यांच्या केल्या होत्या. गोवंश आजही त्यांच्या आशीर्वादाने सुरू असल्यामुळे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कडे पाठपुरावा करून त्यांच्या निलंबना बाबत पाठपुरावा सुरूच ठेवणार आहे.
अमोल खताळ, सामाजिक कार्यकर्ते, संगमनेर.

