केंद्र सरकार कडून सूडबुद्धीने गांधी परिवाराला त्रास – आमदार डॉ. सुधीर तांबे

केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराबाबत संगमनेरमध्ये काँग्रेसचे धरणे आंदोलन
प्रतिनिधी —
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देश उभारणी अत्यंत मोलाचे योगदान देणाऱ्या गांधी कुटुंबाला सूडबुद्धीने जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. खासदार राहुल गांधी कधीही सरकारला शरण जाणार नाहीत.
महागाई, बेरोजगारी, ढासळलेली अर्थव्यवस्था हे अपयश झाकण्यासाठी केंद्र सरकारकडून सूडबुद्धीने विरोधी पक्षांच्या नेत्यांवर ईडीच्या कारवाया होत असल्याची टीका नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले असून खासदार राहुल गांधी व खासदार सोनिया गांधी यांना ईडीने पाठवलेल्या नोटीस विरोधात संगमनेर मध्ये काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

संगमनेर बस स्थानक येथे संगमनेर तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकारच्या निषेधार्थ धरणे आंदोलन झाले. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, डॉ. जयश्री थोरात, शंकर खेमनर, लक्ष्मण कुटे, आर.एम. कातोरे, नवनाथ अरगडे, भाऊसाहेब कुटे, बाळासाहेब गायकवाड, अर्चना बालोडे, सुभाष सांगळे, आनंद वर्पे, जावेद शेख, गौरव डोंगरे, त्र्यंबक गडाख, मिलिंद कानवडे, सोमेश्वर दिवटे, बाळासाहेब पवार, किशोर टोकसे, सुनंदा जोर्वेकर, सोनाली शिंदे, नवनाथ आंधळे, अजय फटांगरे, माधव हासे आदींसह काँग्रेसच्या सर्व सेलचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार डॉ. तांबे म्हणाले की, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देश उभारणीत गांधी व नेहरू कुटुंबाचे मोठे योगदान आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वतःची सर्व संपत्ती देशाकरता दान केली होती. स्वर्गीय इंदिरा गांधी व राजीव गांधी यांनी देशाच्या एकात्मतेसाठी प्राणांची आहुती दिली. मात्र त्यांच्या परिवाराला टार्गेट करून सूडबुद्धीने सोनिया गांधी व राहुल गांधी यांना नोटिसा पाठवल्या जात आहेत. सध्या देशात अत्यंत अस्थिरता निर्माण झाली आहे. महागाईने उच्चांक गाठला आहे. बेरोजगारी वाढली आहे. केंद्र सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले असून हे अपयश झाकण्यासाठी सीबीआय व तत्सम केंद्रीय यंत्रणांचा वापर केंद्र सरकार करत आहे.

देशातील लोकशाही पूर्णपणे धोक्यात आली असून प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्यांनी या विरुद्ध आवाज उठविण्यासाठी घरोघर जाऊन काँग्रेसचा विचार सांगितला पाहिजे. खासदार राहुल गांधी हे शूर योद्धे आहेत. ते कधीही केंद्र सरकारच्या या कारवायांना शरण जाणार नाहीत. संपूर्ण देशामध्ये त्यांना पाठिंबा देण्यासाठी मोठे जनआंदोलन होत आहे. राज्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष एकवटला असून राज्यातील जनता काँग्रेसच्या पाठीशी उभी राहिली आहे. देश आणि लोकशाही वाचवायचे असेल तर प्रत्येकाला मोदी सरकारच्या जुलमी हुकूमशाही विरुद्ध लढावे लागेल असे ते म्हणाले.

दुर्गा तांबे म्हणाल्या की, सध्या देशात ईडी, सीबीआय या यंत्रणा सरकार पेक्षा जास्त कार्यान्वित झाले आहेत. लोकविकासाचे कामे करण्या ऐवजी जनतेमध्ये मतभेद निर्माण केले जात आहेत. विरोधी राजकीय पक्षांना नामशेष करण्याचा हा प्रकार सुरू आहे. गांधी कुटुंब हे देशासाठी त्याग करणारे कुटुंब आहे. भारत जोडो यात्रा सोनिया गांधी यांनी सुरु केली आणि मोदी सरकारने घाबरून त्यांना ईडीच्या नोटिसा पाठवल्या आहेत. हे अत्यंत निंदनीय असल्याचे त्या म्हणाल्या.

या वेळी डॉ.जयश्री थोरात, हिरालाल पगडाल, बाबा ओहोळ, रामहरी कातोरे, प्रा. बाबा खरात, सुनीता कांदळकर, भास्कर शेरमाळे, सुभाष सांगळे, मिलिंद कानवडे, दत्तू कोकणे, गौरव डोंगरे आदींनी मोदी सरकारच्या कारभारावर टीका केली.
