उपरोधिक भाषेतील फलक सत्ताधाऱ्यांना चांगलाच झोंबला !

पालिकेने पोलिसांच्या मदतीने फलक हटविला
प्रतिनिधी —
संगमनेर शहरातील सय्यद बाबा चौक या ठिकाणी लावण्यात आलेला उपरोधिक भाषेतील फलक महसूल मंत्री आणि नगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांवर टीका करणारा असल्याचे कारण सांगत नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने हटविला आहे.

रविवारी दि.(२२) रोजी या ठिकाणी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते नगर परिषदेच्या विविध विकास कामांच्या लोकार्पणाचा सोहळा होता. हा कार्यक्रम सुरू होण्याआधी हा फलक हटविण्यात आला. मंत्र्यांसमोर असे प्रदर्शन नको या भीतीने पालिकेने हा फलक हटविला आहे.

संगमनेर शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या जल शुद्धीकरण प्रकल्पाला विरोध असलेल्या नागरिकांनी संगमनेर शहरात सय्यद बाबा चौक येथे उपरोधिक भाषेत एक फलक लावला होता. तो फलक पोलिसांच्या मदतीने नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हटविला आहे. या फलकावर नागरिकांच्या विरोधकाला न जुमानता नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालुन शहराचे सर्व दुर्गंधीयुक्त सांडपाणी एकाच ठिकाणी आणून नागरिकांना त्रास दिला जाणार असल्याची भावना येथील नागरिकांमध्ये असल्याने त्यांनी वरील उपरोधिक भाषेचा वापर करीत नगरपालिकेचे आणि सत्ताधाऱ्यांचे आभार असा फलक सय्यद बाबा चौकात लावला होता.

रविवारी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते संगमनेर नगर परिषदेच्या विविध विकास कामांचा भूमिपूजनाचा शुभारंभ आणि कामांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दिवसभर शहरात विविध ठिकाणी असे कार्यक्रम चालू होते. त्यामध्ये सय्यद बाबा चौकात देखील असाच एक कार्यक्रम करण्यात येणार होता. या कार्यक्रमाचे औचित्य साधत सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाला विरोध करणार्या नागरिकांनी याठिकाणी उपरोधिक भाषेत फलक लावला होता.

या फलकाची चर्चा दिवसभर सुरू होती. फलकामुळे नगरपालिकेच्या कारभाराचे जाहीर वाभाडे निघत होते. नगरपालिकेच्या कार्यपद्धतीवर सांविधानिक पद्धतीने फलकांच्या माध्यमातून टीका करण्यात आली होती. मात्र ही टीका सत्ताधाऱ्यांना चांगलीच झोंबल्याने नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी महसूल मंत्री कार्यक्रम स्थळी येण्याआधी पोलिसांची मदत घेत हा जाहीर आभार प्रदर्शनाचा फलक तेथून काढून टाकला.

मात्र या फलकामुळे नागरिकांची चांगलीच करमणूक झाली असून सोशल मीडियावर या फलकाची छायाचित्रे मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहेत. नगरपालिकेच्या कारभाराची चांगलीच टिंगल या फलकामुळे सोशल माध्यमातून होत असल्याचे चित्र आहे.
