ओबीसी आरक्षण आयोगाचे दौरे म्हणजे निव्वळ फार्स —
आमदार राधाकृष्ण विखे पाटील
प्रतिनिधी —
ओबीसी आरक्षणाठी नेमलेल्या समर्पित आयोगाचे राज्यात प्रत्येक महसूल विभागात सुरू असलेले दौरे म्हणजे केवळ फार्स असून, दोन तासांच्या भेटीमधून आयोग नेमका कोणता डेटा गोळा करणार ॽ असा सवाल माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

विखे पाटील संगमनेर मध्ये माध्यमांशी बोलताना म्हणाले की, वास्तविक ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत आयोगाने प्रत्येक जिल्ह्यात जावून माहीती संकलीत केली पाहीजे परंतू आयोगाचे सदस्य फक्त एका महसूल विभागात जावून अवघ्या दोन तासात जर माहीती गोळा करणार असतील तर यातून नेमका कोणता डेटा हाती लागणार आशी शंका उपस्थित केली. यापुर्वी मराठा आरक्षणाच्या संदर्भात नेमलेल्या गायकवाड आयोगाने प्रत्येक जिल्ह्यात जावून सुनावणी घेत नागरीकांचे म्हणणे जाणून घेतले होते याची आठवण त्यांनी करून दिली.

महाविकास आघाडी सरकारने आधीच ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत मोठा कालावधी वाया घालवाला आहे. मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर जिल्हानिहाय डेटा संकलीत होण्याची अपेक्षा व्यक्त करून, सरकार ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात गंभीर नाही. आरक्षणाच्या बाबतीत मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारची भूमिका प्रामाणिक नाही. हेच सर्व परिस्थिती पाहिल्यानंतर दिसून येत असल्याची टिका विखे पाटील यांनी केली.

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल वरील अबकारी करांमध्ये कपात केली. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेतील नऊ कोटी लाभार्थींना २०० रुपयांचे अनुदान देवून पंतप्रधानानी दिलासा दिला असताना सुध्दा मुख्यमंत्री केंद्राच्या निर्णयावर टिका करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला काय दिले हे एकदा तरी सांगावे सर्वच गोष्टी केंद्राने करायच्या मग तुमचे योगदान काय ॽ कोव्हीड संकटात राज्य सरकारने कोणालाही मदत केली नाही. निर्णय फक्त मुंबई पुरते घेतले. मुंबई सोडून मुख्यमंत्र्यांना जनताच दिसत नाही. केंद्राने आतापर्यत दोनदा पेट्रोल आणि डिझेलवर कर कपात केली. भाजप शासीत राज्यांनी सुध्दा तसे निर्णय करून जनतेला दिलासा दिला, तुम्ही एकदा तरी करून दाखवा असे थेट आवाहन आमदार विखे पाटील यांनी दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर आपली प्रतिक्रिया देताना आ.विखे यांनी ‘जो बूॅंदसे गई वो हौदसे नही आती’ आशी मार्मिक टिपणी करून आधी आपल्या पक्षाच्या बगलबच्चांकडून वक्तव्य करून घ्यायची आणि नंतर समाजाला गोंजारत बसायचे ही त्यांची जुनीच निती आहे.त्यांच्या या भुलभूलैय्याला जनता भुलणार नाही असा खोचक टोला त्यांनी लगावला.
