आंधळा जेलर दळतोय आणि आरोपी केक खातोय..!!

पांडू कोतवालांची मजा ! शिपायांचा मात्र बळी !!

प्रतिनिधी —

आमच्या आटपाट नगरीत कधी काय घडेल याचा भरवसा राहिलेला नाही. महाराजांचे सतत होणारे दुर्लक्ष किंवा जाणून बुजून केलेले दुर्लक्ष याला कारणीभूत असावे असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. आटपाट नगरीतली  कोतवाली सध्या ऐरणीवर आहे. या कोतवालीतले धंदे आणि नगरीतले अवैध धंदे चव्हाट्यावर येऊ लागल्याने वरिष्ठ कोतवालांना आटपाट नगरितल्या काही शिपायांचा बळी  द्यावा लागला आहे.

यावरही कळस म्हणजे आटपाट नगरीच्या तुरूंगात घडलेल्या विविध घडामोडींची चर्चा नगरीत सुरू असल्याने या तुरुंगात काय काय घडत असावे याबाबतच्या विविध शंका आता समोर येऊ लागल्या आहेत. ‘तुरुंगातला सावळागोंधळ आणि आटपाट नगरीतल्या गाढवांनी घातलेला गोंधळ’ आता चर्चेचा विषय बनला आहे.

एक मात्र नक्की की आटपाट नगरीच्या ‘वसुली खात्याचा जेलर’ मात्र या सगळ्या घडामोडीत कानावर हात ठेवून मोकळा झाला आहे. हा आंधळा जेलर दळतोय आणि तुरुंगातले आरोपी केक खातायेत, मजा करतायेत असा प्रकार होत आहे. आटपाट नगरीच्या वसुली विभागाचे वरिष्ठ अधिकारी मात्र या बाबत गुळणी धरून बसले आहेत. तसे पाहिले तर या वसुली विभागावर महाराजांची कृपा आहे. महाराजांची कृपा अनेकांवर आहे. तो एक संशोधनाचा विषय आहे.

आटपाट नगरीच्या तुरुंगात काही दिवसापूर्वी वाढदिवस साजरा झाला. हा वाढदिवस साजरा करण्यासाठी साग्रसंगीत व्यवस्था करण्यात आली होती. ही व्यवस्था करण्यासाठी आटपाट नगरीच्या कोतवाली मधील शिपायांनी मदत केल्याचे उघड झाले आहे. मात्र या शिपायांच्या पाठीमागे असणारा पांडू कोतवाल आणि वसुली विभागाचा जेलर अलगद निसटला असल्याची चर्चा आता  होऊ लागली आहे.

“ज्याला नाही कोणी, त्याला महाराज वाली” या उक्तीप्रमाणे वसुली विभाग आणि कोतवालीत  अंदाधुंदी चालू असल्याचे दिसून येत आहे. हा अंग्रेजोंके जमानेका जेलर नेमके काम तरी काय करतो असा सवाल उपस्थित झाला आहे. आटपाट नगरीच्या तुरुंगात विविध घटना घडल्या. तुरुंगामध्ये सर्व सुख सुविधा पुरवल्या जातात. अगदीच बिडी काडी, चहा पाण्यापासून तर थेट मोबाइल सेवेसह वाढदिवस साजरे करण्यापर्यंत सोयी सुविधा पुरवण्याचे काम वसुली विभागाच्या जेलरच्या अधिपत्याखाली कोतवालीतील शिपाई करत असतात. आणि त्याकडे कोतवालीचे कनिष्ठ व वरिष्ठ पांडू कोतवालांसह वसुली विभागाचा जेलर अक्षरशः जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असतात.

सुसंस्कृत आणि संस्कारित आटपाट नगरी असल्याचा आव महाराज आणि त्यांचे लाभार्थी दररोज करीत असले तरी संस्कृती फाट्यावर मारत, सुसंस्कार पांडू कोतवालांच्या आणि वसुली विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पायाशी लोळण घेत असल्याचे आटपाट नगरीचे चित्र आहे. आटपाट नगरीच्या कायदा व सुव्यवस्थेचे वाभाडे काढण्याचे काम आटपाट नगराच्या प्रशासनाकडून होताना दिसत आहे. नागरिकांना त्रास देण्याचे काम वसुली विभाग आणि कोतवालीतुन मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे उघड होत आहे.

नुकतेच कोतवालीच्या पांडू कोतवालांनी आटपाट नगरीतील एका संघटनेच्या कारभाऱ्यांना विनाकारण तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला. या आठ-दहा कारभाऱ्यांना नगरीच्या न्यायव्यवस्थेने मात्र विनाअट कुठलीही कारवाई न करता मुक्त केले. आटपाट नगरीच्या ‘कोतवालांचे थोबाड कायद्याने फोडल्याचे’ रयतेने पाहिले आहे. कोतवालीचे आणि वसुली विभागाचे मात्र हसू होत आहे.

आटपाट नगरीच्या फौजेतील शिपायांचा बळी  देऊन आपली कातडी वाचवणाऱ्या वसुली विभागातील जेलर आणि कोतवालीच्या कनिष्ठ व वरिष्ठ पांडू कोतवालांवर कारवाई कधी होईल  याकडे रयतेचे लक्ष लागून आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!