आटपाट नगराची कोतवाली !

कनिष्ठ आणि वरिष्ठ पांडू कोतवालांची मनमानी !!

गाढवांनी घातलाय धुमाकूळ !!

प्रतिनिधी —

आटपाट नगरीत गाढवं पाळण्याचा धंदा आहे. अशी पाळीव गाढवं अवैध व्यवसायासाठी सुद्धा वापरता येतात. आटपाट नगरीत वाळू तस्करी साठी गाढवांचा वापर होत असल्याचे चित्र रयत नेहमीच पाहत असते. नगरीच्या महाराजांनी देखील अनेक गाढवं पाळलेली आहेत. अशा गाढवांचा धुमाकूळ आटपाट नगरीत सुरू असल्याचे दिसून येते. आता त्याची लागण आटपाट नगरीच्या कोतवालीत देखील झाल्याचे नवे चित्र आहे.

सध्या आटपाट नगरातील कोतवालीचा कारभार ऐरणीवर आलेला आहे. महाराजांच्या मर्जीत आणि अधिपत्याखाली असणाऱ्या या कोतवाली मध्ये घडणाऱ्या विविध घडामोडींची चर्चा आणि नाराजीचा सूर नगरीच्या रयते मधून दिसून येत आहे. कोतवाली मधील शांतता, सुव्यवस्था आणि कायद्याच्या व्यवस्थेबाबत विविध आरोप-प्रत्यारोप होत असले तरी महाराजांचे खास शुभाशिर्वाद असल्याने कोतवालीत सगळे आलबेल असल्याचे चित्र रंगवण्यात आलेले आहे.

कोतवालीचे प्रभारी कोतवाल त्यांचे सहकारी यांच्या विषयी मनमानी कारभार, भ्रष्टाचार, आर्थिक लुबाडणूक, फसवणूक, अवैध धंदे, रयतेवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात डांबणे, तुरुंगात असलेल्या आरोपींना विशेष सवलत देऊन आर्थिक लाभातून त्यांना खास सेवा देणे. यावर दररोज टीका टिप्पणी होत आहे. अशाप्रकारे कोतवालीचा कारभार दररोज चव्हाट्यावर येत आहे.

कोतवालीत चमच्यांचे राज्य असल्याचे सर्वश्रुत आहे. कोतवालीत झिरो शिपायांचा वावर देखील वाढला असून असे सांगकामे कोतवालीतील अधिकृत शिपायांची वसुली करण्यात मातब्बर झालेले आहेत. कोतवालीवर लक्ष ठेवणारे वरिष्ठ कोतवाल देखील यात सहभागी असल्याचे आरोप होतात. कोतवालीच्या हद्दीत विविध अवैध, बेकायदेशीर धंद्यांना उधाण आलेले आहे. त्यामध्ये मटका, जुगार, दारू अड्डे, ढाब्यांवर होणारी खुलेआम दारू विक्री, कत्तलखाने, गोवंश हत्या व गो- हत्या, अवैध प्रवासी वाहतूक, गुटखा, गांजा असे अनेक प्रकार राजरोसपणे सुरु आहेत. कोतवालीच्या हद्दीत असणाऱ्या विविध हॉटेल आणि लॉज मधून अवैध वेश्या व्यवसाय, लहान मोठ्या व्यापाऱ्यांचे, जन पालिकेच्या जनसेवकांचे, विविध पक्षांच्या पुढार्‍यांचे जुगाराचे डाव सुद्धा सुरू असतात.

आटपाट नगरीतील कोतवालीवर महाराजांचे पूर्ण वर्चस्व असले तरी महाराजांचे बगलबच्चे, लाभार्थी, नातेवाईक, सगेसोयरे, कोतवालीच्या कारभारात हस्तक्षेप करत असतात. हा हस्तक्षेप छुपा असला तरी रयतेच्या दृष्टीने तो नेहमीच उघड असतो. कोतवालीत घडणाऱ्या विविध गुन्ह्यांच्या बाबत कोतवालीचे प्रभारी कोतवाल गांभीर्याने काम करत नाहीत. मुळात कोतवाली मध्ये अंतर्गत धुसफूस सुरू आहे. कोतवालीत असणारे अनेक शिपाई एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून कुरघोड्या करण्यात आघाडीवर आहेत. त्यामुळे अंतर्गत भांडणांचा कहर सुरू झाला आहे. ही यादवी कोतवालीलाच खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही. अशी चर्चा रयते मधून ऐकण्यास मिळते.

काही दिवसापूर्वी कोतवालीच्या हद्दीतील अवैध धंदे आणि ते धंदे करणारे आटपाट नगरीतले मटका सम्राट, जुगार अड्डे, गांजा तस्करी, कत्तलखाने चालवणारे यांवर छापे टाकून कारवाई करण्यात आली होती. मात्र आता हे मटका अड्डे आणि सर्व अवैध धंदे पुन्हा जोमाने सुरू झाले आहेत. कोतवालीला त्यांचा वाटा मिळत आहे. महाराजांपर्यंत हा वाटा पोहोचतो की काय अशी शंका घेतली जात आहे.

आटपाट नगरीत कोतवालीच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी वरिष्ठ कोतवाली अधिकारी आहेत. मात्र आपल्या विभागातील कोतवाली हद्दीतून आपला वाटा दरमहा प्रभारी कोतवाल मंडळींकडून कसा वेळेवर मिळेल यावरच त्यांचा जास्त डोळा असतो. वरिष्ठ कोतवाली अधिकाऱ्यांचा आटपाट नगरतील प्रभारी अधिकाऱ्यांवर कुठलाही वचक राहिला नसल्याचे दिसून येते. आटपाट नगरीच्या विभागात असणाऱ्या इतर प्रमुख कोतवाल्यां आणि त्यांच्या हद्दीत अनेक प्रकारचे अवैध धंदे सुरू असून देखील हे वरिष्ठ कोतवाल कुठलीही कारवाई करताना दिसत नाहीत. कारवाई केली तरी ती फक्त दिखाऊ आणि जुजबी असते. त्यानंतर सर्व पुन्हा अगदी आलबेल सुरू होते. यासाठी वरिष्ठ कोतवाली मध्ये एक शाखा देखील निर्माण केली आहे. ही शाखा कारवाई पेक्षा वसुली मध्ये जास्त गुंतलेली असल्याचे दिसून येते. प्रभारी कोतवालांच्या अनेक वेळा तक्रारी होऊन देखील याबाबत कुठल्याही कारवाईचे पाऊल उचलले जात नाही. त्यामुळे रयते मध्ये वरिष्ठ कोतवालां विषयी देखील नाराजी पसरलेली आहे.

आटपाट नगरीत घडणाऱ्या सर्व गोष्टींना, सामाजिक घडामोडींना, गुन्हेगारीला, धार्मिक दंगली, हाणामाऱ्या, विद्वेषाचे वातावरण, शांतता व सुव्यवस्था बिघडण्यासाठी जबाबदार असलेले प्रभारी कोतवाल, यांच्या बेकायदेशीर उद्योगांना एक प्रकारे खतपाणी घालण्याचे काम सुरू असून आटपाट नगरीचे महाराज याबाबत अत्यंत बेजबाबदारपणे आपले कर्तव्य विसरून मुद्दाम दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!