गंगामाई घाटाचे सुशोभिकरण करा…. 

पण गंगामाई घाटा समोरून होणाऱ्या वाळू तस्करीचे काय ?
प्रवरानदी घाट परिसर गंजडी, दारुडे, रोड रोमिओ आणि प्रेमी युगुलांचा अड्डा बनलाय 
यापूर्वीही सुशोभीकरणासाठी एक कोटी रुपये खर्च केले होते :  आता होणार १० कोटी रुपये खर्च
 
प्रतिनिधी —
संगमनेर नगरपालिकेच्या वतीने प्रवरा नदीच्या गंगामाई घाटाचे सुशोभीकरण करण्याचा घाट घालण्यात आला आहे.
हे सुशोभीकरण आता दुसऱ्यांदा हाती घेण्यात आले आहे. यापूर्वीही साधारण दहा ते पंधरा वर्षांपूर्वी तीर्थक्षेत्र विकास निधीचा वापर करीत सुमारे एक कोटी रुपये खर्च करून प्रवरानदीच्या घाटांचे सुशोभीकरण करण्यात आले होते.
आता नव्याने होणाऱ्या सुशोभीकरणाचा अंदाजित खर्च १० कोटी रुपये एवढा असून त्यापैकी ४ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या कामाचा पहिला टप्पा सुरू होत आहे. एवढा मोठा निधी आणि एवढा मोठा खर्च केल्यानंतर या सुशोभीकरणाचे संरक्षण करण्याची जबाबदारी नगरपालिकेची आहे.
(घाटाच्या संरक्षक कठड्यावरील लोखंडी रेलिंगचे मधले डिझाईन कापून चोरून नेण्यात आले आहे.)
गेल्या वेळी देखील सुंदर सुशोभीकरण करण्यात आले. मात्र काही दिवसातच या सुशोभीकरणाची वाट लावण्याची सुरुवात काही कर्मदरिद्री लोकांनी सुरू केली. यामध्ये गंजडी, दारुडे, भुरटे चोर यांनीसुद्धा आपला हात धुऊन घेतला. नगरपालिकेच्या अनेक कामांमध्ये कोण कसा हात धुऊन घेईल हा नेहमीच चर्चेचा विषय असतो.
मात्र त्यावेळी घाटांचे सुशोभीकरण केल्यानंतर नागरिकांना बसण्यासाठी करण्यात आलेले वेगवेगळ्या स्वरूपाचे बाकडे तोडण्यात आले. नदीच्या दिशेने करण्यात आलेले लोखंडी रेलिंग आणि त्याचे डिझाईन निवांतपणे कापून चोरून नेऊन त्याची विल्हेवाट लावण्यात आली. जे जे काही म्हणून तेथून पळवता येईल ते पळविण्यात आले आणि सुशोभीकरणाची वाट लागली. त्यानंतर पुन्हा आता कोट्यावधी रुपये खर्च करून गंगामाई घाटाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
(नागरिकांना बसण्यासाठी बांधलेल्या अशा बाकड्यांची तोडफोड करण्यात आली.)
आज रविवारी (दि.२२) महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ होणार आहे. तर दुसरीकडे गंगामाई घाटा समोरूनच पूर्वेकडच्या आणि पश्चिमेकडच्या प्रवरा नदीवरील पुणे – नाशिक महामार्गावरील पुलां पर्यंत प्रचंड वाळू तस्करी होत असते. या वाळू तस्करी बाबत मात्र सोयीस्कररित्या मौन बाळगले जाणार आहे.
गंगामाई घाटाचे सुशोभीकरण करणार हे चांगले काम असले तरी त्याची दुसरी काळीकुट्ट बाजू म्हणजे प्रवरामाईचे रोज लचके तोडणारे सरावलेले वाळू तस्कर ही आहे. या वाळू तस्करांवर कधी कायमस्वरुपी कारवाई होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. महसूलमंत्री या कार्यक्रमाचे उद्घाटन करतील, या कामाचा शुभारंभही होईल, गंगामाई घाटाचे सुशोभीकरणही होईल परंतु समोरच प्रवरामाई संपवण्याचे काम वाळू तस्करांकडून सुरू राहील. याबाबत सर्वसत्ताधारी गंगामाई घाटावर मौन धरून शांतपणे तस्करांचा हैदोस बघत बसणार आहेत काय ?
त्याच बरोबर गंगामाई घाट आणि प्रवरा नदीच्या घाट परिसरात नेहमीच होणारी गुंडगिरी, दादागिरी, छेडछाड तेथील कायमस्वरूपी आश्रम आणि नागरिकांमध्ये होणारे वाद याला आळा कोण घालणार आहे ?
संगमनेर शहराच्या विकासात सत्ताधार्‍यांनी योगदान देण्याचे काम चालवले असले तरी विकासाबरोबरच शहराच्या साधनसंपत्तीचे आणि निसर्गाचे, पर्यावरणाचे होत असलेले नुकसान याकडेही सत्ताधाऱ्यांनी गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. आपल्या डोळ्यादेखत जर असे बेकायदेशीर उद्योग होत असतील आणि कारवाई होणार नसेल तर सर्वसामान्य जनतेने कोणाकडे दाद मागायची.
ही जबाबदारी सत्ताधाऱ्यांची आहे. पण ती जबाबदारी घेण्यास कोणीही तयार नाही. त्यामुळे कितीही विकास केला तरी त्याच्यावर एक तरी बदनामीचा काळा डाग पडलेला असतोच, असे चित्र संगमनेरच्या विकास कामांबाबत झालेले आहे.
आता घाटांवर सुरक्षा आणि संरक्षण महत्त्वाचे !
संगमनेर शहरातील नागरिकांसाठी चौपाटी म्हणून प्रसिद्ध असलेला संपूर्ण प्रवरा नदी घाट परिसर हा परिचित आहे. श्री स्वामी समर्थ मंदिरा पासून ते थेट गंगामाई घाटापर्यंत दररोज या ठिकाणी वर्दळ असते. नागरिकांसाठी विरंगुळ्याचे ठिकाण आणि सकाळ, सायंकाळी फिरण्याचे ठिकाण म्हणून हा नदीघाट परिसर प्रसिद्ध आहे. तसेच या ठिकाणी मनोरंजनाबरोबरच भक्तिमार्गाचे सुद्धा दर्शन होत असल्याने समाजातील सर्व स्तरातील लहान मुलाबाळांसह तरुण आणि वयस्कर मंडळींचा राबता या ठिकाणी असतो. या ठिकाणी होणारी हुल्लडबाजी, दादागिरी, गुंडगिरी, भांडणे, छोट्या-मोठ्या चोऱ्यामाऱ्या, गंजडी, दारुडे यांचे वाढते प्रमाण, घडलेल्या विविध घटना पाहता या ठिकाणी संरक्षण असणे महत्त्वाचे आहे. घाटाच्या संरक्षणाबरोबरच नागरिकांचे देखील सुरक्षा करणे याची जबाबदारी नगरपालिका आणि संगमनेर पोलिस प्रशासनाची आहे. याबाबतही गांभीर्याने विचार होईल अशी अपेक्षा जनतेमधून व्यक्त होत आहे.

RRAJA VARAT

One thought on “गंगामाई घाटाचे सुशोभिकरण करा….  पण गंगामाई घाटा समोरून होणाऱ्या वाळू तस्करीचे काय ?”
  1. कामाचे टेंडर इंद्रजित, आर. एम., कडू, फटांगरे, थोरात ह्यांना देऊ नका…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!