घारगाव येथील पोलीस स्टेशन चे स्थलांतर होणार नाही —
आमदार डॉ. किरण लहामटे
प्रतिनिधी —
भविष्यात जिल्ह्याचे विभाजन होवून नवीन तालुके झाल्यास त्यामध्ये घारगाव हा तालुका होवू शकतो. त्यादृष्टीने घारगावलाच पोलीस स्टेशन असणे गरजेचे आहे. त्यामुळे नवीन इमारतीसाठी घारगाव मधून पोलीस स्टेशनचे स्थलांतर होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. असे आश्वासन आमदार डॉ. किरण लहामटे यांनी दिल्यानंतर शिवसेनेचे तालुका प्रमुख जनार्दन आहेर यांचे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेले अन्नत्याग उपोषण अखेर बुधवारी (ता. २७ ) एप्रिल रोजी सायंकाळी आमदार लहामटे व शिवसेना जिल्हाप्रमुख रावसासाहेब खेवरे यांच्या हस्ते लिंबूपाणी घेऊन मागे घेण्यात आले.

संगमनेर शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर यांनी विविध मागण्यांसाठी सोमवारपासून अन्नत्याग उपोषण सुरू केले होते. या उपोषणाला ग्रामस्थांसह आजूबाजूच्या गावांमधील लोकांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे बुधवारी तिसर्या दिवशी आमदार डॉ. किरण लहामटे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी यशस्वी शिष्टाई केली. त्यांच्या हस्ते लिंबूपाणी घेऊन आहेर यांनी अन्नत्याग उपोषण सुटले असल्याचे जाहीर केले. यावेळी तहसीलदार अमोल निकम, महावितरण कार्यकारी अभियंता अनिल थोरात, उपकार्यकारी अभियंता सचिन भांगरे, सहाय्यक अभियंता निखील शेलार आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार डॉ. किरण लहामटे म्हणाले, घारगाव येथेच पोलीस स्टेशनची इमारत व वसाहत व्हावी म्हणून मी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना भेटलो असून त्यांनीही पोलीस स्टेशन संदर्भात सकारात्मकता दाखवली आहे. त्यामुळे आता तुम्ही ग्रामस्थ जागा उपलब्ध करून द्या म्हणजे पोलीस स्टेशनचा मार्गी लागून जाईल. भविष्यात नवीन तालुक्यांची निर्मीती झाली तर घारगाव हा तालुका होवू शकतो म्हणून घारगावच पोलीस स्टेशनचे केंद्र असावे.

जागेअभावी डोळासणे येथे पोलीस स्टेशन स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव होता. मात्र आता घारगाव मध्येच ग्रामस्थांनी जागा उपलब्ध करून दिल्याने तोही प्रश्न मार्गी लागला आहे. वीजेच्या संदर्भात जी मागणी आहे त्यावर गुरुवारी होणार्या बैठकीत चर्चा करू त्यासाठी वेळ प्रसंगी आमदार निधीही उपलब्ध करून देणार. जनतेचे प्रश्न सोडवताना मी राजकारण कधीही केले नाही. कारण अकोले मतदारसंघ माझ्यासाठी घर आहे. सध्या पाणी आहे तर विज नाही. त्यामुळे पाणी असूनही उपयोग नाही. भविष्यात विजेचा कायमचा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही जागा उपलब्ध करून द्या सबस्टेशन होण्यासाठी आपन प्रयत्न करू असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे म्हणाले, जनार्दन आहेर यांनी विविध प्रश्नांसाठी जे पाऊल उचले आहे. त्याला तुम्ही ग्रामस्थांनी विविध पक्षाच्या पदाधिकार्यांनी जो पाठिंबा दिला आहे. त्यामुळे तुमचे सर्वांचे अभिनंदन करणे गरजेचे आहे. अशीच एकजुट दाखवली तर सामाजिक कामात कोणीच अडथळे निर्माण करू शकत नाहीत. मूर्ती लहान पण कीर्ती महान असे जनाभाऊचे नेतृत्व आहे. जिल्ह्यात अनेक तालुकाप्रमुख आहेत. या सर्व तालुकाप्रमुखांमध्ये जनाभाऊची सर्व सामन्यांच्या प्रश्नासाठी जी तळमळ आहे ती खर्या अर्थाने कौतुकास्पद आहे. म्हणून मी त्याच्यावर प्रेम करतो. तुमच्या घारगाव पोलीस स्टेशन संदर्भात मी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना भेटलो असून त्यांच्याबरोबर चर्चाही केली आहे. त्यांनीही सकारात्मकता दाखवली आहे. त्यामुळे मी त्यांच्याकडून पत्रही घेवून आलो आहे.

मनसेचे किशोर डोके म्हणाले, पठारभाग हा डोंगरदर्यांतून निर्माण झाला आहे. सातत्याने पठारभागाची हेळसांड झाली असून नेहमीच पठारभागावर अन्याय होत आहे. त्यामुळे आता राजकीय हेवेदावे, जोडे बाजूला ठेवून आपण एकत्र आलो पाहिजे. जनार्दन आहेर यांनी विविध मागण्यांसाठी जे अन्नत्याग उपोषण केले ते अतिशय चांगल्या पद्धतीने केले आहे.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रमेश आहेर, माजी उपसरपंच सुरेश आहेर, माजी मंडलाधकारी दादापाटील आहेर, फुलांचे प्रसिद्ध व्यापारी दिलीप आहेर, शिवसेनेचे दिलीप साळगट, उद्योजक कैलास शेळके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुन्ना शेख, माजी उपसरपंच सुरेश आहेर, दत्ता गाडेकर, गुलाबराजे भोसले, सुनील उर्फ तात्या आहेर, माजी उपसरपंच संदीप आहेर, रंगनाथ फटांगरे, सतीश धात्रक, शांताराम वाकळे, हारून शेख, बाळासाहेब हांडे, शेतकरी संघटनेचे राहुल कान्होरे, मंगेश कान्होरे, पप्पू उर्फ महेश आहेर, सुनील डोके, वाल्मिक आहेर, हरीदास आहेर, हनुमंता आहेर यांसह पठारभागातील अनेक नागरिक उपस्थित होते.

खालील मागण्या मान्य केल्या आहेत.
पोलीस ठाण्याच्या स्थलांतरासह एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय पुन्हा घारगाव येथे सुरू करावे, बंदस्थितीत असलेले कृषी मंडल अधिकारी कार्यालय त्वरीत सुरू करावे, वन विभागाच्या कार्यालयासाठी नवीन इमारत व कर्मचार्यांची संख्या वाढवावी, घारगाव महसूल मंडलासाठी स्वतंत्र मंडलाधिकार्यांची नियुक्ती, पुणे-नाशिक महामार्गावरील बंदस्थितीत असलेले पथदिवे (स्ट्रीटलाईट) तातडीने सुरू करावेत, आंबीखालसा फाटा, घारगाव, बोटा, साकूर फाटा, डोळासणे, कर्जुले पठार, १९ मैल, चंदनापुरी इत्यादी गावांच्या हद्दीतील पथदिव्यांसह अपूर्ण असलेली महामार्गावरील सर्व कामे तातडीने पूर्ण करावीत व घारगाव महावितरण कंपनीच्या ५ एमव्हीए क्षमतेच्या ट्रान्सफार्मर ऐवजी १० एमव्हीए क्षमतेचा ट्रान्सफार्मर बसवावा अशा विविध मागण्या मान्य झाल्या आहेत.
