संगमनेर शिवसेना तालुकाप्रमुखांचे घारगाव येथे अन्नत्याग उपोषण सुरू !

घारगाव पोलीस ठाणे स्थलांतर रद्द करण्याची मागणी ; ग्रामस्थही सहभागी
प्रतिनिधी —
संगमनेर शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर यांनी विविध मागण्यांसाठी घारगाव येथे आज सकाळपासून अन्नत्याग उपोषणास सुरुवात केली आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आमचे अन्नत्याग उपोषण मागे घेणार नाही या निर्णयावर ग्रामस्थ ठाम आहेत.

घारगाव येथे नवीन पोलीस ठाण्याची इमारत मंजूर झाली आहे. मात्र जागेअभावी हे पोलीस ठाणे डोळासणे येथे हलविण्यात आले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले आहेत. हे पोलीस ठाणे घारगावलाच झाले पाहिजे. त्याचबरोबर घारगाव येथे एकात्मिक बालविकास प्रकल्प सुरू करावे, कृषी मंडळधिकारी कार्यालय, वन विभाग कार्यालय आदी मागण्यांसाठी तालुकाप्रमुख जनार्दन आहेर यांनी सोमवारी सकाळपासून अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे.

या अन्नत्याग उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रमेश आहेर, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुन्ना शेख, घारगाव-बोरबन सोसायटीचे अध्यक्ष ज्ञानदेव गाडेकर, तात्या मोटर्सचे सुनील आहेर, माजी उपसरपंच सुरेश आहेर, रामा आहेर, सामाजिक कार्यकर्ते नितीन आहेर, सुभाष मुसळे, माजी सरपंच सुरेश गाडेकर, बाळासाहेब जाधव, हनुमंता आहेर, भाऊसाहेब गाडेकर, सामाजिक कार्यकर्ते भाऊ आहेर आदी उपस्थित होते. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आमचे अन्नत्याग उपोषण मागे घेणार नाही या निर्णयावर तालुकाप्रमुख जनार्दन आहेर यांच्यासह ग्रामस्थ ठाम आहेत.

