महावीरांचे विचार देशातील बहुजन समाजापर्यंत पोहोचवण्याची गरज —       आमदार डॉ.सुधीर तांबे

प्रतिनिधी —

महावीर कुठल्याही देवी-देवतेचा अवतार नव्हते. ना महावीरांनी कधी कुठल्या चमत्कार वा अंधश्रद्धांचे समर्थन केले. उलट महावीरांनी त्या काळात चालत असलेल्या चुकीच्या प्रथा जसे कि यज्ञातील पशुबळी, स्त्रियांचे शोषण, ज्ञानावर एकाच वर्गाची मक्तेदारी इ. गोष्टींना विरोध करून समतेचा संदेश दिला. मनुष्य जन्माने नव्हे कर्माने मोठा होतो हे स्वतःच्या संयमित जीवनातून दाखवून दिले. महावीरांचे विचार मर्यादित न राहता देशातल्या बहुजन समाजा समोर गेले पाहिजेत असे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी केले आहे.

महावीर जयंती निमित्त नाशिक येथे आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते.

आपल्या व्याख्यानात डॉक्टर आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी भगवान महावीरांचे विचार, तत्वे अत्यंत सोप्या आणि सरळ भाषेत समजून सांगितले.

आज संपूर्ण जगाला यांच्या विचारांची गरज असल्याचे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. महावीरांना एका समाजात बंदिस्त न ठेवता जगातील सर्व बहुजन समाजात त्यांचे विचार पोहोचवले पाहिजेत, असे मत त्यांनी ठाम पणे व्यक्त केले.

डॉ. तांबे म्हणाले की, जैन धर्म हा हिंदू किंवा कुठल्याही धर्माची शाखा नसून प्राचीन आणि स्वतंत्र धर्म आहे. महावीर हे जैन धर्माचे संस्थपक नसून २४ वे तीर्थंकर होते.

भगावान महावीरांनी जगाला नेमके काय दिले? या विषयावर काही जैन मित्र, मैत्रीणीशी संवाद झाला असता, महावीरांचे विचार आपल्याच धर्मातील अनेक लोकांना नीट माहित नसल्याचे पाहून आश्चर्य वाटले.

असे सांगून महावीरांबद्दल नेमकी काय माहित आहे? असे विचारल्यावर कुणी म्हणे ते विषारी सर्प चावल्यावर विचलित झाले नाहीत. उलट पायातुन दूध आले. तर कोणी म्हणे त्यांच्या कानात खिळे ठोकले तरी ते शांत राहिले. राजमहाल सोडला. मातांना त्यांच्या जन्माच्या वेळी स्वप्ने पडली इ. गोष्टींची चर्चा होते. परंतु त्यांचा मूळ संदेश काय, त्यांच्या विचारांची जगाला नेमके काय दिले. यावर कोणीच बोलेना? अनेकांतवाद, सर्वोदय हे शब्दच बहुतेकांना नीट माहित नव्हते. असेही ते म्हणाले.

फक्त अश्या कथापुरते मर्यादित ठेवून आपण महावीरांचे विचार आपल्या समाजापुरते, धर्मा पुरते संकुचित करून ठेवतोय का? एक तत्वज्ञ म्हणून महावीरांचे विचार आपण अधिक पुढे आणायला हवेत. आणि व्यापक करायला हवेत. महावीर किंवा कुठल्याही जैन तीर्थकरांच्या हातात कुठले शस्त्र नाही. कुठली मौल्यवान आभूषणे नाहीत. त्यांच्याजवळ गेल्यावर शांततेचा व प्रसन्नतेचा अनुभव येतो.

महावीरांनी कधीही कुणाला कसला शाप दिला नाही. ना कुठल्या चमत्काराचे वरदान दिले. आज अनेक ठिकाणी द्वेष, हिंसा, मत्सर, घृणा वाढत असतांना महवीरांच्या विचारांची तीव्र गरज वाटत आहे.

महावीरांचा जन्म झाला तेव्हा काळ असा होता की सगळीकडे कर्मकांडाचे स्तोम माजले होते. मुक्या जीवांना यज्ञात बळी चढवले जात होते. स्त्री फक्त भोगवस्तू होती. पददलित आणि दुर्बलांना छळले जात होते. निवडक लोक विद्वत्तेची मक्तेदारी सांगत सामान्य जनांचे शोषण करत होते. सामान्य जणांना ज्ञान घेण्याचा वा देण्याचा अधिकार नव्हता.

महावीरांनी अशा काळात त्या सर्व पीडितांना दुर्बलांना बळ दिले. शिवाय शोषण करणाऱ्यांचा अहंगंड दूर केला. त्याकाळी विद्वान संस्कृत भाषा बोलत. जी सामान्यजनांना समजत नसे. पण महावीरांनी सामान्य जनांशी अर्धमागधी या बोलीभाषेतून संवाद साधला. जसा ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतून साधला.

कुठलाही धर्म म्हटले की चिकित्सा करायची नाही किंवा प्रश्न विचारायचे नाहीत. जो कोणी प्रश्न विचारेल तो धर्मद्रोही असा आघात असतो. आज तर बहुतेक देशात सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांनाही देशद्रोही ठरवले जाते. पण महावीर या उलट सांगतात. ते ईश्वरवादी किंवा वेद प्रामाण्यवादी सिद्धांत मांडण्याऐवजी बुद्धीप्रामाण्यवादी सिद्धांत मांडतात.

धर्माची प्रज्ञेने समीक्षा करा असे महावीर म्हणतात. त्यांनी माणसा-माणसातील वर्णावरून, लिंगावरून होणारी विषमता नाकारली. त्यांच्या सोबत श्रमण श्रमणी आणि श्रावक श्राविकांमध्ये राजापासून रंकापर्यत, म्हाताऱ्यापासून लहानापर्यत, पुरुष- स्त्रिया हे सर्व एकत्र होते. त्यांच्यात कुठलाही भेदभाव केला जात नव्हता.

पुढे बोलताना त्यांनी महावीरांनी सांगितलेल्या रोजच्या जीवनात, समाजात, नाते-संबंधात वावरतांना उपयोगी पडणारी तत्वे सांगितली.

एखाद्या गोष्टीचा सर्वांगीण विचार म्हणजे अनेकांतवाद. परस्परांच्या मतांचा आदर करणे त्यात अभिप्रेत आहे. आपल्यातील अनेक जण एखाद्या व्यक्तीबद्दल, महापुरुषाबद्दल, विचाराबद्दल पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन ठेऊन जगत असतात. म्हणजे माझ्या एखाद्या जवळच्याने सांगितलंय, परंपरेत आलंय, या-या पुस्तकात वा ग्रंथात आलय, घरातील कुणी जवळच्याने सांगितलंय म्हणजे हे असेच असेल. ती जवळपास वावरणारी व्यक्ती असे-असे चुकीचेच असेल किंवा असे असे बरोबरच असेल अस मानून आपण मोकळे होतो.

पण बहुतेक वेळा सत्य ते नसते सत्य त्यापलीकडे असते. प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्यावर आणि सर्व बाजु समजून घेतल्यावरच आपण मत बनवायला हवे. अनेकांतवाद-अंत म्हणजे शेवट . एकान्त म्हणजे एकच शेवट. अनेकांतवाद म्हणजे अनेक शेवट. म्हणजेच कुठल्याही गोष्टीबाबत एकाच बाजूचे मत न बनविणे.

अनेक व्यक्तीबद्दल आपण असे पूर्वग्रहदूषित मत बनवून चालतो त्यांच्याशी कधी प्रत्यक्ष संवाद साधत नाही आणि गैरसमज वाढत जातात. या अनेकांतवादाच्या मार्गाने आपण नातेसंबंध, समाज, देश आणि जग अधिक जवळ आणून ते अधिक समृद्ध करू शकतो.

सोशल मीडिया चा वापर करतांना ही हे तत्व आपण अमलात आणले तर अनेक धोके टळू शकतात, काही ही फॉरवर्ड केल्यामुळे आजपर्यत अनेक लोकांच्या झुंडीकडून हत्या झाल्या त्या टाळता येणे शक्य होते.

जेवढी गरज आहे तेवढाच संचय करायला हवा. आपण अनेक वेळा गरजेपेक्षा अधिक संचय करतो. आत्ताच्या काळाच्या हिशोबाने सांगायचे तर माझ्या मते तुम्ही तुमच्या कुटुंबाची सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडू शकाल एवढा संचय पुरेसा आहे. पण आपण चार पिढ्यासाठी साठवून ठेवत बसतो.

चोरी न करणे, दुसऱ्याच्या मालकीच्या वस्तूवर स्वतःचा हक्क सांगणे किंवा ती लुबाडणे ही एक प्रकारची चोरीच आहे. क्षमा मागणे, क्षमा करणे ही वीराची लक्षणे आहेत. भ्याडाची नव्हे.चुकीबद्दल क्षमा मागीतल्याने वा क्षमा केल्याने कोणी छोटा वा मोठा होत नाही.

चुका मान्य करण्यात आपला अहंकार आडवा येतो. एखादा आपल्या चुका मान्य करीत असेल तर आपण त्याला प्रोत्साहन देण्याऐवजी एकतर त्याला वेड्यात काढतो किंवा मग त्याच्या सदीच्छेचा आपल्या स्वार्थासाठी कसा उपयोग करून घेता येईल आणि त्यालाच तू क्षमा मागतोस म्हणजे तूच कसा गुन्हेगार असा शिक्का मारण्यात तरबेज असतो.

अहिंसा भ्याडपणाचे नव्हे तर शूरपणाचे लक्षण आहे. समोरचा माझ्यावर हल्ला करत असताना मी समोरच्यावर प्रतिहल्ला ही करणार नाही, पळूनही जाणार नाही, समोरच्या बद्दल वैरभावही मनात आणणार नाही आणि अन्यायही सहन करणार नाही असे महात्मा गांधी म्हणत. शारीरिक अहिंसेपेक्षाही भावनिक अहिंसा अधिक महत्वाची आहे. म्हणजे दुसऱ्यांना केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक पीडा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. माझ्या बोलण्यातून किंवा कृतींतून इतरांना काही त्रास होत असेल तर त्याची जाणीव होणे आणि मनाला वेदनाही होणे हे आपण योग्य मार्गावर असल्याचे लक्षण आहे असे मी मानतो.

कुणाबद्दल ही मनात द्वेष ठेवू नये. सध्याच्या संदर्भात सांगायचे तर कोणी विरोधक असेल, कोणाशी वाद झाला असेल वा काही मतभेद असतील तर स्वतःला चांगलं दाखवण्यासाठी सहानुभूती मिळवण्यासाठी लगेच दुसऱ्याच्याबद्दल वाईट पसरवले जाते, द्वेष केला जातो. हे समाजासाठी घातक आहे. लबाडी करून तात्पुरते असे करण्यात आपल्याला यश मिळत असले तरी आपल्या या कर्माचे फळ आपल्याला इथेच भोगावे लागते हे आपण विसरून जातो. त्यामुळे द्वेषाला दूर ठेवले पाहिजे

सर्व प्राण्यांशी मम मैत्री राहो न वैर कोणाशी. म्हणजे तो फक्त प्राणीच नव्हे तर मनुष्यही तो कोणीही असो कोणत्याही जातीचा, वा कोणत्याही धर्माचा, वयाचा, लिंगाचा, वर्गाचा असो त्याच्याप्रति मैत्रिभाव ठेवायची आज गरज आहे. वेगवेगळ्या जाती व धर्मावरुन आपल्या देशात तेढ निर्माण होत असतांना या विचारांचे अनुकरण करणे महत्वाचे आहे.

हिंसेने आणि द्वेषाने प्रश्न सुटत नसतात तर वाढत असतात. हे आज जगानेही मान्य केले आहे. कल्पना करा कि, समजा काही देशांनी युद्ध करायचे ठरवले तर एकमेकांवर बॉम्ब टाकता टाकता जग काही मिनिटांत संपू शकते. त्यामुळे जगापुढे अहिंसा हाच एकमेव पर्याय आहे.

महावीर आणि बुद्ध गेल्यावर हजारो वर्षांनी जेव्हा या अहिंसेची खिल्ली उडवली जाऊ लागली तेव्हा महात्मा गांधीनी अहिंसक चळवळीच्या माध्यमातून जगभर राज्य गाजवणाऱ्या ब्रिटिशांविरुद्ध पूर्ण देश एकत्र करून स्वातंत्र्य मिळवून दाखवले. नेल्सन मंडेला, मलाला, मार्टिन ल्युथर किंग यांच्यासारख्या जगभरातील अनेक लोकांनी तो मार्ग स्वीकारुन जगात बदल करून दाखवला. त्यामुळेच तर जगतिक कीर्तीचा वैज्ञानिक अल्बर्ट आईनस्टाइन ही म्हणाला कि, महात्मा गांधींचे अहिंसक विचारच या जगाला उध्वस्त होण्यापासून वाचवू शकतील.

जगात अनेक धर्म ,पंथ स्थापन झाले. काही टिकले काही लयाला गेले. बहुतांशी धर्माच्या संस्थापकांनी आम्ही देव आहोत किंवा प्रेषित आहोत म्हणून सांगितलं. त्यांची वचन, धर्मग्रंथ प्रमाण मानले गेले. मात्र महावीर आणि गौतम बुद्ध यांनी ना स्वतःला देव घोषित केले ना प्रेषित म्हणवून घेतले.

समोर आलेली गोष्ट तर्काच्या, विवेकाच्या, बुद्धीच्या कसोटीवर घासून घ्या. मी सांगतो म्हणून नव्हे तर तुम्हाला समजली आणि पटली तरच स्विकारा. असे म्हणणारे बुद्ध आणि महावीर म्हणूनच आपले वाटतात. माणसांना झापडबंद न होता प्रश्न विचारायला प्रवृत्त करणारे आपले वाटतात ते ह्यासाठी. प्रश्न विचारणारी माणस विचार करतात. अशी विचार करणारी माणस जोवर जगात आहेत. तोवर महावीर आणि बुद्ध आहेत.

महावीर जन्म कल्याणक निमित्त आपण ज्या ठीक ठिकाणी मिरवणूक काढतो, फ्लेक्स लावतो व अनेक गोष्टी करतो त्या चांगल्याच गोष्टी आहेत. पण त्यापेक्षा अधिक गरज आहे ती त्यांचे विचार आचरणात आणायची. संप्रदायवाद, पंथवाद इ. मतभेद बाजूला ठेवून मानव म्हणून एकत्र येण्याची.

असे आवाहन करताना शेवटी डॉक्टर तांबे म्हणाले की, चला अहिंसा, प्रेम आणि नम्रतेने जग जिंकूया, आपले नाते संबंध, समाज , देश, जग या अनुषंगाने अधिक बळकट करूया.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!