आमदार अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करावा ! बजरंग दलाची मागणी
प्रतिनिधी —
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी ह्यांच्यावर हिंदू धर्मातील विवाह सोहळ्यातील कन्यादान ह्या एका अतिशय पवित्र व भावनिक विधीचा अतिशय अश्लाघ्य शब्दात अपमान केल्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात यावा. अशी मागणी विश्व हिंदू परिषद, बजरंगदल संगमनेर प्रखंड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

आज या संदर्भाने संगमनेर शहर पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवार संवाद मेळाव्यात राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अमोल मिटकरी ह्यांनी त्यांच्या जाहीर भाषणातून हिंदू धर्मातील कन्यादान विधीचा अपमान केलेला आहे. त्यांचा तो विडिओ व्हायरल झाला असून सोशल मीडियावर सर्वत्र उपलब्ध आहे. तुम्ही तो पाहिला असेलच.

कन्यादान विधीतील मंत्रांमध्ये अमोल मिटकरी यांनी जाहीर भाषणात ”मम् भार्या समर्पयामि’ असा एक मंत्र सांगितला. असा कोणताही मंत्र हिंदूंच्या कोणत्याही विधीत नाही. अमोल मिटकरी ह्यांनी धादांत खोटे बोलून, खोटे सांगून हिंदू धर्माची जाहीर बदनामी केलेली आहे. त्यांच्यावर त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

कन्यादान करताना एक पिता त्याच्या होत असलेल्या जावयाला त्याच्या मुलीचा हात सोपवताना ब्राह्मणाकडून जे मंत्रोच्चार केले जातात ते अतिशय पवित्र व हिंदू धर्मातील महानता अधोरेखित करणारे मंत्र आहेत. त्याचा साधारण भावार्थ असा आहे की ‘ज्या मुलीमुळे माझ्या घराची भरभराट झाली व जी तुझ्या वंशाची वृद्धी करणार आहे त्या माझ्या मुलीला मी तुला सोपवत आहे. तिला कोणत्याही कारणास्तव अंतर देऊ नकोस तिची प्रतारणा करू नकोस’ असा अतिशय पवित्र भावार्थ आहे.

आपल्या पोटचा गोळा दुसऱ्याच्या हातात सोपवताना त्या पित्याला किती गलबलून येत असेल? पण मुलीच्या आयुष्याचे कल्याण व्हावे म्हणून हृदयावर दगड ठेऊन प्रत्येक हिंदू पिता तिच्या मुलीचा विवाह लावून देत असतो व त्या विवाह सोहळ्यात कन्यादान हा विधी डोळ्यात अश्रू आणून करत असतो. अश्या ह्या पवित्र व भावनिक सोहळ्याचा जो अपमान अमोल मिटकरी यांनी केला आहे. त्यामुळे आमच्या हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत व हा कोणाची तरी भार्या अर्थात पत्नी असणाऱ्या संबंध स्त्री वर्गाचा अपमान सुद्धा आहे. आणि म्हणूनच अमोल मिटकरींवर त्वरित गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्ही आपणाकडे करत आहोत.

तसेच अमोल मिटकरींच्या ह्या अश्लाघ्य भाषणाला हसून हसून प्रतिसाद देऊन अमोल मिटकरींना अधिक प्रोत्साहन देणारे धनंजय मुंडे व जयंत पाटील ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जबाबदार व वरिष्ठ नेत्यांवरही योग्य ती कारवाई करण्यात यावी.
निवेदनावर कुलदीप ठाकूर, सचिन कानकाटे, वाल्मीक धात्रक, प्रशांत बेलेकर, रवींद्र मंडलिक, अशिष ओझा, आशुतोष भुजबळ, आकाश राठी, नितीन गुंजाळ, अजिंक्य डोंगरे, गोपाल राठी, सुनील खरे, संदीप वैद्य, भाऊ जाखडी आदींच्या सह्या आहेत.
