हनुमान जयंतीच्या भगव्या ध्वजाच्या मिरवणुकीचा व ध्वजारोहणाचा प्रभारी पोलिस अधिकाऱ्यांचा मान यंदा खंडित !

महिला पोलिस अधिकाऱ्यांच्या हस्ते भगव्या ध्वजाची मिरवणूक व ध्वजारोहण !
प्रतिनिधी —
ब्रिटिश काळापासून ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्व असलेल्या संगमनेरच्या हनुमान जयंतीचा रथोत्सवाच्या भगव्या ध्वजाची मिरवणूक आणि ध्वजारोहणाचा मान संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना देण्याचा प्रघात यावेळी रोखण्यात आला. संगमनेरच्या हनुमान जयंतीच्या इतिहासात घडलेली ही पहिलीच घटना आहे. प्रभारी पोलिस अधिकाऱ्यांना मान न देता महिला पोलीस अधिकाऱ्याला यावेळेस ध्वजाच्या मिरवणुकीचा मान देण्यात आला.
गोहत्या व गोवंश हत्या आणि संगमनेरातील बेकायदेशीर कत्तलखान्यां मधून होणार्या मांस तस्करी मध्ये ज्यांचे आर्थिक व्यवहाराने हात बरबटलेले आहेत. गोमातेच्या रक्ताने ज्यांचे हात माखलेले आहेत. अशा अधिकाऱ्यांच्या हस्ते या वर्षीचा हनुमान जयंतीच्या उत्सवाचा ध्वज मिरवणूकीचा आणि ध्वजारोहणाचा मान देण्यास संगमनेरच्या हिंदुत्ववादी मंडळींनी विरोध केला होता.

यामुळे पहिल्यांदाच या सुमारे १०० वर्षाच्या परंपरेला छेद देण्याचे काम करण्यात आले व संगमनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख किंवा पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांना हनुमान जयंतीचा कुठलाही मान देण्यात आला नाही.

आज सकाळी सालाबादाप्रमाणे मोठ्या उत्साहात चंद्रशेखर चौक येथून मोठ्या हनुमान मंदिरापासून रथ उत्सव मिरवणुकीची सुरुवात झाली. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे पाटील, संगमनेरच्या माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबेयांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत मिरवणुकीला प्रारंभ झाला.

हनुमान जयंतीच्या रथोत्सवाची सुरुवात करण्यासाठी संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस अधिकारी हे वाजत गाजत भगवा ध्वज घेऊन मिरवणुकीने हनुमान मंदिरा पाशी जाऊन रथोत्सवाच्या मिरवणुकीला सुरुवात करण्यासाठी भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्याची परंपरा ब्रिटिश काळापासून आहे.
याआधी सर्व प्रभारी अधिकारी हे पुरुष असल्याने पुरुषांनाच हा मान मिळत होता. याहीवेळी पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख किंवा पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांना हा मान मिळाला असता.

परंतु संगमनेर शहरात होणाऱ्या गो- हत्या आणि गोवंश हत्या यामध्ये या अधिकाऱ्यांचा आर्थिक सहभाग असल्याचे आरोप झाल्याने व अवैध कत्तलखाने बंद होत नसल्याने गोमातेच्या रक्ताने ज्यांचे हात माखलेले आहेत अशा पोलिस अधिकाऱ्यांच्या हस्ते हनुमान जयंतीच्या रथोत्सवाचे ध्वजारोहण करण्यात येऊ नये अशी जोरदार मागणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती.
हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर यासंदर्भात आदल्या दिवशी दिवसभर आणि रात्री अनेक घडामोडी घडल्या. शहरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी, पुढाऱ्यांनी, नेत्यांनी थेट राज्याच्या गृहमंत्र्यांशी संपर्क करून या बाबत सर्व माहिती दिली. पोलीस अधीक्षकांना देखील या आधी या संदर्भात संगमनेर भाजपचे शहराध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले यांनी निवेदन दिले होते.

अखेर या सर्वांना यश आले असून आज रथ उत्सवाचे ध्वजारोहण व ध्वजाची मिरवणूक पहिल्यांदाच संगमनेर शहराच्या महिला पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले यांच्या हस्ते मिरवणुकीने जाऊन करण्यात आले. त्यानंतर उत्सवास सुरुवात करण्यात आली. या सर्व घडामोडीतून संगमनेर मधील गोवंश हत्या आणि अवैध कत्तलखान्यांचा प्रश्न गंभीररीत्या पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. आणि पोलीस प्रशासनाला मिळालेला हा सर्वात मोठा धक्का आहे. याची जाणीव ठेवून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याबाबत खंबीरपणे भूमिका घेऊन काही तरी कार्यवाही करावी अशी इच्छा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

स्थानिक महिलांचा मान हिरावला असल्याची भावना !
ब्रिटिशांशी संघर्ष करून हनुमान जयंतीची रथ यात्रा खंबीर पणे पार पडण्यात संगमनेरच्या महिलांचा मोठा पुढाकार होता. ब्रिटिशांचे दमनचक्र डोक्यावर असून देखील न घाबरता येथील महिलांनी पुढाकार घेत ही रथयात्रा अखंडपणे चालू ठेवली आहे. यावर्षी पहिल्यांदाच भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ आणि नगरच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांना रथ ओढण्याचा मान देण्यात आला. हा मान पहिल्यांदाच बाहेरच्या महिलांना बोलावून देण्यात आल्याची चर्चा शहरात आहे. स्थानिक महिलांना देण्यात येणारा हा मान यावेळी रोखला गेला असल्याची पण चर्चा सुरू आहे. तसेच एकाच पक्षाचा हा उत्सव नसून संपूर्ण संगमनेर गावाचा हा उत्सव आहे आशा देखील प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. सार्वजनिक धार्मिक उत्सवांना राजकीय स्वरूप देऊ नये अशाही प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत. हनुमान जयंती उत्सव समितीने मात्र हा उत्सव सर्व गावाचा असून सर्व महिलांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन केले होते.
