संगमनेर मे जो सुकून है, वो किधर भी नही ! —  महसूल मंत्री थोरात

प्रतिनिधी —

संगमनेरमधील शांतता, सांस्कृतिक शैक्षणिक व प्रगतशील वातावरण, विविध क्षेत्रांमध्ये गौरवास्पद झालेली वाटचाल यामुळे प्रत्येक माणसाला संगमनेर हवेहवेसे वाटते. शहरात अनेक नवनवीन बदल होत असून बाहेरील नागरीकही रहिवासासाठी येथे प्राधान्य देत आहेत. महाराष्ट्राबाहेरील अनेक लोक ‘संगमनेर मे जो सुकून हे, वो कही नाही’ असे अभिमानाने सांगतात हा संगमनेरचा गौरव आहे, असे सांगत महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरचा विकास अधोरेखित केला.

भिम प्रतिष्ठानच्यावतीने तालुक्यातील वडगाव पान येथे संविधान स्तंभाचा लोकार्पण सोहळा व विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री थोरात बोलत होते.

सध्या देशभरात जाती-धर्माच्या नावावर राजकारण सुरू आहे. विकासाच्या कामाऐवजी जाती-धर्माच्या नावावर सुरू असलेले राजकारण पुढील काळासाठी दुर्दैवी आहे. जातीपातीचे राजकारण करून आपसात मनभेद निर्माण केले जात असल्याचेही थोरात यांनी म्हटले आहे.

वडगावपान-जोर्वे, काशीद वस्ती या रस्त्यांच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. अध्यक्षस्थानी थोरात कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ होते. व्यासपीठावर संगमनेरच्या माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे, महानंद आणि संगमनेर तालुका दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, सुनंदा जोर्वेकर आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

थोरात म्हणाले, सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून अनेक विकासकामांना गती दिली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताच प्रलंबित निळवंडे धरणाच्या कालव्याच्या कामाला देखील वेग आला असून येत्या ऑक्टोंबरपर्यंत डाव्या आणि उजव्या कालव्यात पाणी आणण्यासाठी काम सुरू आहे. आपल्याकडील राजकारण, समाजकारण, सुसंस्कृतपणा संपूर्ण महाराष्ट्राला आदर्शवत आहे. सर्व समाजाला प्रतिनिधित्व देत एक चांगले वातावरण तालुक्यात सदैव आहे. परंतु येथील प्रगती व विकास काहींना अस्वस्थ करतो अशा अस्वस्थ प्रवृत्तीकडे लक्ष देऊ नका. आगामी काळामध्ये सर्वांनी विकासाच्या पाठीशी उभे रहा.

समाजातील अघोरी परंपरेविरुद्ध सर्वप्रथम भगवान बुद्धांनी आवाज उठवला. समतेच्या या परंपरेचा प्रसार विविध संतांनी केला. या समानतेच्या तत्वांना एकत्र आणण्याचे काम राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. त्यांनी जगाला सर्वात मोठी लोकशाही दिली असून समतेच्या अधिकारामुळे गरीब-श्रीमंती असा भेद लोकशाहीत नाही. भारतीय लोकशाही ही आपल्या सर्वांची ताकद आहे.

माजी नगराध्यक्ष तांबे म्हणाल्या, सोशल मीडियाच्या माध्यमातून भेद निर्माण करण्याचे काम काही प्रतिगामी शक्ती करत आहेत. मात्र आपण समतेच्या विचाराचे आहोत. आपण सर्वांनी अशा शक्तींविरुद्ध ताकतीने लढली पाहिजे.

महानंदचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख म्हणाले, थोरात यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील सर्व समाजाला प्रतिनिधित्व देत सर्वांच्या विकासासाठीचे काम आपल्या तालुक्यात सातत्याने होत आहे. विकास कामे हा आपल्या यशाचा भक्कम पाया ठरला आहे. पुढील काळात देखील तो टिकविण्याची गरज आहे.

बाबा ओहोळ म्हणाले, संगमनेर तालुक्यातील नागरिक जेव्हा बाहेर जातो त्यावेळेस संपूर्ण राज्य आपला आदर करतो. हीच आपली मोठी ओळख असून आपापसातील मतभेद विसरून तालुक्याच्या विकासासाठी कायम एकत्र राहण्याची गरज आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!