माकपच्या वतीने संयुक्त जयंती साजरी.
धर्मांध व जमातवादी शक्तींना रोखण्यासाठी व्यापक एकजूट उभारण्याचा संकल्प !

प्रतिनिधी —
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या अकोले येथील कार्यालयांमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली.
देशात व राज्यात आज सुनियोजित पद्धतीने धार्मिक विद्वेषाचे वातावरण तयार केले जात आहे. कॉर्पोरेट धार्जिण्या आर्थिक धोरणांचा परिणाम म्हणून वाढलेली महागाई व बेरोजगारी सारख्या मूलभूत समस्यांपासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी व धार्मिक द्वेषाच्या आधारे आपले धर्मांध व कॉर्पोरेट धार्जिणे राजकारण आणखी मजबूत करण्यासाठी आर.एस.एस. व भाजपने आपल्या नियोजनबद्ध कारवाया तीव्र केल्या आहेत.

महाराष्ट्रात मशिदीवरील भोंगे उतरविण्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंना पुढे करून आर.एस.एस. व भाजप धर्मांध तणाव निर्माण करत आहेत.
दिनांक ३ मे २०२२ पर्यंत मशिदिंवरील भोंगे काढले नाहीत तर मशिदीसमोर हनुमान चालीसा म्हणण्याचे कार्यक्रम घेण्यात येतील असे जाहीर करून महाराष्ट्रात धार्मिक तणाव वाढविण्याचा कार्यक्रमच त्यांनी जाहीर केला आहे.

हिजाब, हलाल, मांसाहार सारख्या मुद्द्यांच्या माध्यमातून अगोदरच देशात जाणीवपूर्वक धार्मिक द्वेषाचे वातावरण तयार करण्यात आले आहे. देशाची घटना, धर्मनिरपेक्षते सारखे मूल्य, राष्ट्रीय एकात्मता व भारता बाबतची मूळ संकल्पना (आयडिया ऑफ इंडिया) यामुळे धोक्यात आली आहे.
शेतकरी आंदोलन, कामगार संहिता विरोधातील लढा व सामाजिक अन्याय अत्याचारांच्या विरोधातील संघर्षात एकत्र आलेल्या व्यक्ती, विचारवंत, बुद्धिजीवी, पक्ष व संघटनांनी देशाची घटना, स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता व बंधुता या मौल्यवान मूल्यांच्या रक्षणासाठी एकत्र येण्याची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रभर यासाठी माकपच्या सर्व शाखांच्या वतीने राज्यभर छत्रपती शिवाजी महाराज व फुले, शाहू आंबेडकरांच्या संयुक्त जयंत्यांच्या आयोजनाचा कार्यक्रम आयोजित करून सामाजिक एकजूट मजबूत करण्याचे आवाहन पक्षाच्या राज्यसचिव मंडळाने केले आहे. अकोले येथील पक्ष कार्यालयात यानुसार आज संयुक्त जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

महाराष्ट्राचा वैचारिक वारसा हेगडेवार, गोवळकरांचा नसून तो छत्रपती शिवाजी महाराज व फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा आहे. हा वैचारिक वारसा जनतेच्या सर्व स्तरात आणखीन जोरदारपणे रुजवण्यासाठी राज्यभर माकपच्या वतीने संयुक्त जयंत्यांच्या माध्यमातून मोहीम हातात घेण्यात आली आहे. धर्मांध व जातीय शक्तींना रोखण्यासाठी व्यापक एकजूट यातून साध्य होईल असा विश्वास माकपला वाटतो आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील गावागावात संयुक्त जयंतीचे कार्यक्रम सर्वसामान्य जनतेकडून मोठ्या उत्साहाने आयोजित केले जातात. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी व किसान सभा, जनवादी महिला संघटना, शेतमजूर युनियन, सिटू, एस. एफ. आय. व डी. वाय. फाय. आय. या सर्व संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या संयुक्त जयंती कार्यक्रमांमध्ये हिरीरीने भाग घ्यावा आणि जनतेला धर्मांध आणि जातीय शक्तींच्या विरोधामध्ये जागृत करावे असे आवाहन पक्षाच्यावतीने करण्यात आले आहे.

विविध धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षांनी सुद्धा बोटचेपी भूमिका न घेता या अत्यंत संकटाच्या आणि परीक्षेच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज व शाहु-फुले-आंबेडकर यांच्या विचारांबद्दल ठामपणे भूमिका घ्यावी व मनुवादी जमातवादी धर्मांध शक्तींना रोखण्यासाठी व्यापक सहकार्यातून एकजूट उभारावी असे आवाहन डॉ. अजित नवले सदाशिव साबळे, एकनाथ मेंगाळ, नामदेव भांगरे, ज्ञानेश्वर काकड, मेहबूब सय्यद, नंदू गवांदे यांनी केले आहे.
