हनुमान जयंती ही संपूर्ण गावाची कोणत्या एका पक्षाची नाही — प्रमिला अभंग

ऐतिहासिक हनुमान जयंती पहिल्यांदाच वादग्रस्त वळणावर !
प्रतिनिधी —
संगमनेर शहरातील हनुमान जयंती ही महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहे. या जयंतीला मोठा इतिहास आहे. मात्र काही लोक तिला राजकीय स्वरूप देण्याचा अत्यंत दुर्दैवी प्रयत्न करत आहेत. हि जयंती संगमनेर शहराचे वैभव असून ती संपूर्ण शहरवासीय व नागरिकांची आहे. कोणत्याही एका पक्षाची नाही असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या व संगमनेर तालुका महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा प्रमिला अभंग यांनी केले आहे.

हनुमान जयंती बाबत सुरू असलेल्या पत्रकबाजी बाबत अधिक बोलताना प्रमिला अभंग म्हणाल्या की, संगमनेर शहर हे पुरोगामी विचारांचे शहर आहे. सर्वधर्मसमभाव व समानतेला प्राधान्य देत या ठिकाणी विकास झाला आहे. राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली या शहरातील विकास कामे ,बंधुता व समानता ही इतरांना आदर्शवत ठरले आहे. शहरातील हनुमान जयंतीला मोठी परंपरा असून ही परंपरा दरवर्षी मोठ्या उत्साहात जपली जात आहे. मात्र यावर्षी काही लोक पक्षीय राजकारणाचे स्वरूप या जयंतीला देऊ पाहत आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. कोणत्याही सामाजिक उपक्रमांना राजकीय स्वरूप न देता तो कार्यक्रम सर्वांचा आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे.

रथ ओढण्याचा मान हा महिला भगिनी असून या मानाच्या कार्यक्रमांमध्ये सर्व समाजातील महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. यामध्ये कधीही पक्षीय वातावरण नसते. मात्र या वेळेस काही लोक त्याला पक्षीय रंग देत आहेत. त्यामुळे यामधील सहभागाबाबत महिलांमध्ये काहीशी निराशा वाटत आहे. असे न होता दरवर्षीप्रमाणे सर्वसमावेशक अशी ही जयंती साजरी होणार आहे .

तरी या हनुमान जयंती मध्ये समाजातील सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन करताना हा कार्यक्रम कोणत्याही एका पक्षाचा नसून पूर्ण संगमनेर शहरवासीयांचा आहे. तेव्हा या हनुमान जयंती मध्ये सर्व महिला भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष प्रमिला अभंग यांनी केले आहे
