गोहत्या आणि गोवंश कत्तलींच्या रक्ताने माखलेल्या संगमनेर पोलीसांच्या हाताने हनुमान जयंतीची पूजा करण्यात येऊ नये !
भाजपचे शहराध्यक्ष गणपुले यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
गो भक्तांच्या तीव्र प्रतिक्रिया ; पोलिसांविषयी नाराजी

प्रतिनिधी —
गोवंश कत्तलींच्या रक्ताने माखलेल्या संगमनेर पोलिसांच्या हातांनी संगमनेर गावचे दैवत बजरंग बली हनुमान यांची पूजा आणि हनुमान जयंतीच्या दिवशी होणाऱ्या रथ उत्सवाला ध्वज प्रदान करण्यात येऊ नये. त्यामुळे सर्व हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या जातील असा इशारा संगमनेर शहर भाजपचे अध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले यांनी अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
संगमनेर शहरात हनुमान जयंतीच्या दिवशी निघणारी रथयात्रा ही संपूर्ण राज्यात सुप्रसिद्ध आहे. ब्रिटिश सत्तेच्या दमन चक्रा विरुद्ध आवाज उठवत आणि स्वातंत्र्याचा पुरस्कार करीत येथील महिलांनी ब्रिटिश सरकारला धक्का देत या हनुमान जयंतीच्या रथाची सवाद्य मिरवणूक काढल्याचा इतिहास सर्वश्रुत आहे.

सण १९१२ ते १९२८ या कालावधीमध्ये संगमनेर शहरातील चंद्रशेखर चौक पर्देशपुरा परिसरात असणाऱ्या मोठे मारुती मंदिरात रथोत्सव यात्रेदरम्यानचा हा ऐतिहासिक प्रसंग आहे. ब्रिटिशांच्या विरोधात दिलेल्या लढ्याचा सन्मान म्हणून पोलीस खात्याच्या वतीने शहरात भगव्या ध्वजाची मिरवणूक काढून भगवा ध्वज व रथावरील मूर्तीची पूजा केल्याशिवाय उत्सव सुरू होत नाही. अशी येथील प्रथा आहे.
मात्र आता हा प्रघात बंद होण्याच्या उंबरठ्यावर आला आहे. आणि वादग्रस्त देखील ठरला आहे. संगमनेर शहरात सातत्याने होणाऱ्या गोवंश हत्या आणि गोवंश हत्या मध्ये संगमनेर शहर पोलिसांचा असणारा छुपा वाटा, कर्तव्यात कसूर आणि दुर्लक्ष यामुळे नेहमीच होणाऱ्या व सातत्याने वाढत जाणाऱ्या गोवंश हत्या या सर्व प्रकाराचा राग संगमनेरच्या जनतेमध्ये होता. तो या निमित्ताने आता उफाळून आलेला आहे.

मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात संगमनेर शहरात मोठा छापा घालण्यात येऊन सुमारे ३२ टन गोमांस जप्त करण्यात आले होते. त्या वेळी रोख रक्कम व ७१ जनावरे मिळून आली होती. हा बेकायदेशीर कत्तलखाना स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांच्या संरक्षणाखाली आहे व त्यास त्यांचे संरक्षण हे मोबदल्याचे स्वरूपात आहे. हे उघड गुपित आहे. पोलिस अधीक्षकांच्या पथकाने घातलेल्या छाप्यात जो मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यामध्ये काही रजिस्टर वह्या आणि डायरीमध्ये शहर पोलीस स्टेशनच्या व्यक्ती अन्य अधिकारी यांना गोवंश कत्तलींच्या संरक्षणाच्या मोबदल्यात महिन्याला किती रक्कम देण्यात येत होती याचे उल्लेख आहेत.

अशा भ्रष्ट अधिकार्यांची चौकशी व निलंबनाची मागणी केली जात असताना राजकीय हस्तक्षेप या कारणाने संबंधित अधिकाऱ्यांवर कुठलीही कारवाई झालेली नाही. तसेच श्रीरामपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांनी लेखी आश्वासन देऊनही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत गायींच्या कत्तलीतील पैसा घेऊन गोवंश हत्या करणाऱ्यांना संरक्षण देण्यात गुंतलेल्या अधिकाऱ्यांचे हात निष्पाप गोवंशाच्या रक्ताने माखलेले आहेत. अशा व्यक्तीच्या हस्ते गावाचे दैवत श्री बजरंग बली हनुमान यांची पूजा होणे म्हणजेच हिंदूंच्या भावना दुखावण्याचा प्रकार आहे.

याबाबत हिंदू समाजाच्या भावना अत्यंत तीव्र आणि तिरस्काराच्या आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत दिनांक १६ एप्रिल २०२२ रोजी सकाळी हनुमान जयंती निमित्त होणाऱ्या रथोत्सव मिरवणुकीच्या पूजेसाठी संगमनेर शहर पोलीस स्टेशन तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय यातील कोणत्याही अधिकाऱ्याने येऊ नये. त्यांच्या ऐवजी तालुक्यातील पोलिस स्टेशनचे अधिकारी किंवा आपण स्वतःहून पूजा करावी.

भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या हस्ते पूजा करण्याचा प्रयत्न झाल्यास तमाम हिंदू बांधव त्यास विरोध करतील असा इशाराही गणपुले यांनी दिलेल्या निवेदनात दिला आहे.

