विश्व हिंदू परिषदेची श्रीरामनवमी निमित्ताने शोभायात्रा !

 प्रतिनिधी —

रविवार दि. १० एप्रिल रोजी श्रीरामनवमी निमीत्त विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गावाहिनीने या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून अभिनव नगर येथील श्रीराम मंदिर येथून सायंकाळी ५ वाजता शोभायात्रा निघणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमीत भव्य श्रीराम मंदिराचे काम प्रगती पथावर आहे. गेल्या २ वर्षांपासून कोविड २०१९ च्या प्रतिबंधामुळे शोभायात्रा काढता आली नाही. मात्र श्रीरामनवमी जन्मोत्सव मोजक्या श्रीरामभक्तांच्या उपस्थितीत पार पडला. कोविडच्या २ वर्ष कार्यकाळात विश्व हिंदू परिषद बजरंग दलामार्फत संगमनेर शहर व तालुक्यात सेवाकार्याद्वारे रक्तदान शिबीरे, सीता रसोईच्या माध्यमातून परराज्यातील वाटसरू व गरजूंना मोफत भोजन देण्याची संधी मिळाली. २ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या वर्षीचा श्रीरामनवमी जन्मोत्सव सोहळा जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे.

सालाबादप्रमाणे या वर्षीही प्रभू श्रीरामचंद्राची भव्य मूर्ती हार- फुलांनी सजावट करून शोभायात्रा निघणार आहे. या शोभायात्रेत बाल वेशभूषेत राम पंचायत देखावा, आकर्षक चित्र रथावर भव्य भगवान विष्णूंची मूर्ती, लेझर लाईटवर देवी- देवतांच्या प्रतिमांची डिझाईन व आकर्षक विद्युत रोषणाई, “गोमातेचे संवर्धन व संरक्षणाची जनजागृती होण्यासाठी गाई- वासरू देखावा”, मर्दानी खेळ, मल्ल खांब, भजनी मंडळ, पारंपारिक वाद्ये, सनई चौघडे, घोडे, उंट शोभायात्रेचे आकर्षण आहे. अश्या भव्य दिव्य जन्मोत्सव सोहळ्यात ग्रामीण व शहरी भागातील बंधू – भगिनींनी पारंपारिक वेशभूषेत मोठ्या संख्येने येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अभिनव नगर येथील श्रीराम मंदिरापासून सायंकाळी ५ वाजता शोभायात्रेचा प्रारंभ होणार असून मार्ग- नविन नगर रोड, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, पंजाबी कॉलनी येथील श्रीराम मंदिर, अशोक चौक, चावडी, मेनरोड, सय्यद बाबा चौक, तेलीखुंट, नेहरू चौक व चंद्रशेखर चौक येथील श्रीराममंदिर येथे महाआरती होईल. या मार्गात शोभायात्रेचे पुष्पवृष्टी व फटाक्यांच्या आतिषबाजीने स्वागत करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!