शिवजयंतीनिमीत्त महारक्तदानाचा संकल्प !
उत्सव युवक समितीचा उपक्रम !
प्रतिनिधी —
शिवजयंती निमीत्ताने संगमनेरच्या शिवजयंती उत्सव युवक समितीने महारक्तदानाचा संकल्प केला आहे. शुक्रवारी दिवसभर चालणाऱ्या या महारक्तदान शिबीरात संगमनेरकरांनी मोठ्या संख्येने रक्तदान करण्याचे आवाहन शिवजयंती उत्सव समितीने केले आहे.

संगमनेर शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
संगमनेरमधील शिवजयंती उत्सव युवक समिती गेल्या ११ वर्षापासून सातत्याने नाविण्यपुर्ण समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे. विद्यार्थ्यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार रुजविण्यासाठी व्याख्याने व विविध स्पर्धेचे आयोजन करणे, गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणे हे समितीचे दरवर्षीचे उपक्रम आहेत. वेगवेगळ्या आपत्तीच्या काळातदेखील समितीच्या माध्यमातुन कोल्हापुर, सांगली, सातारा जिल्ह्यातील पुरग्रस्त नागरिकांना किराणा व संसारोपयोगी वस्तुचे वाटप केले आहे.

वैद्यकीय मदत पुरविण्यासाठी पुढाकार घेतला. कोरोना महामारीमध्येदेखील समितीने सामाजिक बांधीलकी जोपासत गरीबांना अन्नदान, कोरोना प्रतिबंधक औषध फवारणी, घरोघरी जात आरोग्य तपासणी असे समाजहिताचे उपक्रम हाती घेतले होते.

कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेत २०२१ मध्ये गतवर्षी रक्तदान शिबीराचे आयोजन करत या माध्यमातुन समितीच्या ८१२ सदस्यांनी रक्तदान करत जिल्ह्यात रक्तदानाचा विक्रम प्रस्थापित केला होता. यावर्षीदेखील महारक्तदान शिबीराचा संकल्प केला असून या माध्यमातुन स्वत:चाच विक्रम मोडीत काढण्याचा संकल्प केला असून यावर्षीच्या महारक्तदान शिबीरात संगमनेरकरांनी मोठ्या संख्येने रक्तदान करण्याचे आवाहन उत्सव समितीने केले आहे.
