संगमनेरात डॉ.आंबेडकर जयंती मिरवणूकिला गालबोट !

चांद तारा काढलेले हिरवे व भगवे झेंडे घेऊन मुस्लिम तरुणांचा धुडगूस !!

गोंधळ घालणाऱ्या मुस्लिम  तरुणांविरुद्ध  विवीध गुन्हे दाखल

ॲट्रॉसिटी, राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहोचवणे, विनयभंग, धार्मिक भावना दुखावणे यासह अनेक गुन्हे दाखल…

प्रतिनिधी —

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीला संगमनेर शहरात रात्री गालबोट लागले. संघर्ष मंडळाच्या मिरवणुकीत बळजबरीने घुसून काही मुस्लिम तरुणांनी हातात चांद तारा काढलेले हिरवे आणि भगवे झेंडे घेऊन धुडगूस घातल्याची घटना घडली. यावेळी महिला भगिनींना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य, धक्काबुक्की घोषणाबाजी, आंबेडकरांच्या मिरवणुकीच्या रथापुढे विचित्र हातवारे, अर्धाकृती पुतळ्याचा अपमान असे प्रकार घडल्याने रात्री उशिरा संगमनेर शहर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

फिरोज गुलाब बागवान (रा. मोमिनपुरा), अहमद कामर चौधरी, अमन समीन बागवान, हुजेब इक्बाल बागवान, सोहेल इक्बाल शेख, अब्रार अजीज खान, हमजा शेख, साबीर शेख, अरबाज शेख, अब्दुल समद कुरेशी, डॅनियल शेख, आफन शेख, उमेद काझी, फैजान गफ्फार चा मुलगा पूर्ण नाव माहीत नाही, मारूफ असलम बागवान व इतर 100 ते 120 इसम सर्व राहणार संगमनेर यांच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलिसांनी अनुसूचित जाती जमाती कायद्यानुसार ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.

तसेच राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहोचवणे, महिला भगिनींची छेडछाड करणे, धार्मिक भावना दुखावणे, गोंधळ घालने, फौजदारी कट-कारस्थान करणे अशा विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले असून मारूफ असलम बागवान (रा. बागवान पुरा, संगमनेर), अब्दुल समद जावेद कुरेशी (रा. भारत नगर, संगमनेर) या दोघांना अटक केली आहे.

किशोर सुदाम राव चव्हाण (रा. दिल्ली नाका, संगमनेर) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

आंबेडकर जयंतीनिमित्त संगमनेर शहरातील संघर्ष तरुण मंडळाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रथाची मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक रात्री आठ साडे आठ वाजण्याच्या सुमारास शहरातील मेन रोड परिसरात श्रीकृष्ण मंदिरासमोर आली असता वरील आरोपी तरुणांनी या मिरवणुकीत कट कारस्थान करून अचानकपणे मुस्लिम धर्मियांचे हिरव्या व भगव्या रंगाचे त्यावर चांद तारा असलेले झेंडे हातात घेऊन मोठमोठ्याने अल्ला हू अकबर, इस्लाम जिंदाबाद या घोषणा देऊन मिरवणुकीत बाधा आणली.

मिरवणुकीत घुसून त्यांनी दोन समाजात आणि धर्मात तेढ निर्माण होईल व मिरवणुकीला गालबोट लागेल, तसेच जातीय दंगल घडवण्याच्या उद्देशाने सहभागी होऊन मिरवणुकीत साक्षीदार असलेल्या माता भगिनी यांना लज्जा उत्पन्न होईल अशा वाईट हेतूने त्यांच्या शरीराला स्पर्श करून धक्काबुक्की केली. तसेच वरील मिरवणुक ही आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक असल्याचे माहित असून देखील मिरवणुकीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धचंद्राकृती पुतळा ठेवण्यात आलेल्या रथासमोर विचित्र हातवारे करून रथ ओढण्याचा प्रयत्न केला व पुतळ्याची हेळसांड करून धार्मिक भावना दुखावल्या.

तसेच दुसऱ्या समाजात जातीय तेढ निर्माण करून दंगा करण्याचा प्रयत्न या उद्देशाने गैरवर्तन करण्यात आल्याची फिर्याद पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आलेली आहे.

दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख आणि पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी तातडीने भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली असल्याची माहिती समजली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!