माहेरहून पाच लाख रुपये आणावेत यासाठी छळ करून विवाहितेचा खून !

संगमनेर तालुक्यातील धक्कादायक घटना 

नवरा सासू सासरे यांच्यासह नणंद आणि भायावर गुन्हा दाखल ; दोघांना अटक

प्रतिनिधी —

टायरच्या दुकानासाठी माहेराहून पाच लाख रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा छळ करून तिचा खून करण्याची क्रूर घटना संगमनेर तालुक्यातील सोनेवाडी येथे घडली आहे.

मयत विवाहितेचा नवरा सुनील बबन सांगळे, सासरा बबन दत्तात्रय सांगळे, सासू मंदाबाई बबन सांगळे, तानाजी बबन सांगळे, अर्चना सुधीर जायभाये सर्व रा. सोनेवाडी, तालुका संगमनेर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवरा सुनील सांगळे व भाया तानाजी बबन सांगळे या दोघांना अटक करण्यात आली आहे.

संगमनेर तालुक्यातील सोनेवाडी या ठिकाणी सुनील सांगळे हा रहिवासी असून त्याचे घुलेवाडी येथे टायर दुकान आहे. हे दुकान मोठे करण्यासाठी त्याची पत्नी रवीना सुनील सांगळे (वय २६ वर्षे) हीस माहेरून ५ लाख रुपये आणावेत म्हणून पती सुनील सांगळे वेळोवेळी शिवीगाळ करून मारहाण करून तिचा शारीरिक व मानसिक छळ करत होता. तिला उपाशी ठेवण्यात येत होते.

शिवाय सासू, सासरे, नणंद आणि भाया हे देखील यात सहभागी होऊन तिला मारहाण, शिवीगाळ करत असल्याची माहिती समजली आहे. त्यामुळे तिला वारंवार मारहाण करून आणि संगनमताने ठार मारले असल्याची फिर्याद शांताराम बबन वनवे, रा. जांभुळवाडी मळा, हिवरगाव पठार शिवार, ता. संगमनेर यांनी दिली आहे.

संगमनेर तालुका पोलिसांनी तातडीने पावले उचलत मयत रवीना हिचा पती सुनील सांगळे आणि भाया तानाजी सांगळे या दोघांना अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे हे करीत आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने व पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेऊन तात्काळ कारवाई सुरू केली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!