आरोपी आमच्या ताब्यात द्या… नाहीतर पोलीस स्टेशन जाळून टाकू !

४० जणांवर गुन्हा दाखल
प्रतिनिधी —
संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला आणलेले आरोपी आमच्या ताब्यात द्या अशी दमदाटी चक्क पोलिसांनाच करीत धिंगाणा घालून पोलीस स्टेशन जाळून टाकू अशी धमकी देणाऱ्या ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस ठाण्याला आता थेट जाळून टाकण्याची धमकी देण्यापर्यंत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची हिम्मत वाढल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शंका घेतल्या जात असून एकच खळबळ उडाली आहे.

संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक दत्तात्रय गोविंद दिघे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.
राहुल पुंजा वनवे, सुदर्शन महादू वनवे, योगेश सुदाम गंभीरे, विठ्ठल भारत वनवे सर्व रा. हिवरगाव पठार, ता. संगमनेर व इतर ३० ते ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी संगमनेर तालुका पोलिस स्टेशनला ठाणे अंमलदार कर्तव्य बजावत असताना घुलेवाडी परिसरात असणाऱ्या संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात अनोळखी ३० ते ४० जण मोटर सायकल घेऊन आले. सरकारी कामात अडथळा आणून पोलीस स्टेशनला आणलेले आरोपी आमच्या ताब्यात द्या. असे म्हणून गोंधळ घालीत आणि पोलिसांना शिवीगाळ करून पोलीस स्टेशन जाळून टाकण्याची धमकी दिली. अशी फिर्याद देण्यात आली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

