विजेच्या मोटारींची चोरी करणारी टोळी गजाआड !
अकोले पोलिसांची कामगिरी
प्रतिनिधी —
विजेच्या मोटारींची चोरी करणाऱ्या दोघा जणांची खबर मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यानंतर अकोले तालुक्यासह, संगमनेर, कोपरगाव, आळेफाटा, ओतूर परिसरात विजेच्या मोटारींची चोरी करणारी टोळी अकोले पोलिसांनी जेरबंद केली आहे.

भाऊसाहेब तुकाराम डोके (रा. कळस खुर्द) संदीप सखाराम पथवे (रा. कळस बुद्रुक) विकास वसंत वाकचौरे (रा. कळस बुद्रुक) निलेश गोरख आगिवले (रा. कळस खुर्द) सर्व अकोले तालुका, जिल्हा अहमदनगर या आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अकोले तालुक्यात काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या विहिरी व नदीवरील पाण्याच्या विजेच्या मोटारींची चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होत. सातत्याने मोटारींची चोरी होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. या घटनांबाबत अकोले पोलीस ठाण्यात वेळोवेळी तक्रारी व गुन्हे दाखल करण्यात आले होते. तपासही सुरू होता.

त्यामुळे पोलिसांनी वरील बाबी गांभीर्याने घेत नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन, अचानक छापे अशा प्रकारच्या कारवाया नियमित सुरू केल्या होत्या. या कारवाया सुरू असतानाच अकोले पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांना गुप्त बातमी दारा मार्फत खबर मिळाल्यानंतर त्यांनी चोरी करणाऱ्या टोळीतील सदस्यांची नावे समजली.

खात्री झाल्यानंतर पोलिसांनी भाऊसाहेब तुकाराम डोके (रा. कळस खुर्द, ता. अकोले) व संदीप सखाराम पथवे (रा. कळस बुद्रुक, ता. अकोले) या दोघांनी साथीदारांच्या मदतीने मोटारींच्या चोरी केले असल्याचे समजले. त्यांचे साथीदार विकास वसंत वाकचौरे (रा. कळस बुद्रुक) व निलेश गोरख आगीवले (रा. कळस खुर्द) या दोघांच्या मदतीने विजेच्या मोटारींची चोरी केल्या बाबतची कबुली दिली आहे.

त्यामुळे वरील चारही चोरट्यांना मोटार चोरीच्या गुन्ह्यात अटक करून त्यांची पोलिस कस्टडी मिळविण्यात आली. त्या चौघांच्या ताब्यातून सुमारे ११ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल देखील मिळाला.
यातील आरोपी भाऊसाहेब तुकाराम डोके याच्यावर अकोले आणि संगमनेर, कोपरगाव या ठिकाणी देखील गुन्हे दाखल आहेत. या सराईत गुन्हेगारावर ६ गुन्हे दाखल आहेत. तर आरोपी संदीप सखाराम पथवे याच्यावर अकोले सह ओतूर, आळेफाटा याठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत. या टोळीला पकडल्यामुळे आता विजेच्या मोटारींच्या चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणावर उघड होणार असून पोलिस त्या दिशेने कारवाई करत आहेत.

या कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक भूषण हंडोरे, सहाय्यक फौजदार शेख, पोलीस कॉन्स्टेबल विजय खुळे, आनंद भारती, अविनाश गोडगे यांनी सहभाग घेतला. पुढील तपास सहाय्यक फौजदार एम.आय.शेख हे करीत आहेत.

