बिबट्याच्या कातडीची तस्करी करणारी टोळी जेरबंद !
अकोले तालुक्यातील तिघांना अटक

प्रतिनिधी —
बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आळेफाटा पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून बिबट्याचे कातडे हस्तगत करण्यात आले आहे. रविवारी (१० एप्रिल) पुणे-नाशिक महामार्गालगत हि कारवाई करण्यात आली.

याबाबत आळेफाटा पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती अशी की, पुणे-नाशिक महामार्गावरील हॉटेल फाउंटन समोर वन्य प्राण्यांची कातडे विकण्यासाठी काही जण येणार असल्याची माहिती आळेफाटा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर यांना गुप्त बातमीदारामार्फात मिळाली. बडगुजर यांनी पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करून पथकासमवेत या परिसरात सापळा रचला. हॉटेल समोरील महामार्गालगत मारुती ८०० गाडी नंबर एम.एच १५ ए.एच ७९६३ मध्ये तीन इसम संशयित बसलेले दिसून आले. गाडीजवळ जाऊन खात्री केली असता मिळालेल्या बातमी नुसार असल्याची खात्री पटली.

पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी एकत्रित छापा टाकला असता त्यांना पकडून नाव व पत्ता विचारला. साजिद सुलतान मनियार (वय-३२ रा. देवठाण) शरद मोहन मधे (वय-३२ रा. शेरनखेल) रामनाथ येसू पथवे (वय – ४९ रा. शेरनखेल) सर्व ता. अकोले, जिल्हा अहमदनगर अशी सांगितले.

गाडीची पाहणी केली असता गाडीच्या डिक्कित बिबट्याची कातडी मिळून आली. पोलिसांनी मारुती ८०० गाडी व एक बिबट्याची कातडी जप्त केली. तिघांना ताब्यात घेतले असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

आळेफाटा पोलिसांनी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अनुसार गुन्ह्याची नोंद केली आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर, पोलीस हवालदार चंद्रा डुंबरे, विनोद गायकवाड, लहानू बांगर, भीमा लोंढे, पोलीस अमलदार अमित माळूंजे, मोहन आनंदगावकर, पोपट कोकाटे यांनी कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस हवलदार विनोद गायकवाड करत आहेत.

