संगमनेरातील जोर्वे नाका येथे दोघांना बेदम मारहाण पोलीस गुन्ह्यात एचएम ची नोंद
प्रतिनिधी —
व्यवसायासाठी लागणारा कच्चामाल खरेदीसाठी दिलेला ॲडव्हान्स माल न मिळाल्यामुळे परत मागितल्याचा राग आल्याने दोघा जणांना बेदम मारहाण करण्याचा प्रकार संगमनेरातील जोर्वे नाका परिसरात घडला असून पोलिसांनी या प्रकरणी एकास अटक केली आहे. तर त्याचे साथीदार पसार आहेत.

योगेश विलास धाकतोडे (वय २७ वर्ष, रा. मेंढवण तालुका संगमनेर) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. मोसिन मेहमूद शेख (रा. नाईकवाडपुरा, संगमनेर) यास अटक करण्यात आली असून त्याचे दोन अज्ञात साथीदार पसार झाले आहेत.

फिर्यादी योगेश विलास धाकतोडे यांचा कुशन चा व्यवसाय आहे. धाकतोडे यांनी सदर मोसिन शेख त्याच्याकडून कुशन कामाचे मटेरियल घेत असतो. ६ महिन्यापूर्वी फिर्यादीने कुशन कामाचा कच्चामाल घेण्यासाठी आरोपीला ५५ हजार रुपये दिले होते.

परंतु पैसे घेऊनही मटेरियल न दिल्याने धाकतोडे यांनी आरोपीकडे वेळोवेळी पैसे परत मागितले. पैसे न दिल्याने फिर्यादी यांनी शनिवारी रात्री (दि. ९ ) मोसिन शेख याला फोन केला असता शेख याने योगेश धाकतोडे यांना जोर्वे नाका येथे पैसे देतो असे सांगून बोलावून घेतले.
फिर्यादी आणि त्याचा मित्र पैसे घेण्यासाठी आले असता. त्या दोघांना आरोपी व त्याच्या साथीदारांनी शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण करून जखमी केले. या मारहाण श्रीराम जोंधळे यांच्या डोक्यात तसेच तोंडावर काठीने मारहाण करून त्यास गंभीर जखमी केले आहे.

संगमनेर शहर पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला असून मोसिन मेहमूद शेख (रा. नाईकवाडपुरा) यास अटक केली आहे. तर त्याचे दोन्ही अज्ञात साथीदार पसार झाले आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.


