मित्रांच्या मदतीने केलेला लुटमारीचा बनाव उघड !
फिर्यादीसह तिघांना अटक

(छायाचित्र सौजन्य दै. युवावार्ता)
प्रतिनिधी —
नेवासे येथील मालाचे पैसे घेऊन परत येत असताना संगमनेर तालुक्यातील कोंची मांची शिवारात गाडीला मोटरसायकल आडवी घालून, जबर मारहाण करून सुमारे ३ लाख ६६ हजार ५०० रुपये लुटून नेल्याची तक्रार करणाऱ्या फिर्यादी सह त्याच्या दोन साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. हा लुटमारीचा प्रकार बनावट असल्याचे पोलिसांनी उघड केले असून तक्रार करणारा आणि त्याचे साथीदार यात सहभागी असल्याचे पोलिसांनी उघड केले आहे.

लुटण्यात आलेली रक्कम आणि इतर मुद्देमालासह पोलिसांनी आरोपींकडून ५ लाख ६६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. संगमनेर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक राहुल मदने आणि संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी ही माहिती दिली.

फिर्यादी सोहेल याकूब शेख, (वय २९ वर्षे रा. एकतानगर संगमनेर) समीर याकुब शेख, (वय २४ वर्ष रा. एकता नगर, संगमनेर) सैफअली शेरअली शेख, (वय २५ वर्ष रा. नाईकवाडपुरा संगमनेर) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, यातील फिर्यादी सोहेल शेख याने संगमनेर तालुका पोलीस स्टेशन येथे येवुन कळविले की, मी तुफैल मुक्तार मलीक, यांचे मलीक स्टील, समनापुर, ता. संगमनेर येथे मजुरीने कामाला आहे. ६ एप्रिल २०२२ रोजी दुपारी स्टील घेवुन नेवासा फाटा येथे देणे करीता गेलो होतो. माझ्या गाडीचा नंबर एम एच १७ बी वाय ६६१३ मधील स्टिल खाली करुन ३ लाख ६६ हजार ५०० रुपये रोख रक्कम घेवुन सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास नेवासा फाटा येथुन संगमनेरसाठी निघालो होतो. काही वेळाने माझ्या लक्षात आले की, कोणीतरी दोन अनोळखी इसम पल्सर मोटार सायकल वरुन माझ्या गाडीचा पाठलाग करत आहे.

मी श्रीरामपुर येथे पोहचलो असता, मोरगे वस्ती, श्रीरामपुर येथुन आणखीन दोन अनोळखी इसम दुसऱ्या पल्सर मोटार सायकल वरुन माझ्या गाडीचा पाठलाग करत होते. परंतु दोन्ही पल्सर मोटार सायकल माझ्या गाडी पासुन काही अंतरावर असल्याने त्यांच्यावर जास्त लक्ष गेले नाही आणि मी कोंची मांची घाट परिसरात आलो असता, पाठिमागे चाललेल्या दोन्ही पल्सर मोटार सायकल माझ्या गाडीच्या समोर येवुन आडव्या लावून माझी गाडी थांबवली व काही एक न बोलता त्यांनी मला मारहाण करुन गाडीच्या ड्रॉवर मध्ये ठेवले ३ लाख ६६ हजार ५०० रुपये रोख रक्कम काढुन घेतले आणि माझ्या तोंडाला व हाताला मारहाण करुन दोन्ही पल्सर मोटार सायकल लोणीच्या दिशेन निघुन गेले.

अशी हकिकत सांगितल्याने संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार व स्टाफ व राहुल मदने, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर विभाग, संगमनेर हे व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने लागलीच तपासा बाबत सुचना देवुन दोन पथके तयार करुन तपासाची सुरुवात झाली.
मात्र तपासावरुन सदरचा गुन्हा हा घडलेला नसुन फिर्यादीने पैसे हडप करण्यासाठी बनाव केला असल्याचा पोलिसांना संशय आला व त्यांनी अधिक कसून तपास केला असता सदर फिर्यादीने हा लुटमारीचा बनाव केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

पोलिसांनी फिर्यादीस ताब्यात घेवुन त्याचेकडे कसुन चौकशी केली असता त्याने त्याचे साथीदार समीर याकुब शेख (वय २४ वर्ष रा. एकता नगर, संगमनेर) सैफअली शेरअली शेख (वय २५ वर्ष रा. नाईकवाडपुरा संगमनेर) यांच्याशी संगनमत करुन सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. फिर्यादी सोहेल याकुब शेख, याकुब शेख, सैफअली शेरअली शेख यांच्या कडुन रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, पोलीस उपनिरीक्षक विजय खंडीझोड, पोलीस हवालदार शिवाजी डमाळे, पोलीस नाईक राजेंद्र घोलप, मनोज पाटील, संगमनेर तालुका पोलीस स्टेशन, तसेच उपविभागीय पोलीस अधिकरी यांच्या पथकातील पोलीस नाईक आण्णसाहेब दातीर, फुरकान शेख ( सायबर सेल अप.पो.अधि. कार्यालय श्रीरामपुर) पो.कॉ.अमृत आढाव, सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, गणेश शिंदे, यांनी तपासात सहकार्य केले. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विजय खंडीझोड हे करत आहेत.
