गट शेती उत्पादित शेतमालाचे मार्केटिंग केल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा — नामदार थोरात

शेतमालाची मुल्यसाखळी विकासावर भर देणार- 

म्हाळुंगी परिसर आदिवासी – शेतकरी गट शीत वाहनाचा शुभारंभ     

 

  प्रतिनिधी —

पिकांच्या मुल्यसाखळी विकासाचे महत्व लक्षात घेवून गटशेती व स्मार्ट योजने सारख्या अनेक योजना महाविकास आघाडी सरकारच्या काळात राबवल्या जात आहेत. सेंद्रिय पध्दतीचे व गुणवत्तापुर्ण फळे – भाजीपाल्यास ग्राहक वर्गातून मोठी मागणी आहे. गटशेती व स्मार्ट सारख्या योजनांचा लाभ घेवून शेतमालाचे एकत्रीत पायाभूत सुविधांची उभारणी करावी व त्यातून शेतमालाचे मार्केटींग केल्यास शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचवण्यास निश्चित मदत होणार असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर कृषी विभागाच्या वतीने म्हाळूंगी परिसरात आदिवासी शेतकरी गट फळभाज्या व मार्केटिंग प्रणालीच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार डॅा सुधिर तांबे, संगमनेर चे प्रांताधिकारी डॅा. शशिकांत मंगरूळे, उपविभागीय कृषि अधिकारी सुधाकर बोराळे, तहसिलदार अमोल निकम, तालूका कृषि अधिकारी  प्रवीण गोसावी, साईबाबा संस्थान, शिर्डी चे विश्वस्त ॲड. सुहास आहेर, जयहिंद लोकचळवळीचे कृषि विभाग प्रमुख डॅा. अभय जोंधळे, म्हाळूंगी परिसर आदिवासी शेतकरी गटाचे युवराज डामसे, धनाजी अस्वले, महादू अस्वले, डॅा. निलेश दिक्षीत, महादू अस्वले, प्रकाश नाडेकर, रोहीदास उघडे,राजेंद्र अस्वले, दत्तू अस्वले उपस्थित होते.

यावेळी बोलताना थोरात म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार हे शेतकरी व गोरगरिबांच्या विकासासाठी काम करत आहेत. अनेक संकटा नंतरही या सरकारने शेतकऱ्यांना खूप चांगल्या योजनांचा लाभ दिला आहे. गट शेतीच्या माध्यमातून शेतीला व्यावसायिक रूप येत असून यातून निर्माण होणारा सेंद्रिय पद्धतीच्या भाजीपाल्याला मोठी मागणी आहे. त्याचे चांगले मार्केटिंग केले तर त्याचा मोठा लाभ शेतकऱ्यांना होईल असेही ते म्हणाले.

तर आमदार डॉ. तांबे म्हणाले की, सेंद्रिय शेतीवर शेतकऱ्यांनी भर दिला पाहिजे. सेंद्रिय भाजीपाला व फळांना शहराप्रमाणे ग्रामीण भागातही मोठी मागणी वाढली आहे. मागणी तसा पुरवठा हा उद्देश शेतकऱ्यांनी ठेवावा असेही ते म्हणाले

कृषि विभागाकडील गटशेती योजनेच्या माध्यमातून शेतकरी गटाच्या सदस्यांच्या शेतात २५ एकर क्षेत्रात शेडनेट उभारणी केली आहे. संरक्षित शेती तंत्रज्ञनावर आधारीत भाजीपाला उत्पादन हाती घेतले आहे. मुंबई, ठाणे व पुणे शहरातून म्हाळूंगी गावात उत्पादीत होणाऱ्या वैशिष्ट्य पुर्ण शेतमालास मोठी मागणी असल्याचे व परदेशी भाजीपाला उत्पादनात देखील गावातील शेतकर्यांचा हातखंडा असल्याची माहीती गटाचे प्रमुख युवराज डामसे यांनी दिली.

तांदूळ  प्रकिया व विक्रीसाठी राईस मिल, तेलघाणी,भाजीपाला संकलन व प्रतवारी केंद्रासाठीचे आवश्यक यंत्रे, मशागतीचे कामे करण्यासाठी ट्रॅक्टर व औजारे बॅंकेचा लाभ कृषि विभागामार्फत मिळाला असल्याची माहीती गटाचे संचालक धनाजी अस्वले यांनी दिली.

आज लोकार्पण करण्यात आलेल्या शितवाहाना द्वारे नाशवंत असणाऱ्या भाजीपाला व फळांचा दर्जा अबाधित ठेवून थेट ग्राहकांना गुणवत्ता पुर्ण माल मिळण्यास मदत होणार आहे. यामुळे परिसरातील भाजीपाल्याचा नावलौकीक वाढीस लागून शेतमालाच्या ब्रॅन्डींग साठी सदरच्या बाबी आवश्यक असल्याच्या सुचना थोरात यांनी उपस्थितांना केल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले तर तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी आभार मानले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!