सहकारी दूध संघ हे शाश्वत असून खासगींच्या आमिषाला बळी पडू नका — महसूल मंत्री यांनी

राजहंस गोधन कर्ज वितरणाचा प्रसंगी !
प्रतिनिधी —
दुग्ध व्यवसायामुळे ग्रामीण भागात अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. सहकारी दूध संघ हा आपल्या प्रपंचाशी निगडीत असून कायम दूध उत्पादकांचे हित जोपासले आहे. सहकारी दूध संघामुळे उत्पादकांना मोठी शाश्वती असून खासगी दूध संघांच्या तात्पुरते आमिषाला बळी पडू नका असे सांगताना तालुक्यात गायी व दूध उत्पादन वाढीसाठी दूध संघाने सुरू केलेल्या राजहंस गोधन कर्ज योजनेचा जास्तीत जास्त उत्पादकांनी लाभ घ्यावा असे आवाहन राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

संगमनेर तालुका सहकारी दुध उत्पादक संघ व स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीने सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात राजहंस गोधन कर्ज योजनेच्या शुभारंभ प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी महानंद व राजहंसचे चेअरमन रणजितसिंह देशमुख हे होते. तर व्यासपीठावर ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, लक्ष्मणराव कुटे, संपतराव डोंगरे, स्टेट बँकेचे रिजनल मॅनेजर विनोदकुमार, शाखाधिकारी सुनिता नयनार, डेप्युटी मॅनेजर वैभव कदम, सुनील गुरुकर, व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर, वसंतराव देशमुख, सुनील कडलग, डॉ. गंगाधर चव्हाण, संचालक विलासराव वर्पे, भास्करराव सिनारे,संतोष मांडेकर, विलास कवडे, बबन कुऱ्हाडे, बादशहा वाळूंज, संजय पोकळे, विक्रम थोरात, विष्णू ढोले, तुकाराम दातीर, रवींद्र रोहम, प्रतिभा सोमनाथ जोंधळे, मंदा गोरख नवले, सुभाष सांगळे, दूध संघाचे कार्यकारी संचालक डॉ. प्रतापराव उबाळे, वर्षा उबाळे, तहसीलदार अमोल निकम, बापूसाहेब गिरी, मॅनेजर गणपतराव शिंदे, डॉ. खिलारी आदी उपस्थित होते.
यावेळी ५ शेतकऱ्यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले.

थोरात म्हणाले की, सहकारी दूध संघ ही आपल्या हक्काची संस्था आहे. या संस्था आपणच आपल्या जपल्या पाहिजे. दूध व्यवसायात महिलांचे ही मोठे काम असून महिलांना संधी मिळाल्यास त्या संधीचे सोने करतात. अडचणीच्या काळात राजहंस सह सर्व सहकारी दूध संघ शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहीले आहे. सध्या दूध पावडरचे भाव वाढले असून खाजगीवाले काही ठिकाणी भाव वाढून देत दूध गोळा करत आहे. मात्र सहकारी दूध संघ ही तुमच्या जीवाभावाची संस्था आहे. थोड्या आमिषाला बळी पडून इकडे तिकडे आपले दूध न पाठवता सर्वांनी सहकारी दूध संघाच्या पाठीशी भक्कम उभे राहिले पाहिजे. कारण या दुध संघामुळेच खासगी वर नियंत्रण असते.

राजहंस गोधन कर्ज योजनेतून अनेक शेतकऱ्यांना गाई खरेदीसाठी मोठा लाभ मिळणार आहे. योग्य पूर्तता करून सर्वांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन करताना रणजितसिंह देशमुख यांनी अत्यंत अडचणीच्या काळामध्ये राजहंस दूध संघ व महानंद मध्ये अत्यंत चांगले काम केले असल्याचे गौरवोद्गार थोरात यांनी काढले.

रणजितसिंह देशमुख म्हणाले की, स्टेट बँकेच्या सहकार्याने राजहंस दूध संघाच्या पुढाकारातून राजहंस गोधन कर्ज वितरण योजना कार्यान्वित झाली आहे. या अंतर्गत २० कोटींचे कर्ज दूध उत्पादकांना मिळणार असून दोन गाईन करता १ लाख ६० हजार रुपये कर्ज मिळणार आहे. सध्या या योजनेसाठी ९५७ उत्पादकांची कर्ज मागणी आहे. पहिल्या टप्प्यात ५ कोटी रुपये वितरित करण्यात येणार आहे. यामुळे तालुक्यात गाईंची संख्या वाढणार असून परिणामी कुटुंबाला आधार देणारे दूध उत्पादन वाढणार आहे. दूध व्यवसाय हा अनियमिततेचा आहे. मात्र तरीही थोरात यांच्या नेतृत्वाखाली जास्तीत जास्त स्थिरता निर्माण करत संघाची वाटचाल सुरू आहे. मागील दोन वर्षात लॉकडाऊन, कोरोना, अतिरिक्त दूध असे अनेक संकट आले मात्र या सर्वांवर मात करत दूध संघाने आपला लौकिक कायम जपला. आगामी काळात खासगीकरणाबरोबर स्पर्धा करण्यासाठी प्रत्येक दूध उत्पादक व सेवा सोसायट्यांनी सज्ज राहावे असे आवाहनही त्यांनी केले.

तर डॉ विनोद कुमार म्हणाले की, स्टेट बँक ही जनतेची बँक असून जनतेची प्रगती करणे. हे या बँकेचे उद्दिष्ट आहे. यावेळी डॉ. प्रतापराव उबाळे म्हणाले की, २८ वर्ष राजहंस दूध संघामध्ये आपण प्रामाणिक पणे सेवा दिली. या काळात सर्वांचे मौलिक सहकार्य मिळाले आपण थोरात यांच्या तत्वांचा अनुयायी म्हणून काम केले असल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी विविध दूध सोसायट्यांचे प्रतिनिधी, वैद्यकीय अधिकारी यांसह शेतकरी बांधव व दूध संघातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महानंदचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ व सुरेश जोंधळे यांनी केले तर दूध संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र चकोर यांनी आभार मानले.
राजहंस गोधन कर्ज योजना
१. संकरित दोन गाई खरेदीसाठी एक लाख साठ हजार रुपये कर्ज
२. कर्जाची परतफेड 3 वर्ष
३. कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यासाठी दूध सोसायटीची हमी आवश्यक
४. गाईंचा विमा तीन वर्षासाठी बंधनकारक
५. कर्ज हप्ता दूध पगारातून कपात होणार
