संगमनेर तालुका हा सहकाराचे विद्यापीठ — उदय शेळके
संगमनेरमध्ये कर्ज वसूली मेळावा
प्रतिनिधी —
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँक यशस्वीरित्या सुरु असून शेतकर्यांना येत्या काळात पीक कर्जाची मर्यादा वाढवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहोत. संगमनेर तालुका हा विकासाचे आदर्शपर्व ठरला आहे. संगमनेर तालुका हा सहकाराचे विद्यापीठ असल्याचे गौरोवोद्गार जिल्हा बँकेचे चेअरमन उदय शेळके यांनी काढले आहेत.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकार सभागृहात अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा सन २०२१- २२ कर्ज वसुली मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. बँकेचे व्हा.चेअरमन अॅड. माधवराव कानवडे, संचालक गणपतराव सांगळे , माजी चेअरमन बाजीराव खेमनर , बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्पे, जनरल मॅनेजर देशमुख आदि मान्यवर उपस्थित होते.

चेअरमन शेळके म्हणाले कि, अहमदनगर जिल्हा बँकेला पुर्वीपासून आदर्श नेतृत्व मिळत गेले. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या दुरदृष्टी नेतृत्वामुळे जिल्हा बँक ही शेतकर्यांसाठी कामधेनू ठरली आहे. ग्रामीण भागात जिल्हा बँकेच्या शाखांचे कार्य महत्वपुर्ण असून यामुळे शेतकर्यांच्या व्यवसायाला बळकटी मिळाली आहे. बँकेची वाटचाल प्रगतीपथावर सुरु आहे. संगमनेर तालुक्यातील सर्वच सहकारी संस्था ह्या आदर्शवत असून संगमनेर तालुका हा खर्या अर्थाने सहकाराचे विद्यापीठ ठरला आहे.

बँकेचे व्हाईस चेअरमन माधवराव कानवडे म्हणाले कि, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी अहमदनगर जिल्ह्यात सहकार खूप मोठ्या प्रमाणात वाढवला तसेच नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचे कामकाज सुरळीत चालू आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे संगमनेर तालुक्यात एकही संस्था अनिष्ट तफावती मध्ये नाही. लवकरच शेतकर्यांसाठी सोलर एनर्जी उपक्रम राबविण्याचा विचार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

बँकेचे संचालक गणपतराव सांगळे म्हणाले विकास सोसायट्यांच्या डिव्हीडंट कर्जात न घेता करंट खाती जमा केला त्यामुळे संस्थेच्या निवडणुकांना सदर पैसा कामी आला. बँकेचे चांगल्या निर्णयात व्हाईस चेअरमन व चेअरमन सतत मदत करतात.
यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या भाषणात बँकेच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. व जास्तीत जास्त वसूल देण्याची विनंती केली. प्रास्ताविक तालुका विकास अधिकारी अशोक थोरात यांनी केले.

प्रास्ताविकात मान्यवरांचे स्वागत व संगमनेर तालुक्यातील ठेवी, कर्ज वाटप वसुलीची सविस्तर माहिती दिली. या वर्षी संगमनेर तालुक्याचा कर्जवसुली मध्ये पहिला नंबर असेल असे सांगितले. सदर कार्यक्रमासाठी संगमनेर तालुक्यातील सर्व विकास संस्थाचे चेअरमन, बँक शाखा अधिकारी सर्व संस्थांचे सचिव उपस्थित होते.
